अमरावती : दर्यापूर दहीहंडामार्गे धावणाऱ्या एसटी बसेस दररोज उशिरा धावतात. यामुळे दर्यापूर येथे शिक्षणासाठी ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा नाहक मानसिक त्रास सहन करावा लागतो. दहीहंडामार्गे दररोज सायंकाळी ५.३० च्या एसटी बसच्या फेरीने चक्क विद्यार्थ्यांसह प्रवाशांना हुलकावणी देत परस्पर निघून गेल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी दर्यापूर बसस्थानकातून निघणाऱ्या सर्व बसेस रोखून (Protest) धरल्या.
दहिहांडा मार्गावर धावणाऱ्या एसटी बसेस दुपारी १.३० वाजतापासून रस्त्यावर निघाल्याच नाही. शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी पाच वाजल्यापासून बस स्टॉपवर बसच्या प्रतीक्षेत होते. ५.३० वाजता दहीहंडामार्गे धावणारी एसटी बससुद्धा निघाली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी फोन करुन डेपोतील रेकॉर्डवर चौकशी केली असता, ती गाडी अंजनगावमार्गे परस्पर निघून गेल्याचे आढळले. यामुळे संतापलेल्या जे. डी. पाटील महाविद्यालय व आदर्श हायस्कूल तसेच रत्नाबाई शाळेमधील विद्यार्थी तसेच दहीहंडामार्गे जाणारे विद्यार्थ्यांनी या त्रासाला कंटाळून थेट मिळेल त्या वाहनाने दर्यापूर एसटी बस स्थानक गाठले आणि तीव्र आंदोलन करत सायंकाळी ७ वाजल्यापासून दर्यापूर एसटी बस स्थानकातून निघणाऱ्या सर्व गाड्या रोखल्या. विद्यार्थ्यांनी रास्ता रोको आंदोलन करीत एकही बस स्थानकाबाहेर निघू दिली नाही.
बसस्थानक व्यवस्थापकांना विचारणा केली असता त्यांनी गाडी सोडण्यात चुक झाल्याचे सांगितले. दरम्यान दर्यापूरचे ठाणेदार सुनील वानखडे तसेच सुनील साबळे, सिद्धू आठवले यांनी मध्यस्थी करत विद्यार्थी व विद्यार्थ्यांना दहीहंडामार्गे जाणाऱ्या सर्व प्रवाशांना विनंती केली. आजच्या दिवस जी बस मिळेल, त्या बसने जावे, उद्यापासून सर्व नियोजन विद्यार्थ्यांच्या म्हणण्याप्रमाणे होईल, अशी शास्वती देत आंदोलनाची सांगता केली. त्यानंतर विद्यार्थी व प्रवासी दहीहंडामार्गे निघून गेले.