Tuesday, March 25, 2025
Homeसंपादकीयरविवार मंथनपर्यावरणपूरक उत्पादनांची बॉस

पर्यावरणपूरक उत्पादनांची बॉस

दी लेडी बॉस – अर्चना सोंडे

खाद्यपदार्थांच्या पॅकेजिंगसाठी प्लास्टिक आणि ॲल्युमिनियमचा वापर पाहून अस्वस्थ झालेल्या त्या तरुणीने भारतात परतल्यावर एक पर्यावरणपूरक पर्याय शोधून काढला. बायो-डिग्रेडेबल अर्थात जैव विघटन होणाऱ्या उत्पादनांचे उत्पादन आणि मार्केटिंग करण्यासाठी तिने एक कंपनी सुरू केली. इकोवेअर असे त्या कंपनीचे नाव आणि ती तरुणी म्हणजे रिया सिंघल.

रियाचा जन्म मुंबईत झाला होता; परंतु तिची बालपणाची काही वर्षे आई-बाबांसोबत दुबईमध्ये गेली. कालांतराने तिला इंग्लंडमधील बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवण्यात आले. पुढे तिने २००४ मध्ये इंग्लंडच्या ब्रिस्टल विद्यापीठातून फार्माकोलॉजी ऑनर्स केले. चार वर्षे तिने लंडनमधील विविध केंद्रांमध्ये फायझर फार्मास्युटिकल्सच्या ऑन्कोलॉजी टीममध्ये काम केले. जिथे ती स्तनाचा कर्करोग व कोलन कर्करोग यावर काम करत होती.

रिया अवघ्या १९ वर्षांची असताना तिच्या आईला कर्करोग झाल्याचे निदान झाले. तिच्या आईने दोन वेळा कर्करोगाशी दोन हात केले आहेत. कर्करोगाला इतक्या जवळून पाहिल्यानंतर रिया त्या गोष्टी वेगळ्या नजरेने पाहू लागली. ऑन्कोलॉजी क्षेत्रातील औषधविज्ञानाच्या ज्ञान आणि अनुभवाचा तिला फायदा झाला. इकोवेअर सुरू करण्याची बीजे नकळत इथेच रोवली गेली. काही वर्षांनी तिचे लग्न इंग्लंडमधील निशांत सिंघल या तरुणासोबत झाले. लग्नानंतर रिया सासू-सासऱ्यांसमवेत राहण्यासाठी भारतात आली.

गरम अन्नाच्या संपर्कात आल्यावर किंवा पुन्हा गरम केल्यावर प्लास्टिक, टिन आणि ॲल्युमिनियम ब्लीचचे विष, बहुतेक कर्करोगजन्य पदार्थ, या गोष्टींची भारतात फारशी जाणीव नव्हती. हीच रियाला चिंता वाटायची. या उलट इंग्लंडमधील लोकं पर्यावरणाबद्दल आणि प्लास्टिकच्या डब्यातून खाण्याच्या दुष्परिणामांबद्दल इतके जागरूक होते की त्यांनी लाकडाच्या लगद्यापासून बनवलेल्या पर्यावरणास अनुकूल कटलरी वापरण्यास सुरुवात केली. तिला जाणवले की, लोकांना आरोग्य आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून प्लास्टिकच्या वापराबद्दल अधिक जागरूकता हवी आहे. बायो-डिग्रेडेबल मटेरियल वापरून ९० दिवसांत विघटित होणारी इकोवेअरची कल्पना त्यातूनच जन्माला आली.

रियाचे सासरे साखर उद्योगातील असल्यामुळे त्यांच्या अनुभवातून तिला विविध कृषी कचऱ्याच्या कच्च्या मालावर प्रयोग करण्याची संधी मिळाली. भारत एक बायोमास राष्ट्र आहे जिथे दरवर्षी कितीतरी टन शेतीमधला कचरा जाळला जातो. ज्यामुळे प्रचंड प्रदूषण होते. रियाने ही समस्या निवारून पर्यावरणाला तसेच शेतकऱ्यांना मदत करण्याचा उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. ती शेतकऱ्यांकडून कचरा घेऊ लागली. त्यावर प्रक्रिया करून डिस्पोजेबल बॉक्स आणि प्लेट बनवू लागली. फायझरमधील अनुभवाचा फायदा मार्केटिंग आणि विक्रीसाठी झाला.

‘इकोवेअर’ हे कटलरी आणि कंटेनर्सच्या श्रेणीचे ब्रँड नाव आहे. ज्याने आधीच विस्तारत असलेल्या क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट (क्यूएसआर) उद्योगाची पसंती मिळवली आहे. या उपक्रमाने अन्नसाखळीतील कर्करोगास पूरक असणारे कार्सिनोजेन कमी करणे, महिला सशक्तीकरण, पर्यावरणपूरक जीवनशैलीला प्रोत्साहन देणे आणि शेतकऱ्यांना मदत करणे यांसारखे अनेक सकारात्मक पाऊल उचलले आहे.

पहिल्या वर्षी रियाने फक्त ५०,००० रुपये कमावले मात्र ती खचली नाही. तिने जिद्दीने व्यवसायाचा पाठपुरावा केला. तिच्या चिकाटीला यश आले. २०१० मध्ये राष्ट्रकुल खेळांच्या रूपाने महत्त्वाचा टर्निंग पॉइंट आला. तिला या गेम्समध्ये जेवण देण्यासाठी ईकोवेअरची उत्पादने पुरवण्याची संधी मिळाली. इकोवेअरच्या प्रमुख ग्राहकांमध्ये आयआरसीटीसी (भारतीय रेल्वे), क्यूएसआर चेन हल्दीराम आणि चायोस यांचा समावेश आहे. त्यांचे २८ वितरक आहेत. तसेच वेब पोर्टलद्वारे, मॉडर्न बझार आऊटलेट्सद्वारे आणि दिल्लीतील सदर बाजारच्या घाऊक बाजारातील विक्रेत्यांकडे ऑनलाइन किरकोळ विक्री केली जाते.

इकोवेअरचा मोठा सामाजिक प्रभाव आहे कारण तो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण करून लोकांना उपजीविका प्रदान करतो. त्यापेक्षाही मोठा फायदा म्हणजे आरोग्यावर होणारा परिणाम हा आहे. कारण तो खाण्यासाठी सुरक्षित पर्याय उपलब्ध करून देतो. इकोवेअर उत्पादनांची विल्हेवाट लावल्यावर ९० दिवसांत ते मातीत मिसळून जातात. शिवाय ही उत्पादने मायक्रोवेव्हमध्ये वापरण्यास सुरक्षित आहेत तसेच फ्रीजमध्ये देखील उत्तम स्थितीत राहतात.

दिल्लीच्या पॉश मार्केटमधील एका साध्या कार्यालयातून सुरुवात करत स्वतःच्या मालकीच्या नोएडामधील ५,००० चौरस फूट कारखान्यामध्ये इकोवेअरचा कारभार विस्तारला आहे, तर दुसरा कारखाना उत्तराखंडमध्ये आहे. कंपनीची वार्षिक उलाढाल २० कोटी इतकी आहे. भविष्यात ती तिप्पट करण्याचा रियाचा मानस आहे. रियाला तत्कालिन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ‘नारी शक्ती पुरस्कार’ मिळाला. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने देखील तिला ग्लोबल लीडर म्हणून गौरवले आहे. तसेच ‘वुमन ऑफ एक्सलन्स’ पुरस्काराने सन्मानित सुद्धा केले आहे. कर्करोगाच्या मुळाशी जात पर्यावरणपूरक उत्पादन तयार करणारी रिया सिंघल लेडी बॉस बिरुदावलीस १०० टक्के पात्र आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -