राजश्री वटे
नवीन वर्ष परवावर येऊन ठेपलं आहे…
प्रत्येकाच्या मनात सरत्या वर्षाला निरोप कसा द्यावा आणि नवीन वर्षाचे स्वागत कसे करावे याचे आराखडे मांडले जात असतात.
निरोप देताना यंव करू अन् त्यांव करू… आणि स्वागताला हे sss करू ते sss करू… बापरे बाप किती विचार!! पण आचरणात किती आणलं जातं कोणास ठाऊक.
सरत्या वर्षात काय घडले, कसे घडले याचा विचार न करता पुढल्या वर्षीचे स्वागत नक्कीच सकारात्मक विचारांनी करावे… जसा विचार करू तसेच पुढ्यात येतं असं समजून आनंदाने पुढे जावं.
नक्की काहीतरी चांगलंच होणार या विचारांनी सुद्धा मन उल्हासित होईल. जे झाले ते चांगल्यासाठीच झाले असा विचार करत सरत्या वर्षाला निरोप द्यावा. मनाला कशाची खंत नसावी. नवीन वर्षाच्या नवीन सूर्यकिरणांकडून ताजी ताजी ऊर्जा घ्यावी.
संकल्प… ही एक मजेदार संकल्पना आहे… खरंच… काय काय संकल्प केले जातात! हे करायचे आहे, ते करायचे आहे, हे सोडायचे आहे ते सोडायचे आहे… कितीतरी! वा! मनाशी निश्चय झाला… १ जानेवारी म्हणजे नवीन वर्षाचा पहिला दिवस… जो संकल्प केला त्याची सुरुवात… एक दिवस झाला… दोन झाले… तीन… चार… पंधरा दिवस झाले… संकल्प गळ्याशी यायला लागला… पूर्ण होणार नाही याचे लक्षण दिसायला लागले… मनाला धमक्या देणं सुरू झालं… कुठून तुला बुद्धी झाली रे असलं काही करायची? मनाचं काय… ते इकडून बोलतं तिकडूनही बोलतं.
करू का नको असा विचार करत संकल्प ढकलत न्यायचा, मग तोडगा काढायचा… आठवड्यातून तीन वेळा करू या…. मस्त! झालं सुरू त्याप्रमाणे…! काही दिवसांनी हे सुद्धा जड वाटायला लागले… नको… असं करू या, आठवड्यातून दोन दिवस करू… आता निदान ठरवलं आहे तर सुरू ठेवायला काय हरकत आहे, तेवढं तरी स्वतः शी प्रामाणिक राहू या! मग करता करता… आठवड्यातून एक दिवस झाला… मग महिन्यातून एक दिवस झाला… नंतर दोन महिन्यांतून एक दिवस झाला… सहा महिन्यांत संकल्पची गाडी थकली… आणि बंद पडली!! स्वतःलाच माफ करत नको असले संकल्प अशी शपथ घेतली गेली आणि जीवाने निश्वास सोडला… आता पुन्हा नाही बा संकल्पाच्या वाटी जाणार असा निर्णय झाला…
पण पुन्हा सरतं वर्ष आणि नवीन वर्षांची वेळ आली की नवीन संकल्पाची यादी तयार होते, त्यात काय सोपं ते निवडलं जातं आणि ते पूर्णत्वाकडे नेण्यासाठी जीवाचा आटापिटा सुरू होतो… बस झालं… थांब रे आता!
हे असे संकल्पाचे काहीतरी होऊन जाते…
चांगलं काहीतरी हातून घडावे असा संकल्प निश्चित करावा, जर त्याचं टेन्शन घेतलं नाहीतर ते जरूर पूर्णत्वाकडे जाणार!
म्हणून नवीन वर्षात जे समोर येईल ते स्वीकारावं व सकारात्मकतेने सामोरं जावं… यश नक्कीच मिळेल!
सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत!!