मिलिंद बेंडाळे – पर्यावरण अभ्यासक
जागतिक हवामानात बदल होत असल्याने पृथ्वीपुढे मोठे संकट उभे राहिले आहे, हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही. वारंवार हवामान प्रतिकूल होण्याचे प्रमाण वाढले असून, त्यात बळी जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. ही चिंताजनक बाब आहे. त्यातही भारतात २०२४ हे वर्ष अतिशय प्रतिकूल हवामानाचे वर्ष म्हणून नोंदले गेले आहे. मानवी जीवन, निसर्गसंपदा आणि शेतीवरही त्याचा प्रतिकूल परिणाम झाला आहे.
गेल्या आठवड्यात हवामान बदलाच्या परिणामाविषयीचा ‘भारतातील अत्यंत प्रतिकूल हवामान अहवाल’ नावाचा एक अहवाल प्रसिद्ध झाला. देशात प्रतिकूल हवामान असणाऱ्या दिवसांची संख्या कशी वाढते आहे आणि त्याचा मानवी जीवनावर तसेच अन्य बाबींवर कसा परिणाम होत आहे, याचा उल्लेख त्यात करण्यात आला. गेल्या दोन वर्षांच्या म्हणजेच २०२२ आणि २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये भारतातील अतितीव्र हवामानबदलाच्या घटनांचा अधिक गंभीर परिणाम झाला आहे. याच अहवालात म्हटले आहे की, या वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांमधील २७४ दिवसांपैकी जवळपास २५५ दिवस भारतात कुठे ना कुठे अत्यंत प्रतिकूल हवामान होते. यामध्ये उष्ण वारे, थंड वारे, चक्रीवादळ, विजा चमकणे, अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलन तसेच अत्यंत प्रतिकूल हवामान घटना ही एक हवामान स्थिती आहे, जी सामान्यपेक्षा जास्त तीव्र किंवा वेगळी असते. हवामान खूप गरम होते, खूप थंड होते, खूप जास्त पाऊस पडतो, मोठे वादळ येते तेव्हा त्याला तीव्र हवामान घटना म्हणतात. या घटनांमुळे फार मोठे नुकसान होते. त्यात पिकांचा नाश, पूर किंवा एखाद्या भागात तीव्र पाणीटंचाई आदींचा समावेश होतो. ‘स्टेट ऑफ एक्स्ट्रीम वेदर रिपोर्ट इन इंडिया’नुसार, गेल्या ९ महिन्यांमध्ये अतिवृष्टीमुळे केवळ लोकांचाच मृत्यू झाला नाही, तर ३२ लाख हेक्टरवरील पिके नष्ट झाली. एवढेच नाही तर वादळ, वीज पडणे आदी घटनांमुळे यावर्षी आतापर्यंत सुमारे २.३६ लाख घरांचे नुकसान झाले.
याआधी, म्हणजे २०२३ बद्दल बोलायचे झाले, तर हवामानबदलाच्या २३५ घटना घडून २,९२३ लोकांचा जीव गेला होता. २०२२ मध्ये २४१ अतितीव्र हवामानबदलाच्या घटनांमध्ये २,७५५ लोकांचा मृत्यू झाला होता. अहवालानुसार, यावर्षीचा जानेवारी हा १९०१ नंतरचा नववा सर्वात कोरडा महिना होता. त्याच वेळी फेब्रुवारीमध्ये गेल्या १२३ वर्षांचा विक्रम मोडत दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च किमान तापमानाची नोंद झाली. मे २०२४ हा महिना विक्रमी चौथ्या क्रमांकावरील सर्वोच्च सरासरी तापमानाचा महिना ठरला आणि जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या सर्व महिन्यांमध्ये १९०१ नंतरचे सर्वोच्च किमान तापमान नोंदवले गेले. २०२४ मध्ये भारताच्या वायव्य भागात जानेवारी हा सर्वात कोरडा महिना होता आणि जुलैमध्ये या भागात सर्वाधिक तापमान नोंदवले गेले.
गेल्या वर्षीच्या तुलनेत भारतातील २७ राज्यांमध्ये तीव्र हवामानाच्या घटनांमध्ये वाढ झाली. उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि केरळसारख्या राज्यांमध्ये अशा दिवसांची संख्या आता ४० दिवसांपेक्षा जास्त झाली आहे. मध्य प्रदेशमध्येही अशा हवामानाचा गेल्या वर्षीपेक्षा ३८ जास्त दिवस सामना करावा लागला. ‘सीएसई’च्या महासंचालक सुनीता नारायण यांच्या म्हणण्यानुसार, पूर्वी अशा घटना शंभर वर्षांमधून एकदा घडत होत्या. आता त्या दर पाच वर्षांनी घडत आहेत. या घटनांची संख्यादेखील सतत वाढत आहे आणि त्याचा सर्वात मोठा परिणाम गरीब आणि असुरक्षित घटकांवर होतो. त्यांच्या जीवित आणि मालमत्तेची हानी होते.
२०२४ मध्ये वर्षभरात उष्णतेच्या लाटेच्या ७७ घटना घडल्या. उन्हाळी हंगामामध्ये उष्णतेची लाट ५० दिवसांपेक्षा जास्त काळ राहण्याचे हे सलग तिसरे वर्ष होते, तर २०२४ मध्ये जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत २०२३ च्या तुलनेत २० दिवस अधिक तीव्र हवामानाच्या घटना घडल्या. त्यामुळे पिकांचे अधिक नुकसान झाले.
भारतातील हवामानातील तीव्र बदलाच्या घटनांमध्ये वाढ हा हवामान बदलाचा परिणाम आहे. भारतातील हवामानबदलांच्या घटनांच्या प्रभावामुळे नद्यांचे प्रवाह बदलत आहेत. तसेच जलव्यवस्थापन यंत्रणाही कमकुवत होत आहे. या सर्व कारणांमुळे भारतात अतिवृष्टीच्या घटना वाढू लागल्या आहेत. समाजातील समाजातील गरीब आणि असुरक्षित घटकांना सर्वात जास्त त्रास देत आहेत.