मेलबर्न : बॉर्डर गावसकर कसोटी करंडक स्पर्धेतील चौथ्या कसोटीत दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दुसऱ्या दिवसअखेर कसोटीवर ऑस्ट्रेलियाचे पूर्ण नियंत्रण असल्याचे चित्र आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद ४७४ धावा केल्या. भारताच्या पहिल्या डावाची सुरुवात रडतखडत झाली. भारताने दुसऱ्या दिवसअखेर पाच बाद १६४ धावा केल्या. अद्याप भारत ३१० धावांनी पिछाडीवर आहे. यशस्वी जयस्वालच्या अर्धशतकी खेळीनंतरही मेलबर्न कसोटीत भारतापुढील आव्हानं कमी झाल्याचे दिसत नाही.
सलामीवीर यशस्वी जयस्वालने ११८ चेंडूत एक षटकार आणि अकरा चौकारांच्या जोरावर ८२ धावा केल्या. तो धावचीत झाला. कर्णधार रोहित शर्मा फक्त तीन धावा करून झेलबाद झाला. केएल राहुल २४ धावा करून त्रिफळाचीत झाला. विराट कोहली ३६ धावा करून झेलबाद झाला. आकाश दीप तर शून्य धावांवरच झेलबाद होऊन परतला. रिषभ पंत सहा आणि रविंद्र जाडेजा चार धावांवर खेळत आहे. अवांतर नऊ मिळाल्यामुळे भारताने पाच बाद १६४ धावा एवढी मजल मारली. ऑस्ट्रेलियाकडून स्कॉट बोलँड आणि कर्णधार पॅट कमिन्स या दोघांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
बघा : झोपण्यापूर्वी मध खाण्याचे फायदे
बॉर्डर – गावसकर ट्रॉफी (भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया)
- पहिली कसोटी, पर्थ – भारताचा २९५ धावांनी विजय
- दुसरी कसोटी, अॅडलेड – ऑस्ट्रेलियाचा दहा गडी राखून विजय
- तिसरी कसोटी, ब्रिस्बेन – सामना अनिर्णित
- चौथी कसोटी, मेलबर्न – खेळ सुरू आहे
- पाचवी कसोटी, सिडनी – खेळ ३ जानेवारी २०२५ पासून सुरू होणार