Wednesday, March 26, 2025
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीमन स्वाधीन होण्यासाठी मनापासून नाम घ्या

मन स्वाधीन होण्यासाठी मनापासून नाम घ्या

अध्यात्म : ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज

जगात आजपर्यंत पुष्कळ लोकांनी दानधर्म, स्वार्थत्याग केला, पण त्यांच्यामध्ये कर्तेपणाची जाणीव राहिल्याने खऱ्या अर्थाने त्यांना नि:स्वार्थी बनता आले नाही. खरे म्हणजे, आमचे मन आमच्या ताब्यात आल्याशिवाय आम्हाला नि:स्वार्थी बनता येणार नाही. मन कोणत्या साधनाने आम्हांला आवरता येईल? योग, याग, इत्यादी साधने त्यासाठीच सांगितली आहेत, पण ही साधने या काळात आम्हाला करता येण्यासारखी आहेत का? या साधनांसाठी लागणारी काळाची अनुकूलता आपण राहतो त्या परिस्थितीत आपल्याजवळ खास नाही. मन ताब्यात यायला सध्याच्या काळात नामस्मरणाशिवाय दुसरे साधनच नाही, कारण आज एक नामच भगवंताने अवताररूपाने आमच्यासाठी शिल्लक ठेवले आहे. तेव्हा, मन स्वाधीन होण्यासाठी सर्वांनी मनापासून नाम घ्या. नाम घेत असताना, मनाचे स्थैर्य बिघडविणारे जे विकार आहेत त्यांना आवरण्याचा प्रयत्न करा.

मनाला सर्वांत मोठा विकार कोणता बाधत असेल, तर तो म्हणजे अभिमान. ह्या अभिमानासारखा आपला घात करणारा दुसरा शत्रू कोणी नसेल. तो अभिमान सोडायला आपण शिकले पाहिजे. भगवंताने आजपर्यंत एवढे अवतार घेतले ते सर्व अभिमान मारण्यासाठीच होते. हिरण्यकश्यपूच्या वेळी भगवंताने अवतार घेतला; पण देव समोर उभे असतानासुद्धा त्याचा हात नमस्काराकडे न जाता तलवारीकडे गेला ! यावरून त्याचा अभिमान किती तीव्र असेल याची कल्पना येईल. तो अभिमान नाहीसा करण्यासाठी आपण कर्तेपणाची जाणीव सोडून नाम घेतले पाहिजे.

मनाची स्थिरता बिघडणारा दुसरा शत्रू म्हणजे राग. हा राग फार भयंकर असतो. मोठमोठ्या तपस्वी लोकांची तपश्चर्या याने धुळीस मिळविली आहे. हा राग आवरण्यासाठी, आपल्याला राग कशामुळे येतो हे नीट समजून घेतले पाहिजे. व्यवहारात आपल्याला नीतीची बंधने घालून दिली आहेत, ती सर्व आपण पाळली पाहिजेत. नीतीच्या बंधनात राहणाऱ्या माणसाचे विकार आपोआप आवरले जातील. ही बंधने कशासाठी घातली आहेत याचे मर्म समजून घेऊन वागले, तर राग आवरता येईल आणि राग आवरला म्हणजे त्याच्या पोटात लपून बसलेल्या काम, लोभ, मोह इत्यादि विकारांनाही पायबंद पडेल.

याप्रमाणे नीतीच्या बंधनात राहून तुम्ही आपले मन भगवंताकडे विनम्र करा, भगवंताकडे जाऊ लागा, मन आपोआप तुमच्या मागे येईल, कारण तो त्याचा धर्म आहे. भगवंताला विसरू नका. तुमचे मन तुम्हाला आपण होऊन साहाय्य करील याची खात्री बाळगा. तात्पर्य : नाम सुरुंगाप्रमाणे आहे. विकाररूपी मोठाले खडक ते फोडून टाकते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -