शेवगाव : मकर संक्रांतीचा सण म्हणजे पंतगबाजीला मोठी पर्वणी असते. शेवगाव शहर परिसर देखील त्यास अपवाद नाही. सध्या पतंगबाजीला येथे चांगलेच उधाण आले आहे. मात्र अनेकजण पंतगबाजीच्या या धुमधडाक्यात नायलॉन व विशिष्ट प्रक्रिया केलेला चायना मांजा सर्रास वापरत असतात. या मांज्याने अपघात होतात गळ्यात गुंतून गळा चिरून प्राण गमावल्याची अनेक उदाहरणे आहेत. म्हणूनच या मांज्यावर कायद्याने बंदी असूनही पंतगबाजांना तो सहज उपलब्ध होतो ही वस्तुस्थिती आहे. अशा प्रकारच्या चायना मांजाने येथील एकाच्या तोंडाला कापल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मिरी मार्गावर गुरुवारी सायंकाळी घडली.
अमीन फिरोज शेख (वय १६, रा. इदगाह मैदान, शेवगाव) असे जखमीचे नाव असून त्याच्यावर शेवगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमीन शेख हा न्यू आर्टस् महाविद्यालयामध्ये १२ वीत आहे. तो गुरुवारी शेवगाव – मिरी रस्त्याने वडुले बुद्रक (ता. शेवगाव) येथून शहराकडे येत होता. दरम्यान तो मिरी मार्गावरील फलके किराणा दुकानासमोरुन जात असताना त्याच्या तोंडाला नायलॉन मांजा अडकला. मांजामुळे तोंडापासून ते कानापर्यंत कापले गेले.
Nylon Manja Ban : नायलॉन मांजा निर्मिती, वापर व विक्री करणाऱ्यावर होणार कडक कारवाई!
मांजा धारदार असल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. वाहन वेगात असल्याने तो वाहनासह रस्त्यावर पडल्याने तो बेशुध्द पडला. रक्तस्त्राव सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांनी त्याला त्वरित जवळील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
डॉक्टरांनी त्याच्यावर तातडीने उपचार करून रक्तस्त्राव थांबविला. यात अमीन याच्या तोंडाला आतून व बाहेरून २६ टाके घालण्यात आले आहेत. सुदैवाने या अपघातातून तो वाचला असला, तरी त्याला गंभीर दुखापत झाली आहे.
मकर संक्रातीच्या काळात पतंग उडविणारांची संख्या वाढत आहे. काही व्यावसायिक आर्थिक लालसेपोटी बंदी असलेल्या नायलॉन मांजाची मोठ्या प्रमाणात विक्री करत आहेत. या धारदार मांजामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो. याबाबत पोलीस प्रशासन व शेवगाव नगरपालिका प्रशासनाने त्वरीत नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.