Thursday, March 27, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यShirish Patel : नवी मुंबईचे शिल्पकार शिरीष पटेल

Shirish Patel : नवी मुंबईचे शिल्पकार शिरीष पटेल

बाळाची चाहूल लागताच पाळणा आणावा लागतो घरात; चित्र रेखाटण्याआधीच कॅन्व्हास, रंग, कुंचला असावा लागतो हातात. अगदी तस्सच असतं नियोजानाआधीचं पूर्व-नियोजन. फळझाडांची लागवड हे नियोजन, जागेची निवड हे पूर्वनियोजन.

सुधीर ब्रह्मे – ज्येष्ठ पत्रकार

अस्खलित मराठी बोलणारे, राजकीय नेत्याला साजेल अशा पेहरावातले, मृदू आवाज, अत्यंत विनम्र स्वभाव हे शिरीष पटेलांच्या व्यक्तिमत्त्वाचे बाह्यवर्णन. नगर नियोजनातील त्यांचे असामान्य योगदान लक्षात घेता त्यांना नवी मुंबईचे आद्य शिल्पकार म्हणणे वावगे ठरणार नाही. २०१४ ची अखेर. नवी मुंबईच्या कालनिहाय विकासावर आणि सिडकोने केलेल्या कार्यावर पुस्तक मी लिहायला घेतले होते. अडचणी कमी नव्हत्या, अगदी माहिती स्रोतापासून. मी माहितीच्या मार्गावर, अडचणी माझ्या मार्गावर. सिडकोच्या स्थापने पूर्वीचे आणि स्थापनेपासूनच्या पहिल्या दोन दशकांतील घडामोडींचे दस्तावेजीकरण सिडकोमध्येच झालेले नव्हते. एका नव्या शहराच्या विकासासाठी सिडकोची स्थापना झाली १९७० साली. त्यावेळी शहराचे नाव मुक्रर झाले नव्हते. नगररचना असो वा कुठलीही दीर्घकालीन योजना नियोजना इतकेच पूर्वनियोजनही महत्त्वाचे असते. इथे तर शहराबरोबरच संघटनेचे (सिडको) पूर्वनियोजनही महत्त्वाचे होते. जाणून घेण्यासाठी शिरीष पटेल यांना भेटण्याचा सल्ला सिडकोचे एका माजी नियोजनकार सुहास गोखले यांनी दिला. शिरीष पटेल यांच्या कार्यालयात फोन करून मी त्यांना भेटायला गेलो.
मुंबई विद्यापीठाच्या पूर्वेस दलाल स्ट्रीटच्या बाजूला, कंदील रेस्टॉरंटच्या मागे त्यांचे कार्यालय आहे. निश्चित केलेल्या वेळेप्रमाणे सकाळी ९.३० वाजता पटेल यांच्या कार्यालयात मी हजर झालो. स्वागत कक्षात बसलो होतो. अर्ध्या बाह्यांचा सफेद सुती शर्ट, सुती पँट, सफेद केस, सफेद मिशी अशा सर्वशुभ्र परिवेशातली साधी व्यक्ती आली. सत्तरीच्या पुढचे पण उमदे व्यक्तिमत्त्व. विनम्र देहबोली. नावानिशी माझे हसून स्वागत करत त्या व्यक्तीने मला मानानं मीटिंग रूममध्ये गेले. ते साक्षात शिरीष पटेल होते. आम्ही गॅलरीतल्या एका मोकळ्या कोपऱ्यात बसलो. राजाबाई टॉवर स्पष्ट दिसत होता. याच टॉवरमध्ये मी एम.ए.चा अभ्यास केला होता. बसताच स्मितहास्याचा एक कटाक्ष टाकत ते म्हणाले, आर यु कम्फर्टेबल! त्यांनी माझ्यासाठी तांब्याच्या जगमधून काचेच्या ग्लासात पाणी ओतले. “मी ग्रीन टी घेतो तुम्हाला चालेल?” मी म्हटलं, “हो चालेल”. नवी मुंबईची जडणघडण आणि त्यात सिडकोचे योगदान यावर एक पुस्तक लिहितोय याची कल्पना त्यांना दिली आणि म्हटलं, “सर, तुमचे नाव सिडकोचे मुख्य अभियंता यांच्या दालनात वाचले. सिडकोच्या कार्यकारी मंडळात तुम्ही होता. पटेल सांगू लागले, डिसुझानी त्याला ‘नियोजन मंडळ’ म्हटलं होतं. या गटानेच पाया घातला सिडकोचा. सिडकोचे प्राथमिक स्वरूप इथेच निश्चित झाले. बहुपेडी, बहुआयामी आणि बहुजीवी संघटन म्हणून सिडकोची मूलभूत चौकट या गटानेच तयार केली.

सिडकोच्या स्थापनेची शिफारस करणाऱ्या मंडळावर (BMRPB) डिसुझा विशेष निमंत्रित सदस्य होते. त्यांना प्रस्तावित शहराच्या निर्मितीतील बारकाव्यांचे सखोल ज्ञान होते. ‘मार्ग’ मासिकात छापला गेलेला‘बॉम्बे-प्लॅनिंग अँड ड्रिमिंग’ हा लेख डिसुझांनी वाचला होता. मी, चार्ल्स कोराया आणि वीणा मेहता या तिघांनी मिळून तो लिहिला होता. नवीन शहर आणि मुंबईच्या पुनर्रचनेशी संलग्न असलेल्या एका गटावर डिसुझा यांच्यासह मी आणि चार्ल्स कोराया सुद्धा होतो. “एक छोटा ग्रुप त्यांना हवा होता. मी काही नावे सुचविली”, पटेल सांगू लागले. पटेल आणि डिसुझा यांच्यासह ख्यातनाम स्थापत्यविशारद चार्ल्स कोराया, टीसचे संचालक समाजशास्त्रज्ञ डॉ. माधव गोरे, भारतीय सांख्यकी संस्थेतील मुख्य अर्थतज्ज्ञ फिरोझ मेधोरा, टाटा हायड्रोमधील वरिष्ठ स्थापत्य अभियंता के. पी. बत्त्तीवाला, ख्यातनाम व्यवस्थापन संशोधक डॉ. किरीट पारीख आणि ख्यातनाम नाटककार-साहित्यिक विजय तेंडुलकर, या आठ जणांचा एक गट तयार झाला. हेच ते सिडकोचं आद्य अष्टप्रधानमंडळ. तज्ज्ञांचा हा गट प्रारंभी प्रत्येक सोमवारी भेटत असे, नंतर आवश्यकतेनुसार भेटू लागला. ही मंडळी वेगवेगळ्या क्षेत्रातील असली तरी त्यांच्या चर्चेचा केंद्रबिंदू नव्या शहराची उभारणी हाच असे. या गटानेच सर्वंकष विकास आराखड्याची मांडणी केली. अर्थात सिडको आणि एक नवे शहर यांचे पूर्वनियोजन या मंडळाने केले. पटेल म्हणाले, “सिडकोचे बहुपेडी आणि बहुआयामी संघटन हे स्वरूप निश्चित झाले डिसुझांच्या या मंडळामुळे”.

“डिसुझा यांना मानवकेंद्रित विकास अपेक्षित होता. विविध समाज गटांचे सहजीवन, धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक सौहार्दता नव्या शहरात नांदावी हे त्यांना अभिप्रेत असावे.”. डिसुझा यांनी हाच मुद्दा आपल्या पुस्तकात छेडला आहे. डिसुझा लिहितात, “बरेच महिने घेतलेला नगर समाजशास्त्रज्ञाचा आमचा शोध अयशस्वी ठरला”. स्वतःला मिळत असलेल्या (अवघे रुपये २२५०) पगारापेक्षा अधिक पगार योग्य, जाणकार आणि स्वयंप्रेरित अशा सक्षम व्यक्तीला देण्याची तरतूद डिसुझांनी केली होती. समाजशास्त्रज्ञ म्हणून पटेल यांनी एका व्यक्तीला बोलावले. व्यक्ती पदास योग्य होती, अनुभवी होती; परंतु डिसुझा यांनी त्यांची नेमणूक केली नाही. त्या व्यक्तीचे नाव योगायोगाने डिसुझा होते. “आणखी एक ‘डिसुझा’ नको” असे पटेल यांना डिसुझांनी सागितले.

वशिलेबाजीचा ठपका आपल्यावर ठेवला जाऊ नये म्हणून ते सजग होते. सार्वजनिक क्षेत्रात संवेदनशील प्रशासकीय अधिकारी आपल्या प्रतिमेला डाग लागू नये म्हणून किती सजगतेने वागतो याचे हे उत्तम उदाहरण होय. डॉ. माधवराव गोरे आणि विजय तेंडुलकर या दोघांनी नगर समाजशास्त्रज्ञाची उणीव समर्थपणे भरून काढली. या दोघांच्या विचारांचे, प्रत्यंतर सिडकोच्या सामाजिक धोरणात आढळते. सर्वधर्मियांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी प्रत्येक नोडमध्ये लोकसंखेच्या गरजेनुसार समाज मंदिरे, ग्रंथालये आदी सेवा-सुविधा विकसित झाल्या त्या त्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारच. सिडकोचे तत्कालीन उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया, सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा मॅडम यांच्या नजरेखालून पुस्तकाचा मसुदा गेला. भाटिया यांच्या जागी आलेल्या भूषण गगराणी याच्या काळात २ मार्च २०१८ रोजी ‘एक्सप्लोरिंग द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ नवी मुंबई’ प्रकाशित झाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -