Saturday, March 22, 2025
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीसुंदरीला धडा शिकवला!

सुंदरीला धडा शिकवला!

समर्थ कृपा – विलास खानोलकर

सुंदराबाईने सर्व लोकांस अतिताप दिल्या कारणाने सेवेकऱ्यांनी मामलेदार, कारभारी यांच्याकडे अर्ज केले; परंतु बाईस राणीसाहेबांचे संरक्षण असल्याकारणाने त्यांच्या अर्जाचा उपयोग झाला नाही. पुढे त्यांनी कलेक्टर साहेबांकडे अर्ज केले, त्या प्रकारची चौकशी होऊन बाईला काढून टाकण्याबद्दल हुकूम आला. तिच्या मालाची जप्ती झाली. तिने आपल्या घराकडे जे काही लांबविले होते तितके मात्र राहिले. अक्कलकोटमधील सर्व जिन्नस पंचांच्या ताब्यात गेले. बाईचा इतका कडक अंमल असूनही तो अगदी पराधिनत्वात गेला. नानासाहेब बर्वे कारभारी यांच्याकडे कलेक्टरचा हुकूम आला असता त्यास तो हुकूम अंमलात आणण्याची भीती वाटली. कारण बाई महाराजांच्या प्रीतीतली आहे. तिला काढली, तर महाराजांचा कोप होईल. न काढावी, तर हुकूम अमान्य होतो. बर्वे संकटात पडून चार-आठ दिवस विचारातच होते. अशा स्थितीत एक दिवस श्री स्वामींच्या दर्शनास ते गेले असता महाराज म्हणाले, ‘काय रे असाच हुकूम बजावतोस का?’ हे ऐकून बर्वे यास समाधान वाटले व धैर्य आले.

याचाच अर्थ असा की, सुंदराबाईच्या गच्छंतीचा अखेरचा टप्पा आता सुरू झाला होता. तिने लोकांना त्रस्त करून सोडल्यामुळे मामलेदार, कारभारी यांच्याकडे लोकांनी तक्रार अर्ज केले होते. सुंदराबाईस अक्कलकोटच्या राणीसाहेबांचेच संरक्षण असल्यामुळे त्यांच्या अर्जाचा काही उपयोग होत नव्हता. ‘भगवान के घर देर है लेकिन अंधेर नहीं है.’ या उक्तीनुसार कलेक्टरकडे केलेल्या अर्जाचा उपयोग होऊन बाईला काढून टाकण्याबद्दल हुकूमच आला.

आजपावेतो तिने मोह-माया-ममता-लालसा याच्या अधीन जाऊन जेवढ्या म्हणून वेगवेगळ्या वस्तूंचा अतिरिक्त संग्रह-साठा केला होता तो सर्व साठा पंचांनी ताब्यात घेतला. बाईच्या सद्दीचा अखेरचा दुर्दैवी प्रवास सुरू झाला. अर्थात अशा कृतीचा एक ना एक दिवस असाच शेवट होत असतो; परंतु अतिशय लोभात अडकलेल्या जीवाला हा साठा अथवा संचय करीत असताना या कृतीचा अंत काय होईल याचेच भान राहत नाही. लोभीवृत्तीने लावलेल्या, जोपासलेल्या आणि वाढविलेल्या वृक्षास येणारी फळेही विषारीच असतात. याचेच भान अनेकांना सत्ता, संपत्ती, अधिकार असताना राहत नाही. अविवेकाने त्यांची देहबुद्धी कार्यरत असते. सुंदराबाई हे तेव्हाचे प्रतीक आहे. सद्यः स्थितीतही अशा प्रतिकांची कमतरता नाही. शिक्षण-ज्ञान याचा प्रचार, प्रसार होऊनही त्यातून कोणी बोध घेत नाही हेच तर खरे मोठे दुर्दैवी आहे. यात कारभारी नानासाहेब बर्वेचा उल्लेख आलेला आहे. बाई महाराजांच्या मर्जीतील असल्यामुळे हुकुमाची अंमलबजावणी करण्यास ते कचरत होते. ते चार-आठ दिवस ‘हुकूम बजावावा की नाही’ अशा दोलायमान मनःस्थितीत होते. त्यांना बाईबद्दलचे सर्व वास्तव ठाऊक होते. तिच्या विरुद्ध हुकूमही आला होता, पण त्यांची स्थिती अशी दोलायमान का व्हावी? सत्य असेल तर परमेश्वरासही घाबरू नये असे म्हणतात. सत्यापुढे कुणाचाही मुलाहिजा ठेवता कामा नये. याबाबत पुराणात, इतिहासात अनेक उदाहरणे आहेत. छत्रपती शिवाजीराजे किंवा न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे याबाबत विस्ताराने न लिहिताही सहज बोध होतो.

संभ्रमित अवस्थेत कारभारी बर्वे श्री स्वामींचे दर्शन घेऊन उभे राहताच श्री स्वामी त्यांना त्यांच्या कर्तव्याबाबत अतिशय परखड शब्दात फटकारतात, ‘काय रे, असाच हुकूम बजावतोस काय?’ श्री स्वामींच्या या उद्‌गाराने कारभारी नानासाहेब बर्वे यास परम समाधान तर वाटलेच; परंतु सुंदराबाई विरुद्ध हुकूम बजावण्याचे प्रचंड बळ त्यास मिळाले. श्री स्वामींची ही कृती हेच प्रबोधित करते की, सत्य असेल तर कशालाच डगमगू नका. सत्य-सचोटी-न्यायनिष्ठुरता सद्यस्थितीत वेगाने हरवत असल्यामुळे आपल्यालाच आपल्या विकासाची, प्रगतीची घसरण उघड्या डोळ्यांनी पाहावी लागत आहे. ही घसरण टाळावयास हवी. आपणास जे-जे शक्य आहे ते-ते मनापासून करावयास हवे. यातच सुख-समाधान-शांती सामावलेली आहे, पिंडीवर विषारी साप बसलेला असला तरी त्याला तेथून हुस्कायला हवा. आपले कर्तव्य निष्ठुरतेने आपल्याला पार पाडायलाच हवे.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -