महाअधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधला ऑडीओ संवाद
ठाणे : गृहनिर्माण संस्थांच्या पुर्नविकास तसेच स्वयंपुर्नविकास यासह इतर छोट्या मोठया अडचणी असतील त्या निश्चितपणे सोडवण्यासाठी मुंबईत बैठक घेऊ. असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. सहकार विभाग आणि ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यात आयोजित केलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या महाअधिवेशनामध्ये शनिवारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी भ्रमणध्वनीच्या माध्यमातून हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या जनसमुदायाशी ऑडिओ संवाद साधला. प्रारंभी देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन झाल्यामुळे उपस्थित राहू शकलो नसल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून ठाणे जिल्ह्यातील गृहनिर्माण संस्थांच्या या पहिल्याच अधिवेशनाला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
सहकार विभाग आणि ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील उपवन तलाव परिसरातील भव्य मैदानात २७ ते २९ डिसेंबर या कालावधीत गृहनिर्माण संस्थांचे महाअधिवेशन व प्रदर्शन सुरू आहे. फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांच्या पुढाकाराने ठाण्यात प्रथमच होत असलेल्या महाअधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी गृहनिर्माण संबंधित विविध विविध विषयांवर तज्ञांची चर्चासत्रे पार पडली.
गृहनिर्माण संस्थांच्या महाअधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांशी भ्रमणध्वनीवर ऑडीओ संवाद साधला. गृहनिर्माण संस्थाचे ठाणे जिल्ह्यातील हे पहिलेच अधिवेशन होत असल्याचे सांगत फडणवीस यांनी सर्वांचे स्वागत केले. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची इच्छा होती. परंतु देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन झाल्यामुळे येथे पोहचु शकलो नाही, याबद्दल दिलगीरी व्यक्त करून ते पुढे म्हणाले, या महाअधिवेशनात जे काही निर्णय घेणार आहात ते निर्णय तसेच ज्या काही अडचणी असतील त्या सोडवण्याकरीता मुंबईत बैठक बोलावून सोडवणार असल्याचे सांगितले. मागच्या काळात मुंबईत झालेल्या अधिवेशनाचा गृहनिर्माण संस्थांना फायदा झाला. त्या अधिवेशनातील १८ पैकी १६ मागण्या पुर्ण केल्या आहेत. त्याच धर्तीवर बैठक घेऊन पुर्नविकास अथवा स्वयंपुर्नविकास आणि इतर छोट्या छोट्या अडचणी निश्चितपणे सोडवु. असेही त्यांनी आश्वासित केले.
मुख्यमंत्र्याच्या संवादाचा धागा पकडून प्रविण दरेकर यांनी भाषणात, गृहनिर्माण संस्थांच्या चळवळीच्या पाठीशी स्वतः मुख्यमंत्री असुन मुंबईच्या धर्तीवर ठाणे जिल्ह्यातही स्वयंपूनर्विकासाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. ग्रामीण अर्थव्यवस्था सहकारावर अवलंबून आहे मात्र, दिवसेंदिवस सहकार कमी होत आहे याकडे लक्ष वेधून सहकार क्षेत्राला ताकद देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या महाअधिवेशनात उपस्थित इतर मान्यवरांनीही गृहनिर्माण संस्थाच्या विविध मागण्या व अडचणी विषयी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.