Friday, March 28, 2025

मऊ मेणाहून…

कर्नल (नि.) अनिल आठल्ये – ज्येष्ठ अभ्यासक

२५ डिसेंबर हा भारताचे पंतप्रधानपद भूषणवणाऱ्या अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिन. या दिवसापासून त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात झाली. स्वाभाविकच वर्षभर त्यांच्या कार्याची, व्यक्तिमत्त्वाची स्मरणयात्रा समजेल. अटलबिहारी यांचे व्यक्तिमत्त्व मवाळ, साहित्यप्रेमी, मृदू असले तरी आवश्यक त्या वेळी त्यांनी अतिशय कणखर भूमिका घेतल्याचेही आपण पाहिले. त्याचेच स्मरण करत त्यांना वाहिलेली ही आदरांजली.

२५ डिसेंबर २०२४ पासून अटलबिहारी वाजपेयी यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले. १९९० च्या दशकात भारताची परिस्थिती काय होती याची आज २ वर्षांनंतर कल्पना करणेही कठीण आहे. त्यावेळी भारत काश्मीरमध्ये अपरोक्ष युद्धाचा सामना करत होता. त्याच वेळी अमेरिका आणि चीन मिळून भारतावर सर्वंकश अण्वस्त्र चाचणी बंदी करार लादण्याचा प्रयत्न करत होते. अशाप्रकारे जागतिक शक्ती एकत्र येऊन भारताला कायम जागतिक स्तरावर दुय्यम राष्ट्राचा दर्जा देण्याच्या प्रयत्नात होती.

अभिनयाचा साक्षात्कारी स्पर्श…

भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी अणुऊर्जेचे महत्त्व ओळखले होते. त्यांनी महान शास्त्रज्ञ डॉ. होमी भाभा यांच्या मदतीने भारतात अणुऊर्जा संशोधन आणि अणुऊर्जा प्रकल्प उभे केले. नेहरू नेहमीच अण्वस्त्रांच्या विरोधात होते; परंतु भविष्यकाळात गरज पडली, तर भारतापुढे अण्वस्त्रांचा पर्याय खुला राहावा म्हणून त्यांनी अणुऊर्जा प्रकल्प पूर्णपणे स्वदेशी आणि परकीय हस्तक्षेपापासून दूर ठेवले. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना १९६८ मध्ये अण्वस्त्र प्रसार बंदी करार अमलात आणून अमेरिकेने भारताचा अण्वस्त्र कार्यक्रम बंद करण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून इंदिरा गांधींनी १९७४ मध्ये पहिली अण्वस्त्र चाचणी घेऊन भारताची अण्वस्त्र क्षमता सिद्ध केली; परंतु त्यांना तेव्हाच्या जागतिक स्थितीमध्ये आणि सोव्हिएत संघाच्या मदतीमुळे अण्वस्त्रांचा आणखी विकास करण्याची गरज भासली नाही.

१९९० च्या दशकात सोव्हिएत संघाचा अस्त झाला. चीनने आर्थिक घोडदौड करत जगाला चकित केले आणि त्याचवेळी अमेरिकेने इराकवर आक्रमण करून जगावर आपली एकाधिकारशाही लादली. त्याच सुमारास पाश्चिमात्य राष्ट्रांनी युगोस्लाव्हियासारख्या देशाचे विघटन केले. अनेक भारतीय संरक्षणतज्ज्ञांच्या मते, बगदादनंतर अमेरिकेची वक्रदृष्टी मुंबईकडे वळणार, अशी साधार भीती व्यक्त केली गेली. आमच्यापैकी अनेकांनी तत्कालिन राज्यकर्त्यांना उघडपणे अण्वस्त्र बनवण्याचा सल्ला दिला; परंतु आर्थिक प्रतिबंद लादले जाण्याची भीती आणि राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे भारताने अण्वस्त्र चाचण्या केल्या नाहीत. त्यातच सर्वंकष अण्वस्त्र चाचणी बंदी करार अमलात आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या. चीनच्या सल्ल्यामुळे या करारात असे एक कलम होते की, यात सामील न होणाऱ्या देशांनादेखील हा करार बंधनकारक होणार होता. अशावेळी अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भारताने ११ आणि १३ मे १९९८ रोजी केवळ अणुबाॅम्ब नव्हे, तर हायड्रोजन बाॅम्बचीही चाचणी घेऊन संपूर्ण जगाला आपली संरक्षणक्षमता दाखवून दिली. अण्वस्त्र उघडपणे बनवण्याच्या निर्णयाबरोबरच वाजपेयी यांनी जगाला आश्वासन दिले की, भारताची अण्वस्त्रे केवळ बचावासाठी आहेत. भारत कधीही अण्वस्त्रांचा प्रथम उपयोग करणार नाही.

अण्वस्त्र चाचण्यांच्या यशानंतर जगभरातील भारतीयांनी आनंदोत्सव साजरा केला; परंतु दुर्दैवाने सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने अण्वस्त्र चाचण्यांचा विरोध केला. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे १९७४ मध्ये इंदिरा गांधी यांनी अणुचाचणी घेतली, तेव्हा सर्व पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला होता. आज २६ वर्षांनंतर दिसते की, काँग्रेसने तेव्हाच राष्ट्रवादापासून फारकत घेतली. तेव्हापासूनच काँग्रेसची अधोगती सुरू झाली, असे म्हणता येते. अण्वस्त्र बनवण्याच्या निर्णयापश्चात अमेरिकेने भारतावर आर्थिक निर्बंध लादले. देशातील अनेक तथाकथित अर्थतज्ज्ञांनी त्यावेळी भारताची अर्थव्यवस्था या निर्बंधांपुढे टिकणार नाही, असे भाकीत केले होते. भारताला दिली जाणारी एक बिलियन डॉलरची आर्थिक मदत रद्द करण्यात आली; परंतु वाजपेयी सरकारने अनिवासी भारतीयांच्या मदतीने ‌‘रिसर्जंट इंडिया‌’ नावाचे रोखे जारी केले. त्याद्वारे भारतात चार बिलियन डॉलर जमा झाले. आर्थिक संकट येणार, अशी आवई उठवणाऱ्यांना यामुळे चोख उत्तर मिळाले. त्याच वेळी पाकिस्तानही अण्वस्त्रधारी बनणार, हे गृहीत धरून वाजपेयी सरकारने आपल्या अणुचाचण्यांची सांगड पाकिस्तानशी नव्हे, तर चीनच्या अण्वस्त्रक्षमतेशी घातली. याद्वारे भारताने आपण आशिया खंडामध्ये चीनशी स्पर्धा करत आहोत, हे सर्व जगापुढे अधोरेखित केले. परिणामस्वरूप, आज पाश्चिमात्य जग चीनच्या अधिपत्याला आव्हान देण्यासाठी भारताकडे पाहत आहे. वाजपेयींच्या काळात भारत अण्वस्त्रधारी देश बनला नसता, तर ही परिस्थिती उद्भवलीच नसती.

वाजपेयी नेहमी म्हणत की, आवडीचे मित्र शोधू शकतो पण आपण शेजारी बदलू शकत नाही. दोन्ही देश अण्वस्त्रधारी झाल्यानंतर भारत-पाकिस्तान युद्धाची शक्यता कमी झाल्यामुळे पाकिस्तानशी स्थायी शांततेसाठी वाजपेयी १९ फेब्रुवारी १९९९ रोजी लाहोरला गेले. तिथे त्यांनी मिनार ए पाकिस्तानला भेट देऊन भारताने १९४७ ची फाळणी आणि पाकिस्तानचे स्वतंत्र अस्तित्व यावर शिक्कामोर्तब केले. अशाप्रकारे त्यांनी भारत-पाकिस्तानदरम्यान शांततेचा नवा अध्याय सुरू करण्याचा प्रयत्न केला; परंतु पाकिस्तानातील कट्टरवादी आणि पाकिस्तानी सैन्याने दोन्ही देशांच्या अण्वस्त्र सज्जतेचा फायदा घेऊन त्या आड काश्मीरचा प्रश्न सोडवता येईल, असा चुकीचा आडाखा बांधला. वाजपेयी पाकिस्तानमध्ये असतानाच पाक सैन्याने कारगील क्षेत्रात घुसखोरी करून प्रत्यक्ष ताबारेषेच्या पलीकडे अनेक ठाणी उभारली. बर्फ वितळल्यानंतर मे महिन्यात ही बाब उघड झाली. पाकिस्तानच्या या दगाबाजीला भारताने सज्जड उत्तर दिले आणि अत्यंत कठीण परिस्थितीत सर्व ठाणी ताब्यात घेतली. या युद्धात भारताने हवाई दलाचा पूर्णपणे उपयोग केला. पाकिस्तानला त्याची अपेक्षा नव्हती. कारगील युद्धाच्या काळात संपूर्ण देश भारतीय सैन्याच्या पाठीशी उभा होता. या वेळीही काँग्रेसने सैन्याला पाठिंबा देण्याऐवजी वाजपेयी सरकारवरच टीका केली. सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करण्यासाठी हा हल्ला घडवून आणला, असे आरोपही केले. पोखरणच्या अण्वस्त्र चाचण्यांनंतर काँग्रेस देशविरोधी असल्याची छबी निर्माण झाली होती. त्यावर कारगील युद्धादरम्यान शिक्कामोर्तब झाले.

१३ डिसेंबर २००१ रोजी काही दहशतवाद्यांनी भारतीय संसदेच्या आवारात घुसून खासदारांना आणि नेतृत्वाला मारण्याचा डाव रचला होता. देशाच्या सुदैवाने संसदेच्या आवारातील सुरक्षा रक्षकांनी हा हल्ला परतवून लावला. प्रत्युत्तरादाखल वाजपेयी सरकारने सर्व सैन्यक्षमता एकत्र करून पाकिस्तानवर आक्रमण करण्याची पूर्ण तयारी केली. अशा वेळी जागतिक दबाव आणि पाकिस्तानने दहशतवाद्यांवर अंकुश ठेवण्याचे आश्वासन दिल्यानंतर जवळपास आठ महिन्यांनी सैन्य माघारी फिरले. एप्रिल २००३ मध्ये पाकिस्तानचे तत्कालिन अध्यक्ष जनरल मुशर्रफ भारत भेटीवर आले आणि भारत-पाकिस्तान संबंध सुधारण्याचा आणखी एक प्रयत्न वाजपेयी यांनी केला.

१९४७ पासून भारताच्या सर्वच पंतप्रधानांना युद्धांचा सामना करावा लागला आहे. नेहरूंच्या काळात १९४७ मध्ये काश्मीर आणि १९६२ मध्ये चीनशी युद्धे झाली. १९६५ च्या युद्धावेळी शास्त्री पंतप्रधान होते. त्यानंतर १९७१ मध्ये इंदिरा गांधी यांनी आपली सामरिक शक्ती, राजकीय इच्छाशक्ती दाखवून पाकिस्तानवर निर्भेळ विजय मिळवला. वाजपेयी आपल्या दीर्घ राजकीय प्रवासात या सर्व घटनांचे साक्षीदार होते. त्यामुळे पंतप्रधानपदाच्या काळात त्यांनी लढाई जिंकण्याबरोबरच शांततेच्या दृष्टीनेही प्रयत्न केले. आज आपण वाजपेयींची जन्मशताब्दी साजरी करत आहोत. तेव्हा भारत परचक्रापासून सुरक्षित असल्याचे श्रेय त्यांच्या दूरदृष्टीला जाते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -