मुंबई: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अंतर्गत भारत आणि ऑस्ट्रेलिया(Ind vs Aus )यांच्यातील चौथा कसोटी सामना मेलबर्नच्या क्रिकेट मैदानावर खेळवला जात आहे. आज सामन्याचा तिसरा दिवस आहे. भारतीय संघ फलंदाजी करत असून भारताच्या संघाने ३०० पार धावसंख्या केली आहे. त्यांचे ७ विकेट बाद झाले आहेत. वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश कुमार रेड्डी मैदानावर टिच्चून फलंदाजी करत आहेत. भारताने तीनशे पार धावसंख्या नेल्याने त्यांच्यावरील फॉलोऑनचा धोका टळला आहे.
नितीश कुमार रेड्डीने शानदार अर्धशतक ठोकले आहे. तर वॉशिंग्टन सुंदरनेही चांगली साथ दिली आहे. त्याच्या जोरावर भारताला फॉलोऑन टाळता आला आहे. याआधी ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४७४ धावा केल्या होत्या. यात स्टीव्हन स्मिथने १४० धावांची शानदार खेळी केली. तर जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या.
याआधी दुसऱ्या दिवशी भारताकडून पहिल्या डावाची सुरूवात करण्यासाठी रोहित शर्मा आणि यशस्वी जायसवाल उतरले होते. मात्र रोहित शर्मा दुसऱ्याच षटकांत कांगारूंचा कर्णधार पॅट कमिन्सच्या बॉलवर बाद झाला. तर केएल राहुल योग्य लयीत वाटत असतानाच तो पॅट कमिन्सच्या बॉलवर बोल्ड झाला.
यानंतर कोहली आणि यशस्वीने मिळून १०२ धावांची भागीदारी केली. मात्र चोरटी धाव घेण्याच्या नादात यशस्वी जायसवाल ८२ धावांवर बाद झाला. यानंतर विराट कोहलीही बाद झाला. त्यानंतर नाईट वॉचमन म्हणून आलेला आकाशदीपही शून्यावर बाद झाला. या पद्धतीने यशस्वी, कोहली आणि आकाशदीप यांचे विकेट ६ धावांत पडले.