Monday, March 24, 2025
Homeसाप्ताहिककोलाजबुद्धिबळासह टी-२० क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी

बुद्धिबळासह टी-२० क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी

क्रीडा समीक्षक

भारतासाठी उल्लेखनीय क्रीडा वर्ष

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाने हुलकावणी दिली तरी बुद्धिबळासह टी-२० क्रिकेटमधील ऐतिहासिक कामगिरीमुळे भारतासाठी २०२४ हे सुवर्ण क्रीडा वर्ष ठरले. ऑलिम्पिकमधील अर्धा डझन आणि पॅरालिम्पिकमधील विक्रमी २९ पदकांनी आपल्या टॅलेंटची खात्री संपूर्ण जगाला पटली.

क्रिकेटमधील दबदबा कायम

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा दबदबा कायम आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या संयुक्त विद्यमाने जून महिन्यात झालेला २०२४ टी-२० वर्ल्डकप जिंकून रोहित शर्मा आणि सहकाऱ्यांनी आयसीसी ट्रॉफीची ११ वर्षांची प्रतीक्षा संपवली. मेन इन ब्ल्यू संघाने अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून २००७ नंतर टी-२० वर्ल्डकपमध्ये बाजी मारली. या विश्वचषक स्पर्धेत अपराजित राहून जेतेपद पटकावणारा भारत हा जगातील पहिला संघ ठरला. या जेतेपदाने देशभरातील क्रिकेट चाहत्यांना मोठा आनंद दिला. विशेषत: गेल्या वर्षी (नोव्हेंबर २०२३) मायदेशात झालेल्या वनडे विश्वचषक स्पर्धेच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवाचे शल्य कमी होण्यास मदत झाली.

डी. गुकेश सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन

२०२४ वर्ष भारताच्या बुद्धिबळ जगतासाठी संस्मरणीय ठरले आहे. बुडापेस्ट येथे झालेल्या ४५व्या फिडे बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये आपल्या पुरुष आणि महिला संघांनी सुवर्णपदके जिंकली. पुरुष संघाने स्लोव्हेनियावर मात केली. या संघात डी. गुकेश, प्रग्नानंध आर, अर्जुन एरिगाईसी आणि विदित गुजराथी सारख्या प्रतिभावान खेळाडूंचा समावेश होता. हरिका द्रोणवल्ली, वैशाली आर., दिव्या देशमुख, वंतिका अग्रवाल आणि तानिया सचदेव यांचा समावेश असलेल्या महिला संघाने जबरदस्त पुनरागमनासह विजेतेपदावर नाव कोरले. याच महिन्यात सिंगापूर येथे झालेल्या फिडे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत १८ वर्षीय डी. गुकेश याने गतविजेता चीनच्या डिंग लिरेनला पराभूत करून इतिहास रचला. तो सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन आहे. माजी जगज्जेता विश्वनाथन आनंद यांच्यानंतर फिडे बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा गुकेश हा भारताचा केवळ दुसरा खेळाडू आहे. दोघांमध्ये आणखी एक साम्य म्हणजे आनंद हा त्याचा आदर्श आणि गुरू आहे. गुकेशने गुरूच्या पावलावर पाऊल ठेवत आनंद यांना अनोखी गुरुदक्षिणा दिली आहे. जगज्जेतेपद मिळवणारी गुरू आणि शिष्याची ही पहिली जोडी आहे.

पॅरिस ऑलिम्पिक; थोडी खुशी, ज्यादा गम

फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने एक रौप्य आणि पाच कांस्य अशी सहा पदके मिळवली. ऑलिम्पिक इतिहासातील भारताची ही तिसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली. अनुभवी नेमबाजांनी निराशा केली तरी २९ वर्षीय रेल्वे तिकीट कलेक्टर महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसळेने पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री-पोझिशन स्पर्धेत कांस्यपदक मिळवत पदकांचे खाते उघडले. युवा मनू भाकरने दोन कांस्यपदकांसह इतिहास रचला. एकाच स्पर्धेत दोन पदके जिंकणारी ती भारताची एकमेव क्रीडापटू ठरली. पुरुष हॉकी संघाने १९७२ नंतर ऐतिहासिक कांस्यपदकासह प्रथमच बॅक-टू-बॅक ऑलिम्पिक पदक मिळवण्याची करामत साधली. कुस्तीमध्ये फ्रीस्टाइल प्रकारात ५७ किलो वजनी गटात ३१ वर्षीय अमन सेहरावतने कांस्यपदक मिळवले. तो भारताचा सर्वात तरुण ऑलिम्पिक पदकविजेता बनला.

सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा त्याचे पदक कायम राखेल, अशी अपेक्षा होती. मात्र त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी हे सर्वोत्तम पदक ठरले तरी चोप्राला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. पाकिस्तानच्या अर्शद नदीमच्या रूपाने सलग दुसऱ्या खेपेस भालाफेकमधील गोल्ड मेडल आशिया आले तरी त्याला नीरजसह अन्य प्रतिस्पर्ध्यांनी अपेक्षित चुरस दिली नाही, हेही आवर्जून नमूद करावे लागेल.

पॅरालिम्पिकमध्ये रेकॉर्डब्रेक कामगिरी

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने आपली आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करताना सात सुवर्ण, नऊ रौप्य आणि १३ कांस्य अशा एकूण २९ पदकांसह पदकतालिकेत १८वे स्थान पटकावले. या अतुलनीय कामगिरीने टोक्यो २०२० पॅरालिम्पिकमधील (१९ पदके) कामगिरी मागे टाकत देशाच्या पॅरालिम्पिक इतिहासात एक नवीन अध्याय सुरू केला.

रोहन बोपण्णा : ग्रँडस्लॅम स्पर्धेतील नवा माईलस्टोन

टेनिसमध्ये सांघिक कामगिरी जेमतेम राहिली तरी अनुभवी टेनिस स्टार रोहन बोपण्णाने २०२४ ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये इतिहास रचला. या स्पर्धेत मॅथ्यू एब्डेनसोबत खेळताना अंतिम फेरीत सिमोन बोलेली आणि अँड्रिया वावसोरी जोडीचा पराभव करत पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले. ४३व्या वर्षी ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा जिंकणारा बोपण्णा हा सर्वात वयस्कर पुरुष खेळाडू बनला. वय हा केवळ आकडा असतो. कौशल्य आणि दृढनिश्चयाच्या जोरावर पन्नाशीतही जागतिक पातळीवर सर्वोत्तम कामगिरी करता येते, हे त्याने दाखवून दिले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -