मुंबई : दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात खेळवण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने शानदार विजय मिळवला आहे. या विजयासोबत दक्षिण आफ्रिका २०२५मध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचला आहे.
दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानला पहिल्या कसोटी सामन्यात २ विकेटनी हरवले.. एकवेळ अशी होती की दक्षिण आफ्रिकेचे ८ विकेट पडले होते. तेव्हा त्यांना ५०हून अधिक धावा हव्या होत्या. यावेळेस गोलंदाज मार्को यानसेन आणि रबाडाने चांगली कामगिरी करत संघाला फायनलमध्ये पोहोचवले.
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी १२१ धावा हव्या होत्या. त्यांनी या दरम्यान ३ विकेट गमावल्या होत्या. चौथ्या दिवसाचा खेळादरम्यान एडन मार्करमने २२ धावांपासून फलंदाजी करण्यासाठी उतरला. मात्र तो ३७ धावा करून बाद झाला. तर टेंबा बावुमाने ४० धावांची खेळी केली. डेविड बेडिंग्हमने १४ धावा केल्या. अखेरीस मार्को यानसेन आणि कगिसो रबाडाने शानदार फलंदाजी केली. त्याच्या जोरावर संघाला विजय मिळवता आला. ट्रिस्टन स्टब्स १ धावा करून बाद झाला होता.
पाकिस्तानसाठी शानदार गोलंदाजी करताना मोहम्मद अब्बासने ६ विकेट आपल्या नावे केले. अब्बासने टोनी डी जॉर्जी, एडन मार्करम, ट्रिस्टन स्टब्स, टेंबा बावुमा, डेविड बेडिंग्हम आणि कोर्बिन बॉश यांना बाद केले. पाकिस्तानच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा आधीच मावळल्या आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एक संघ फायनलमध्ये दुसरे स्थान मिळवू शकतो.