नवी दिल्ली: भारताचे माजी पंतप्रधान तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन झाले आहे. प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.
कालपासूनच मनमोहन सिंग यांना तापाचा त्रास होत होता. पण आजही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना एम्समध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान, या वर्षाच्या सुरुवातीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा सदस्य असलेल्या मनमोहन सिंग यांना कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता.
भारताच्या उदारमतवादी धोरणाचे जनक असलेल्या मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर जगभर हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रकृतीच्या कारणास्तव डॉ. मनमोहन सिंह हे गेल्या काही वर्षांपासून राजकारणापासून दूर होते. १९९१ साली देश आर्थिक संकटाशी सामना करत असताना त्यावेळचे अर्थमंत्री मनमोहन सिंह यांनी देशाची बाजारपेठ जगासाठी खुली केली. त्यांनी खासगीकरण-उदारीकरण आणि जागतिकीकरणाचा मार्ग अवलंबला आणि देशाची अर्थव्यवस्थाही रुळावर आणली.
सन २००४ साली ज्यावेळी यूपीए सरकारने बहुमत गाठलं त्यावेळी डॉ. मनमोहन सिंह पहिल्यांदा पंतप्रधान बनले. २००८ साली अमेरिकेतील मंदीमुळे जगभरात मंदी निर्माण झाली. पण मनमोहन सिंहांच्या धोरणांमुळे भारताला त्याचा कोणताही फटका बसला नाही. त्यानंतर २००९ साली ते दुसऱ्यांदा पंतप्रधान बनले.
१९३२मध्ये झाला होता जन्म
डॉ. मनमोहन सिंग यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ला पाकिस्तानमधील गाह या गावी झाला. त्यांनी १९४८मध्ये पंजाब विश्वविद्यालय येथून मॅट्रिकचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी आपले पुढील शिक्षणक ब्रिटनच्या केंब्रिज विश्वविद्यालयातून घेतले. १९५७मध्ये त्यांनी अर्थशास्त्रामध्ये प्रथम श्रेणीतून ऑनर्सची डिग्री मिळवली. यानंतर १९६२मध्ये त्यांनी ऑक्सफोर्ड युनिर्व्हसिटीच्या नूफिल्ड कॉलेज येथून अर्थशास्रात डी.फिल केली. डॉ मनमोहन सिंग आणि त्यांची पत्नी श्रीमती गुरशरण कौर यांच्या तीन मुली आहेत.
१९७२मध्ये अर्थ मंत्रालयात मुख्य आर्थिक सल्लागार बनले होते सिंग
भारताचे चौदावे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आपली नम्रता, कर्मठता आणि कार्याच्या प्रती प्रतिबद्धतेसाठी जाणले जातात. सन १९६६ ते १९६९ या काळात मनमोहन सिंह यांनी संयुक्त राष्ट्रात काम केलं. मनमोहन सिंग १९७१मध्ये वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून काम केले. १९७२मध्ये त्यांची नियुक्ती अर्थ मंत्रालयात मुख्य आर्थिक सल्लागारच्या रूपात झाली. डॉ. सिंग यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, योजना आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे अध्यक्ष, पंतप्रधानांचे सल्लागार, विश्वविद्यालय अनुदान आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम केले. मनमोहन सिंग हे १९९१ ते १९९६ दरम्यान भारताचे अर्थ मंत्री होते.