मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यभरात हाडं गोठवणाऱ्या थंडीनं नागरिक कुडकुडले होते. मात्र आता काही जिल्ह्यात हिवाळ्यात मुसळधार पावसाचे स्वरूप पाहायला मिळणार आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे सर्व नागरिकांसह शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे.
कोणत्या भागात पावसाची शक्यता?
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उद्या म्हणजेच २७ डिसेंबर रोजी खान्देश (नाशिक विभाग), मध्य महाराष्ट्र (पुणे विभाग), उत्तर मराठवाडा आणि पच्छिम विभागातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दुसऱ्या दिवशी, २८ डिसेंबर, खान्देश, मराठवाड्याच्या उत्तरेकडील भाग आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अतिरिक्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांना पिकांचे काळजी घेण्याचे आवाहन
पावसाची शक्यता असणाऱ्या भागातील शेतकऱ्यांनी हवामानाच्या अपडेट्सकडे लक्ष द्यावे आणि त्यानुसार त्यांच्या शेती पद्धती समायोजित कराव्यात. हवामानातील या बदलांचे आकलन शेतकऱ्यांसाठी त्यांच्या पिकांचे रक्षण करण्यासाठी आणि संभाव्य हानी कमी करण्यासाठी अत्यावश्यक आहे, असे आवाहन कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले आहे.