Friday, March 28, 2025

वेलकम २०२५

डॉ. श्वेता चिटणीस

वर्ष संपायला आलं की पार्ट्यांचे बेत, पर्यटन, सुट्ट्या घेणे, थोडीफार मौजमजा करणे याकडे सर्वांचाच कल असतो. पार्ट्यांमध्ये आपण अनेक नवीन संकल्प सोडतो, जुने संपवून नवे अंगीकारतो आणि इतर बऱ्याच गोष्टी असतात ज्या या वर्षात आपल्याला साध्य झालेल्या नसतात त्या पुन्हा पुढील वर्षी साध्य करावे या विचाराने नवीन वर्षाला सामोरे जातो… चोहीकडे “झोपाळ्या वाचून झुलायचे” असे वातावरण असतानाच कचरा गोळा करण्यासाठी कर आकारावे का? हा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे.

आपण आपले घर स्वच्छ करतो, अगदी आरशासारखे साफ ठेवतो; परंतु परिसरात सगळीकडे कचऱ्याचे ढीग, दुर्गंधी साचलेली असते. पार्टीनंतर साचलेले ढीगभर प्लास्टिक, चॉकलेटचे, बिस्किटांचे रॅपर, प्लास्टिकच्या बशा, चमचे, काटे, थर्माकॉलचे बारीक कण, काय आणि किती प्रकारचे प्लास्टिक असू शकते याचा फारसा विचार न करता गल्लीच्या टोकाशी असलेल्या ओसंडून वाहणाऱ्या गटारांमध्ये प्लास्टिकचा कचरा वाढत राहतो… हे सर्व प्लास्टिक शहराच्या कचऱ्याबरोबर डम्पिंग ग्राऊंडमध्ये जात… तिथून पावसाच्या पाण्याबरोबर समुद्रात जातं… समुद्राचं पाणी तर प्रदूषित होतं; परंतु समुद्रात राहणारे मासे आणि इतर जीव विनाकारण या प्लास्टिकला खाद्य समजून जीव गमावतात. पर्यावरण अभ्यासानुसार लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत हे प्लास्टिक मायक्रो प्लास्टिकच्या स्वरूपात शरीरात शिरकाव करते.

मायक्रो प्लास्टिकचे कण दोन प्रकारचे असतात, एक प्राथमिक स्तरावरचा मायक्रो प्लास्टिक आणि दुसरं माध्यमिक स्तरावरचं मायक्रो प्लास्टिक. प्राथमिक स्तरावर मायक्रो प्लास्टिक स्त्रियांच्या मेकअपच्या साहित्यातून परिसरात एकत्र होतं आणि दुसऱ्या प्रकारचा प्लास्टिक समुद्रात जेव्हा जातं तेव्हा उन्हामुळे लाटांच्या तडाख्यामुळे आणि घर्षणामुळे त्याचे बारीक बारीक कण समुद्रातील पाण्यात मिसळतात. यात प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिकची भांडी, जेवणाचे कंटेनर यांचा मोठा वाटा आहे. असे हजारो टन प्लास्टिक एकत्र झाल्यावर पावसाळ्यात गटारं तुंबतात, नाल्यातून पाणी वाहून जात नाही. आपण खातो त्या माशांच्या पोटात सुद्धा हे प्लास्टिकचे कण जातात. तसेच अन्न, पाणी आणि हवा या नैसर्गिक स्त्रोतांमधून पुन्हा हे प्लास्टिक आपल्या शरीरात शिरकाव करतं.

हे दुष्टचक्र थांबवणे आपल्याच हातात आहे. आपण ओला कचरा आणि सुका कचरा असं वर्गीकरण तर करतच असतो. महानगरपालिकेचे कचरा गोळा करणारे कर्मचारी स्वत:चे आरोग्य धोक्यात घालून घेतात. त्यासाठी वेगळा कर आकारावा का हा वादाचा मुद्दा आहे; परंतु सद्यपरिस्थितीत आपण आपला कचरा स्वतःच शक्य तितका विघटन होईल असा ठेवावा आणि कमीत कमी कचरा सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना उचलण्यासाठी ठेवावा. त्यासाठी आपण ओला कचरा आणि सुका कचरा असे वर्गीकरण करतच आहोत; परंतु त्यात अजून एक वर्गीकरण करणे गरजेचे आहे. ते म्हणजे प्लास्टिकच्या कचऱ्याचे! अनेकवेळा लोक सुक्या कचऱ्यामध्ये नूडल्सच्या पाकिटांचा कचरा, बिस्कीट व चॉकलेटचे कागद, असे “सॉफ्ट प्लास्टिक” , प्लास्टिकच्या पिशव्या, पाण्याच्या बाटल्या, विविध खाद्यपदार्थांचे प्लास्टिक इत्यादी सापडतात ते टाळणं अत्यंत गरजेचं आहे. प्लास्टिकपासून आरोग्य सांभाळायचं असेल कचऱ्याचे वर्गीकरण करणं अत्यंत गरजेचं आहे. ओला कचरा कंपोस्ट करणे, सुक्या कचऱ्यामध्ये कागद, कार्डबोर्डचे बॉक्स, धातू, इलेक्ट्रॉनिक कचरा इत्यादी कचरा एकत्र करून देणे गरजेचे आहे. वापरलेले कपडे सेवाभावी संस्थांना दिल्यास कपड्यांमुळे होणारे प्रदूषण टाळता येईल.
स्वतः कंपोस्ट केलेल्या कचऱ्यामध्ये छानसं झाड लावून तर बघा !
ते रोप वाढवून तर बघा किती आनंद मिळतो ते…

आपण वापरलेले कपडे कुणाला तरी उपयोगी पडतील यासारखे समाधान दुसरे कोणते आहे? घरोघरी, प्रत्येक सोसायटीमध्ये प्लास्टिकचा कचरा वेगळा ठेवल्यास सफाई कर्मचाऱ्यांना सुद्धा प्लास्टिक वेगळे गोळा करणे भाग पडेल. शहरांच्या आणि गावांच्या महानगरपालिकांना सुद्धा प्लास्टिक कचरा वेगळा गोळा करून त्याचे विघटन करणे भाग पडेल; परंतु हे सर्व प्रत्येक नागरिकाने केले पाहिजे. प्रत्येकानेच जर असे म्हटले की बाकीचे लोक कचरा टाकतायेत मी एकटा का टाकू नये… आणि असेच प्रत्येकाने म्हटले तर कोणतीही यंत्रणा शहर स्वच्छ ठेवायला, परिसर निरोगी ठेवायला अपुरी ठरेल. त्यामुळे नवीन वर्षाचे स्वागत करताना आपण किमान प्लास्टिकचा कचरा वेगळा ठेवण्याचा तरी संकल्प करू शकतो. आधी छोटे छोटे संकल्प केल्यास मोठे फायदे नक्कीच येणाऱ्या वर्षात मिळू लागतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -