Friday, March 28, 2025
Homeसाप्ताहिकरिलॅक्सवणव्यातली होरपळ आणि शांततेची धग...!

वणव्यातली होरपळ आणि शांततेची धग…!

राजरंग – राज चिंचणकर

प्रायोगिक रंगभूमीवर विविध प्रयोग करण्यात सध्या नव्या दमाचे रंगकर्मी व्यस्त असलेले दिसून येत आहेत. अनेक प्रकारच्या नाट्यकृतींनी सध्या प्रायोगिक रंगमंच बहरला आहे. याच मांदियाळीत ‘वणवा’ हे नाटक सध्या लक्ष वेधून घेत आहे. ज्येष्ठ साहित्यिक दि.बा.मोकाशी यांच्या ‘वणवा’ या कथासंग्रहातल्या एका कथेवरून हे नाटक मंचित झाले आहे. ‘इनकम्प्लिट थिएटर’ व ‘रंगभूमी डॉट कॉम’ या दोन संस्थांनी या नाटकाची निर्मिती केली असून, नाट्यरूपांतर व दिग्दर्शन शिवम पंचभाई या युवा रंगकर्मीने केले आहे.

वाहतो ही दुर्वांची जुडी’ची ६० वर्षे…

शहरी जीवनापासून दूर असलेल्या आदिवासी समाजाचे जनजीवन रेखाटणारी; किंबहुना त्यांना सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या घटनांची मांडणी करणारी नाट्यकृती म्हणून ‘वणवा’ या नाटकाचे नाव घ्यावे लागेल. मात्र केवळ एखादी घटनाच नव्हे, तर त्यायोगे आदिवासी कातकरी समाजातल्या माणसांच्या मनातल्या शांततेची धग जाणवून देणारी कलाकृती म्हणून हे नाटक त्याचा ठसा सध्या रंगभूमीवर उमटवत आहे.

या कथेचा केंद्रबिंदू म्हणजे ‘सरस्वती’ ही कातकरी समाजातली स्त्री! तिचे दैनंदिन आयुष्य रेखाटताना आणि तिचे अस्तित्व ठसवतानाच, एका रात्री जंगलात लागलेल्या वणव्याची धग तिच्या मानसिक आंदोलनाचा एक भाग बनते. जंगल पेटल्यावर जंगलात वास्तव्यास असलेल्या प्राण्यांची आणि त्याचबरोबर आदिवासी पाड्यावरच्या माणसांची होणारी होरपळ, हे नाटक रंगमंचावर उभे करते; परंतु इतकेच करून ते थांबत नाही; तर वणवा शांत झाल्यानंतर सर्वत्र राख झालेल्या जंगलाबरोबरच, मनात घर करून राहिलेल्या शांततेची धग हे नाटक आविष्कृत करते.

‘आज वणवा विझवला; पण पुन्हा तो येणार नाही हे कशावरून?’, अशा पद्धतीची भविष्यकालीन भीती असो किंवा ‘फक्त बघत राहणे म्हणजे आपण भित्रे आहोत का?’, अशी शंका घेणे असो; हा ‘वणवा’ त्याची उत्तरे रंगमंचावर मांडत गेला आहे. कातकरी समाजाच्या नजरेतून आणि त्यांचीच बोलीभाषा अंगिकारत हा ‘वणवा’ रंगमंचावर दृगोच्चर झाला आहे. हे सर्व करताना या नाटक मंडळींनी कातकरी आदिवासी समाज, जंगल, मानवी स्वभाववैशिष्ट्ये; तसेच पर्यावरणासंबंधी केलेले भाष्यही महत्त्वाचे आहे. भूत, वर्तमान व भविष्याचा लेखाजोखा मांडताना आणि काळाचा एकत्रित धागा विणताना; रोज शेकोटी पेटवणाऱ्या माणसाचा संदर्भ देत संभाव्य वणव्याचे केलेले सूचन परिणामकारक आहे.

समृद्धी खडके हिच्या प्रखर अभिनयातून या वणव्याची धग रंगमंचीय अवकाशात विस्तृत पसरली आहे. यात तिने विविध पात्रे रंगवताना त्या-त्या व्यक्तिरेखांना त्यांचा चेहरा बहाल केला असल्याचे दिसून येते. रश्मी माळी व प्रज्ञा समर्थ या दोघींच्या नृत्याच्या आकृतिबंधाद्वारे मंचित झालेला नाट्यपरिणाम लयबद्ध आहे. यश पोतनीसची प्रकाशयोजना, तसेच पार्थ घासकडबी व इंद्रनील हिरवे यांचे पार्श्वसंगीत; या नाटकाची पात्रे बनूनच समोर येतात आणि त्यायोगे हा ‘वणवा’ रंगमंचावर अधिक उजळत गेला आहे. प्रायोगिक रंगभूमीवर सध्या या नाटकाचे प्रयोग सुरू असून, हा ‘वणवा’ एकूणच मनोरंजनाच्या गर्दीत त्याचे अस्तित्व ठसवण्याचे काम प्रयत्नपूर्वक करत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -