Tuesday, March 18, 2025
Homeमहाराष्ट्रकोकणHarnai : हर्णै बंदरात मासळी खरेदीसाठी खवय्यांची गर्दी

Harnai : हर्णै बंदरात मासळी खरेदीसाठी खवय्यांची गर्दी

सकाळच्या वेळी बंदराला जत्रेचे स्वरूप

दापोली : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ‘थर्टी फर्स्ट’च्या दोन दिवस आधीच सुट्टीसाठी आलेल्या पर्यटकांची सकाळच्या सुमारास रोजच हर्णै (Harnai) बंदरात मासळी खरेदीला गर्दी होत आहे. त्यामुळे सकाळच्या वेळी बंदराला जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. पर्यटक आवर्जून ताजी मासळी व सुकी मासळी खाण्यासाठी व खरेदीसाठी हजेरी लावू लागले आहेत. यावेळेस मासळीची आवक खूपच कमी असल्याने बंदरामध्ये येणारी मासळी खरेदीसाठी गर्दी दिसत आहे.

मिनी महाबळेश्वर म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या दापोलीचे थंड आल्हाददायक वातावरण, दापोली शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेला केळशी ते दाभोळपर्यंतचा स्वच्छ सुंदर समुद्रकिनारा आणि नारळी-पोफळीच्या बागांची निवांत सावली यामुळे पर्यटकांकडून दापोलीतील समुद्रकिनाऱ्याला मोठीच पसंती मिळत आहे. दापोलीत दाभोळ, बुरोंडी, आडे, केळशी बंदरात मासेमारी होत असली तरी मुख्यत्वे हर्णै हे तालुक्याचे ताजी मासळी मिळण्याचे मुख्य ठिकाण आहे. या ठिकाणी सकाळ संध्याकाळ असे दिवसातून दोनदा मासळीचा लिलाव होत असतो. महाराष्ट्रभरातून पर्यटक मासळी खरेदीसाठी हर्णै बंदरात आवर्जून येतात.

Kelve Beach : ३१ डिसेंबरच्या सेलिब्रेशनसाठी केळवे बीच सज्ज

दापोलीतील बंदरात ऑगस्ट महिन्यापासून मासेमारीला सुरुवात झाली, मात्र सुरुवातीपासूनच वारंवार वादळांच्या तडाख्यांमुळे गेले दोन महिने मासळीची आवकच झाली नाही. सप्टेंबर शेवटच्या आठवड्यापासून नौका मासेमारीकरिता समुद्रामध्ये जायला लागल्या. त्यात येणाऱ्या मासळीमध्ये जेलीफिशचे प्रमाण जास्त होते तर खाण्यासाठी लागणाऱ्या मच्छीचे प्रमाण खूपच कमी होते. मात्र फिशिंगसाठी दररोज जाणाऱ्या छोट्या होड्या किरकोळ मासळी आणत. त्यामुळे मत्स्यहारी खवय्यांची मासळीची भूक भागत होती.

मत्स्याहारावर मारला ताव

दापोलीत पर्यटनासाठी येणारे हे पर्यटक खास फिरणे आणि मासळी खाणे आणि खरेदीसाठी येत असतात. येथे पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला मासळी खाण्याचा एक वेगळाच विलक्षण आनंद असतो. दापोली तालुक्यात कोणत्याही ठिकाणी वास्तव्याला आलेला पर्यटक हर्णै बंदरामधील ताजी मासळी खाण्यासाठी येतच असतात. त्याप्रमाणे आता तालुक्यातील बहुतांशी हॉटेल व रिसॉर्टमध्ये झिंगा फ्राय, पापलेट थाळी, सुरमई थाळी, कोळंबी बिर्याणी आदी मासळीच्या चटकदार मसालेदार डिशेस खाण्यासाठी पर्यटक येथे येत आहेत. पापलेट, सुरमई, कोलंबी, बांगडा आदी प्रकारच्या मासळीला पर्यटकांची मागणी जास्त आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -