Tuesday, April 22, 2025
Homeसंपादकीयरविवार मंथनगणित आणि विज्ञानाची दृष्टी रुजवणारे व्यक्तिमत्त्व

गणित आणि विज्ञानाची दृष्टी रुजवणारे व्यक्तिमत्त्व

महाराष्ट्रात विज्ञान आणि गणिताच्या प्रसारासाठी मौलिक काम करणाऱ्या व्यक्तींपैकी हेमचंद्र प्रधान हे नाव अतिशय महत्त्वाचे आहे. एकाच जन्मात काही माणसे डोंगराएवढे काम उभे करतात.आपल्या कामाचा परिघ निश्चित करून अनेक दिशांनी त्याचा विस्तार करतात. ‘सर्वांसाठी गणित-विज्ञान’ हे ध्येय समोर ठेवून हेमचंद्र प्रधानांनी लेखन, संशोधन, शिक्षण अशा विविध अंगांनी भरीव काम केले. शालांत परीक्षेत ते बोर्डात प्रथम आले होते. ठाण्याच्या मो. ह. विद्यालयात त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. मुंबई विद्यापीठात भरघोस यश मिळवून ते पुढील शिक्षणाकरिता अमेरिकेत रवाना झाले. अणुभौतिक शास्त्रात पीएच.डी. पदवी प्राप्त केल्यानंतर विदेशातील प्रसिद्ध विद्यापीठामध्ये जवळपास तीन वर्षे त्यांनी अध्यापन आणि संशोधन कार्य केले. मात्र त्यानंतर त्यांनी मायभूमीत परतण्याचा निर्णय घेतला.

रुईया महाविद्यालयातील अध्यापनाच्या कार्यकाळात विद्यार्थ्यांची गरज ओळखून प्रधान सरांनी व्यवसाय मार्गदर्शन विभागाची स्थापना केली. १९८८ साली होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रात प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले. १९९९ ते २००८ या काळात ते केंद्राचे अधिष्ठाता तर २००८ ते २०११ या काळात केंद्राचे संचालक म्हणून ते कार्यरत राहिले. मराठी विज्ञान परिषद आणि परिषदेची विज्ञानपत्रिका दोन्हींकरिता सरांचे योगदान मोठे आहे. आदिवासी भागात शिक्षणाचे मूलभूत काम उभे करणाऱ्या ग्राममंगल या संस्थेचे शैक्षणिक सल्लागार म्हणून त्यांनी आठ वर्षे काम केले. रचनावादी शिक्षणाच्या दृष्टिकोनातून शालेय स्तरावरील गणित व विज्ञानाचा विचार सरांनी नेहमी डोळ्यांसमोर ठेवला. शाळांमधील विज्ञान व गणिताचे अध्ययन-अध्यापन गुणवत्तापूर्ण व्हावे. याकरिता शिक्षणाच्या कार्यशाळा, प्रशिक्षण, गणित प्रयोगशाळा, संशोधन याकडे लक्ष केंद्रित केले.

कुमार विश्वकोशाकरिता सरांनी केलेले काम महत्त्वाचे आहे. चौदा ते अठरा वयोगटातील मुलांपर्यंत विज्ञानातील संकल्पना पोहोचवण्याची अपरिहार्यता त्यांनी जाणली होती. सृष्टी विज्ञान गाथेच्या संपादनात सरांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या गाथेच्या मलपृष्ठावर असे म्हटले आहे की, ‘मराठी वाङ्मय हा पहिलाच प्रयत्न आहे.’ प्रधान सरांच्या एका पुस्तकाचे नाव आहे, ‘विज्ञान शिक्षण नव्या वाटा’ या पुस्तकात विज्ञान आणि विज्ञान शिक्षणातील नव्या वाटा, उपक्रम, घटना यांचा शोध सरांनी घेतला आहे. तसेच गणित आणि तंत्रज्ञानाला विज्ञानाशी जोडून चर्चा केली आहे.

“विज्ञान शिक्षण हे साधन नाही तर ती दृष्टी आहे, हे रुजवणे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी गरजेचे आहे.” हा ध्यास घेऊन आयुष्यभर कार्यरत राहणाऱ्या हेमचंद्र प्रधान सरांना भावपूर्ण आदरांजली!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -