माेरपीस – पूजा काळे
बडे अच्छे लगते हैं… ये धरती, ये नदिया, ये रैन्ना और तुम… तुम मधलं सर्वस्व तुला नाही कळणार. हो… हो… तुला नाही कळणार माझी भाषा, कारण आपल्यात आहेत बदलत्या काळ रेषा…! परिघाच्या पल्याड कडेलोट करतोस भावनांचा. तीनशे पासष्ट दिवस, बारा महिने, चोवीस तास, क्षणोक्षणी घड्याळाच्या काट्यावर तुझ्याशी, तुझ्याबरोबर अगणित नाती, गोती, भाव, भावना, सुख-दुख मांडत, कधी रडले, कधी हासले. कधी पडता पडता सावरले, तर कधी सावरताना आपटले, गुंतता हृदयी भावनिक झाले. पाणी आटल्या नयनामध्ये कसे जमावे मोती, दूर किनारी वाहत गेल्या आसवांच्या ज्योती. ज्योतीमधूनी उजळत यावी एक पहाट न्यारी, रोज नव्याने कर्तव्याची करेन दुनियादारी.
हे प्रभाकरा, या अशा महाकाय सागरात तुला विसर्जित बघण्याचा काळ म्हणजे, आम्हा सामान्यांसाठी हळवा क्षण. जुन्याला घेऊन, नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज, पण मनातली हुरहुर, सांगून तरी कळेल का तुला? खरंतर ती अनुभवण्याची गोष्ट आहे. वर्ष अखेरीला नवे संकल्प सोडायचे. त्यात जुन्या चुका शक्यतो टाळायचा प्रयत्न करायचा. झालंच तर एखादे वेळी स्वभाव सुद्धा बदलायचा, प्रगल्भ होताना अवधान बाळगायचं. पण ओघाने डायट, योगा वगैरेची लांबलचक लिस्ट करायची. शिस्त लावायची. म्हटलं तर ही सगळी सुदृढ मनाची लक्षणं आहेत. तू सोडून जाताना, तुला सोडून जाताना या दोन वाक्यांमधला ‘सोडून जातानाचा’ अर्थ, त्यातल्या दुखाची झळ वेगळी आहे. त्यांच्या अस्पष्ट रेषांमधलं अंतर फारसं कमी नाहीए. सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंतच्या प्रवासात आपण घटका, दोन घटका सुखदुःखाच्या मोजत असतो. त्यातला एकेक दिवस म्हणजे जगण्याचा एक साकव. जो प्रश्नांची उकल करून, उत्तर शोधून त्यात विविधरंग भरतो. साकव जो निर्भय बनवतो. वय वाढतं तसा अनुभव वाढतो. येणारे दिवस, महिने, वर्ष चिरतरुण ठेवताना अव्याहतपणे एकच गोष्ट यात घडत असते, ती म्हणजे कॅलेंडरवरील बदलणाऱ्या तारखा. यात महिने सरतात. वर्षे बोलतात. ऋतू अवतरतात. जगाच्या नकाशावर नवीन काहीतरी घडत असतं. अधिक वेगाने डिसेंबर येतो ना, तेव्हा तर घड्याळाची टिकटिक उगाचं वाढलेली वाटते. काटेसुद्धा वेग पकडतात. सेकंदामधूनी वेळ सरसर निसटत, अधिक वेगाने धावते. मला कळू लागलं, तेव्हापासूनचा अनुभव आहे हा माझा. मग पानगळतीतल्या दिवसातले जुनेचं हिशेब नव्याने पटावर येतात. कमी, अधिक, चांगलं, वाईट याचा ग्राफ नजरेसमोर येतो. भावबंध, लागेबंध सळसळून उठतात. त्यावेळी चपळाईने निसटण्याची तुझी कला मला अधिक बैचेन करते. तुझ्या अस्तानिशी कधी उभारी घेऊ शकणार नाहीत अशी नाती, गोती, मैत्रेय अस्त पावलेले असतात. तू उद्याची स्वप्न तरी घेऊन येतोस. पण मनातली जळमट जायला किती काळ जाईल सांगता येत नाही. आपलं काहीही नसतं, हे कळायला सुद्धा बरंच वय निघून जातं. एकेक शब्द जहरी लागतो. परके आपले आणि आपले परके होतात. कालपरत्वे अंतर वाढतं. इथं एक वर्ष काय देतं, यापेक्षा काय हिरावून नेतं हे महत्त्वाचं ठरतं.
नाताळच्या पूर्वसंध्येपासूनचं थंडीचा सूर जाणवतो. वर्षाच्या समाप्तीला नववर्षाची सुरुवात, म्हटलं तर अवघड, म्हटलं तर कठीण. आठवणी ठेवून जाव्यात की घेऊन जाव्यात अशा विमनस्क अवस्थेत मनुष्यानं दुखाला कवटळावं की ते दूर सारत गगन भरारी घ्यावी. नववर्षासंगे आलेलं सुख स्वीकारण्याचा काळ. नव्या दमानं अभिव्यक्त होण्याचा काळ, वाहत्या पाण्याकडून शिकण्याचा काळ ते पांढरे केस आणि सुरकुल्या चेहऱ्याकडून समजून घेण्याचा काळ, केवढी तफावत बघा!! काय घ्यावं, काय न्यावं, काय शिलकीत ठेवावं, काय वाटून द्यावं या पलीकडे अस्ताला सरणारी शेंदरी सायंकाळ, खुणावणारा सूर्योदय, सोनेरी किरणात नाहणारी सकाळ, कमालीची अस्वस्थ-बैचेन करणारी ठरते. कॅलेंडरचे एकेक पान, वेळ-काळाची आवर्तन बाजूस सारत तू येतोस आणि जातोस या चक्रात सोडून मला. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आलेला नाताळ त्यायोगे सात दिवसांनी येणारं नववर्ष म्हणजे सात दिन का साथ देणारी आनंददायी सहल म्हणता येईल. गोड गुलाबी थंडीचा नजराणा आला दारी, पवित्र सण नाताळसह करू वर्ष अखेर साजरी. सांता, कंदील, रोषणाई, दुकानातली लगबग याशिवाय दररोज सकाळ, संध्याकाळची केशरी उन्हं रोमांचित करतात मला. आरास कंदिलासह खिडक्या सजतात. घराघरातल्या मंद उजेडात चमकून निघालेला ख्रिसमस ट्री, संगीताचे स्वर, डिमलाईटमधले हॉल आणि चमकत्या पेहरावातली मुलं, मुली. कोरीव तावदानातली झुंबर, मखमली पडदे, वातावरणात भरून राहिलेला केक, फिश, मटण, चिकनचा खमंग वास. वाद्यासहित संगीतात रमणारी, वाजवणारी मुलं. दूरवरून ऐकू येणारा पियानो. एकूणचं भारलेलं वातावरण. जगभरातला ख्रिसमस काय असतो याचा याची देहीचा अनुभव गवसतो.
अनिल कपूर, पद्मिनी कोल्हापुरे यांचा वो सात दिन नावाचा चित्रपट मागे पाहिल्याचे आठवते. रोमांटिक सत्य सात फेऱ्यांत बांधून पूर्णत्वास जाणारा सिनेमा गाजण्याचं प्रमुख आकर्षण म्हणजे हिरोच्या कारकिर्दीची सुरुवात आणि सात दिन नावाखाली निघालेली बारात. लेखाशी संबंधित साधर्म्य नसलेला विषय वर्ष समाप्तीचा विषय ठरू शकतो एवढी ताकद या सात अंकांत सामावलीयं. केवळ नावापुरता विचारात घेतलेला विषय कमाल ताकदीच्या सात अंकात सामावतो. रहस्यमय असा सात अंक, अध्यात्मिक, भाग्यशाली असण्याच्या बहुविध कारणाशी येऊन मिळतो. सातग्रह असलेली पृथ्वी, सप्तसूर, सप्तरंगी कमान, स्वर्ग संबंधित सात पायऱ्या, ज्या या न् त्यानिमित्ताने साताभोवती फिरताना दिसतात. २५ ते ३१ डिसेंबरमधल्या बेभान करणाऱ्या सात दिवस, सात रात्री तुफान गाजतात. अंक बदलतो, चित्र बदलतात, सिद्धता, परिपक्वता येते, जुनं जाऊन नवं येतं. पानगळतीच्या दिवसातल्या शितलहरी गुलाबी दिवसांचे राज्य जगभर पसरवत, कॅथलिक, कोकणी समाजासाठी आनंदाची पर्वणी घेऊन येतात. जगभराचं चित्र पलटायला अधिक काय हवं असतं. नवं राज्य, नवा गडी स्वागताला सजतं. नववर्षाला शुभेच्छा या गतवर्षाच्या निरोपात शब्द सुरमयी क्षणांची सोबत मिसळवून जातात. वाद्रे, माहीम, गिरगाव भागातल्या काही ख्रिस्ती वस्त्यांमध्ये ‘माझे राणी माझे मोगा तुझ्या डोळ्या शोधता ठाव…!’ हा ठाव घेणाऱ्या कोकणी माणसाबरोबर सात दिवसांच्या प्रत्येक भव्य संध्याकाळी गिटार घेऊन तारा छेडीत बसणारा गोवनीज पाहायला मिळतो.
कलासक्त गोवनीज संस्कृती वाटांवर रुळते. स्वागताला उभी ठाकते. संस्कृतीतून पोर्तुगीजांनी मागे ठेवलेल्या छटा जाणवतात. कौलारू टुमदार घरं, लाकडी फर्निचर, कलाकुसर आणि पेंटिंगसहित रंगवलेल्या भिंती भारावून टाकतात. वेगवेगळ्या वळणानिशी एकत्रित आलेल्या रहस्यमय गल्ल्या, रस्ते. छोटेखानी चर्च. चर्चसमोर ओळीत मांडलेल्या खुर्च्या. आसपास रंगीत कुंड्यांमध्ये रुळलेली झाडं. संध्याकाळच्या मेणबत्त्यात प्रार्थना करण्याच्या ठरलेल्या वेळा. काही लिहावं, अभिव्यक्त व्हावं वाटताना, एका प्रश्नाने अचानक जाग येते. ‘याच्यापुढे अधिक काय तुझ्याकडे’? मोठी चपराक बसते. मी नि:शब्द होते. आपण कोणी नाही, आपल्याकडे काही नाही ही जाणीव अस्वस्थ करते मनाला. तरीही अनपेक्षितपणे वाटेत भेटलेल्याला तसंच जमिनीवर आणण्याचं काम करणाऱ्या गुरूंना सलाम करते मी. ईश्वराचे आभार मानण्यात धन्यता मानते.
तू सोडून जाताना, तुला सोडून जाताना, यातल्या तू सोडून जातानाची भावना माझ्यासारखी सगळ्यांचीचं असू शकते.
निसटतो क्षण न् क्षण
झरझर सेकंदातूनी
आठवांचे उमाळे फुटती
पाझरती हृदयातूनी…
कप्पा कप्पा साठलेला
तुझ्याकडे रिक्त केला
जीवनाकडे बघण्याचे
तू मर्म देऊनी गेला…
चोवीसाव्या काळोखात
पंचविसावं प्रसवावं
मोकळा श्वास घेण्यासी
आयुष्य नव्यानं जगावं… गोष्ट तशी नाजूक. तुला सोडून जाताना २०२४ हळवं झालयं. माझ्या मनातील त्याला केव्हाचीचं तिलांजली दिलीय. मुक्त केलयं भावनांना. अंतर्मनातला आवाज मात्र ऐकता आला पाहिजे, एवढं सक्षम करणार आहे स्व:ताला. शब्दांचा जिवंतपणा जपून अवती भवती शब्दसामर्थाचे झरे वाहू द्यायचेत. निर्भीड होते आहे आणि कायम राहीन यायोगे अस्तित्वाला सिद्द करण्यासाठी मनात खूणगाठ पक्की बांधलीय. उजाळा देणाऱ्या आठवणीमध्ये अंतरंग कायमचं तेवत ठेवेन. असेन मी नसेन मी, परी तुला कळेन मी. येणाऱ्या काळातले रस्ते, वळणं कितीही अवघड असली तरीही, मार्गक्रमण करत रहायचयं उद्याचा सूर्योदय पाहण्यासाठी. कारण निरोप घेऊन तू जातोस… पण थोडासा इथेचं राहतोस…