रवींद्र तांबे
महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विभाग व विविध पदवी अभ्यासक्रम असो, दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले जाते. यासाठी शालेय क्रीडा समिती स्थापन करण्यात येते. त्याला अनुसरून शाळेतील मुलांची पटसंख्या लक्षात घेऊन गट तयार केले जातात. त्यानंतर त्या गटांना नावे व त्या गटांचा गट प्रमुख निवडला जातो. गटांच्या गट प्रमुखांची निवड झाल्यानंतर प्रत्येक गटाचे गट प्रमुख इतर विद्यार्थ्यांची आपल्या गटात निवड करतात. काही वेळा विद्यार्थ्यांच्या नावाच्या चिठ्या तयार करून एका बॉक्समध्ये ठेवल्या जातात. त्यानंतर गट प्रमुख एक चिठ्ठी उचलतो. त्या चिठ्ठीत ज्याचे नाव असेल तो त्या गटात. काही वेळा एकमेकांच्या सहमताने गटात विद्यार्थी घेतले जातात. काही ठिकाणी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा लक्षात घेऊन शालेय स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना इजा होऊ नये म्हणून सहभागी करून घेत नाहीत. मात्र असे न करता सर्व विद्यार्थ्यांना अशा खेळात सहभागी करून घेतले पाहिजे. मागील वर्षी छत्रपती संभाजीनगर येथील तनिषा बोरामणीकर हिने बुद्धिबळ खेळात राष्ट्रीय स्तरावर केलेल्या कामगिरीमुळे इयत्ता १२ वीमध्ये (वाणिज्य विभाग) १०० टक्के गुण मिळवले. तिला ६०० गुणांपैकी ५८२ गुण मिळाले होते. मात्र तिला १८ क्रीडा गुण दिल्याने तनिषा हिला बारावीमध्ये १०० टक्के गुण मिळाले. तेव्हा विद्यार्थ्यांनी खेळाकडे दुर्लक्ष करू नये. मला पण बी. एड. प्रवेशाच्या वेळी क्रीडा गुणामुळे ३ टक्के गुण वाढले होते.
शालेय किंवा महाविद्यालयीन क्रीडा महोत्सवामध्ये सांघिक व मैदानी खेळ असतात. सांघिक खेळामध्ये कबड्डी, खो-खो, क्रिकेट, हॉलीबॉल, बास्केटबॉल, हॉकी, लंगडी तर मैदानी खेळात १००, २०० व ४०० मी धावणे, उंच उडी, लांब उडी, भाला फेक, थाळी फेक, गोळा फेक इत्यादींचा समावेश असतो. हा क्रीडा महोत्सव तीन ते पाच दिवस चालतो. विशेष म्हणजे या खेळांसाठी पंच म्हणून माजी विद्यार्थी किंवा आपल्या परिसरात बीपीएड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना निमंत्रित केले जाते. यात ज्या गटाला अधिक गुण मिळतात त्या गटाला वार्षिक बक्षीस वितरण समारंभामध्ये स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरव केला जातो, तर वैयक्तिक खेळामध्ये ज्या खेळाडूचे अधिक गुण होतात त्याला त्या वर्षाचा ‘चॅम्पियन’ म्हणून त्याचा खास सन्मान करण्यात येतो. त्याचप्रमाणे शाळेच्या स्मरणिकेत त्याचा फोटो सुद्धा छापला जातो. यामुळे नवीन विद्यार्थ्यांना एक प्रेरणा मिळते. तसेच ज्या विद्यार्थ्याचा फोटो छापून आल्यावर त्यांचा एक प्रकारे उत्साह वाढत असतो. आपण तालुका अथवा जिल्हा स्तरावर खेळात भाग घेऊ शकलो नाही. मात्र शालेय स्तरावर आपण चांगली कामगिरी केली याचे सुद्धा त्यांना समाधान वाटते. अशा खेळातून प्रोत्साहन मिळाल्यामुळे अभ्यासाकडे अधिक लक्ष देऊन चांगले गुण संपादन करतात. शालेय खेळामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनाला व अभ्यासाला चांगली गती मिळते. तेव्हा विद्यार्थ्यांच्या जीवनात खेळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सध्या काही शाळांना मैदान नसल्यामुळे काही ठरावीक विद्यार्थ्यांना गाडीने घेऊन भाड्याने घेतलेल्या मैदानावर स्पर्धा आयोजित करतात. त्यामुळे इच्छा असून सुद्धा सरावाचे कारण पुढे करून अशा स्पर्धांमध्ये विद्यार्थी सहभागी होणे टाळतात.
सध्याच्या परिस्थितीत विशेषतः शहरात बंदिस्त शिक्षण चालते. शाळेत एकदा मुले गेली की बाहेरून गेटला कुलूप लावून घेतले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोकळेपणा वाटत नाही. याचा परिणाम आवड असून सुद्धा मुले अशा महोत्सवात भाग घेत नाहीत. यासाठी शाळेची स्थापना करीत असताना त्या शाळेचे स्वत:चे मैदान असले पाहिजे. अन्यथा शासन मान्यता देण्यात येऊ नये. आज अनेक नवीन शाळांना स्वतंत्र मैदान नसल्यामुळे खेळाची आवड असून सुद्धा खेळामध्ये विद्यार्थ्यांना सहभागी होता येत नाही. शेवटी सराव महत्त्वाचा असतो. जर नियमित खेळाचा सराव नसेल तर एक दिवस खेळल्यावर दुसऱ्या दिवशी काय होते याची कल्पना विद्यार्थ्यांना असते. त्यामुळे खेळामध्ये असे अनेक विद्यार्थी सहभागी होत नाहीत. तेव्हा विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर त्यांच्या क्रीडा गुणांना वाव मिळण्यासाठी प्रत्येक शाळेच्या मालकीचे मैदान असावे. जर शाळेचे मैदान असेल तरच उत्कृष्ट व शिस्तबद्ध खेळाडू निर्माण होऊ शकतात. याचा परिणाम आपला देश ऑलिम्पिक पदकांमध्ये आपण मागे आहोत. तेव्हा डिसेंबर महिना हा क्रीडा महोत्सवाचा काळ असला तरी त्यातील विविध खेळांत विशेष प्रावीण्य विद्यार्थ्यांनी मिळविले असेल तर त्याच्या क्रीडा गुणांना वाव मिळण्यासाठी शाळा व्यवस्थापकांनी पुढाकार घ्यावा. त्याचबरोबर त्या विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होणार नाही याकडे अधिक लक्ष द्यावे. तसेच क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेश मिळवून द्यावा. यासाठी ८ ते १४ वयोगटातील मुलांची निवड करतात.
राज्यातील क्रीडा प्रबोधिनीचे प्रमुख उद्दिष्ट आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार करणे होय. राज्यात महाराष्ट्र शासनाच्या वतीने क्रीडा प्रबोधिनीची स्थापना ३१ जानेवारी १९९६ रोजी करण्यात आली असून राज्यात ११ ठिकाणी क्रीडा प्रबोधिनी सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्याप्रमाणे मुलांच्या पालकांनी चौकशी करून क्रीडा प्रबोधिनीचा लाभ घ्यावा. असे असले तरी विद्यार्थ्यांना शालेय स्तरावरील क्रीडा महोत्सवामध्ये आपले क्रीडा कौशल्य दाखवावे लागेल.