कामाला उशीर झाल्यामुळे कंत्राटदाराला होणार दंड
मुंबई : अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळ कृष्ण गोखले उड्डाणपुलाची (Gokhale Bridge) दुसरी लोखंडी तुळई खाली आणण्याचे काम अखेरीस पूर्ण झाले आहे. तुळई खाली आणण्याचे काम नोव्हेंबरमध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र ते खूपच लांबले. डिसेंबरमध्येही तुळई खाली आणल्यानंतर बेअरिंग हटवण्याचे काम २५ डिसेंबर रोजी पूर्ण झाले आहे. यानंतर आता पुढील कामे करण्यात येणार असून रेल्वे हद्दीतील काम पूर्ण करण्यास विलंब झाल्यामुळे कंत्राटदाराला दंड केला जाणार आहे. कंत्राटदाराला ३ कोटींपेक्षा अधिक दंड होण्याची शक्यता आहे.
Mumbai Pollution : मुंबईतील शहरांवर धुक्याचे साम्राज्य, थंडीच्या मोसमात वाढले प्रदूषण!
अंधेरी पूर्व–पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले पुलाची एक बाजू २६ फेब्रुवारी रोजी सुरू झाल्यानंतर दुसरी बाजू कधी सुरू होणार याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. उड्डाणपुलाची दुसरी लोखंडी तुळई बसवून तीन महिने झाले तरी ही तुळई खाली आणण्याचे काम पूर्ण झाले नव्हते. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही तुळई खाली आणली. मात्र या तुळईचे बेअरींग हटवून तुळई स्थापन करण्यास आणखी पंधरा दिवसांचा कालावधी लागला असून ही कामे आता अखेर २५ डिसेंबरला पूर्ण झाली आहेत. त्यामुळे पुलाच्या दोन्ही तुळई आता समान पातळीवर आल्या आहेत. रेल्वे हद्दीतील काम पूर्ण करण्यासाठी १५ नोव्हेंबरची मुदत देण्यात आली होती. ही मुदत तब्बल दीड महिना पुढे गेली आहे. त्यामुळे कंत्राटदाराला दंड लावणार का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. नोव्हेंबर २०२२ पूलाचे बांधकाम सुरू झाल्यानंतर १५ महिन्यांनी पुलाची एक बाजू सुरू होऊ शकली.
कंत्राटदाराला किमान तीन कोटीचा दंड
तुळई बसवण्यासाठी सुटे भाग आणण्याकरीता कंत्राटदाराने उशीर केल्याने कंत्राटदाराला पालिका प्रशासनाने नवीन वेळापत्रक दिले होते. मात्र ते वेळापत्रकही पाळणे कंत्राटदाराला जमलेले नाही. त्यामुळे पालिकेने आधीच १५ नोव्हेंबरपर्यंत रेल्वेच्या हद्दीतील कामे पूर्ण न झाल्यास ३ कोटीचा दंड आकारण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे ३ कोटींचा दंड कंत्राटदाराला लावण्यात येणार आहेत. त्यापुढे जितके दिवस उशीर झाला तितक्या दिवसांचा हिशोब करून त्याला दंड लावण्यात येईल अशी माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.