जीवन संगीत – सद्गुरू वामनराव पै
कर्मकांडाचा व परमेश्वराचा थेट संबंध काहीच नाही. खरा धर्म कशाला म्हणता येईल हे पाहण्यासाठी त्या धर्माने समाजाची सुरेख धारणा होते की नाही हे तपासले पाहिजे. समाजाची सुरेख धारणा होण्यासाठी जे शहाणपण पाहिजे, जी विद्या पाहिजे, जे शास्त्र पाहिजे ते समजून घेतले पाहिजे. धर्माचे पालन हे माणसाच्या दृष्टीने, मानवी जीवनाच्या दृष्टीने व्हायला पाहिजे. संतांनी आणखी पुढे जाऊन सांगितले. संतांनी अखिल भूतमात्रांचा विचार केला. अखिल भूतमात्रांच्या दृष्टीने त्यांनी दया हा धर्माचा प्राण आहे, अहिंसा धर्माचा प्राण आहे असे सांगितले. अहिंसा कशाला म्हणायचे, दया कशाला म्हणायची, अहिंसा कुणाच्या बाबतीत, हिंसा कुणाच्या बाबतीत, दया कुणाच्या बाबतीत करायची व कुणाच्या बाबतीत दया करायची नाही हे सुद्धा एक वेगळे शास्त्र आहे. परचक्र आपल्यावर आले, परराष्ट्राने आपल्यावर आक्रमण केले, तर अहिंसा-अहिंसा म्हणत बसणार का? नाही, तर आपल्याला त्याचा प्रतिकार केला पाहिजे, त्या लोकांना मारलेच पाहिजे. हिंसा केलीच पाहिजे हे सिद्ध झाले. अहिंसा, हिंसा ही सर्व नैतिक मूल्ये आहेत. ही नैतिक मूल्ये परिस्थितीप्रमाणे बदलत असतात पण जीवनविद्येने सांगितलेली मूल्ये ही जीवनमूल्ये आहेत. ही जीवनमूल्ये निसर्ग नियमांप्रमाणे असतात. करावे तसे भरावे, क्रिया तशी प्रतिक्रिया, जिथे परिणाम आहे तिथे कारण हे असतेच. अशा अनेक निसर्गनियमांप्रमाणे ही जीवनमूल्ये असतात.
निसर्गाच्या नियमाप्रमाणे तुम्ही क्रिया केली की, प्रतिक्रिया होते. तुम्ही कर्म केले रे केले की प्रतिक्रिया होतेच मग तुम्ही इच्छा करा किंवा करू नका. “कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’’ याबद्दल ग्रंथात असे लिहिलेले आहे व सर्व किर्तनकार, प्रवचनकार असे सांगतात की, कर्म करण्याचा अधिकार तुझा पण फळावर तुझा अधिकार नाही. हे जे सांगितले जाते त्यात थोडा फरक केला पाहिजे. जीवनविद्या सांगते की, तुम्ही कर्मफळाची अपेक्षा करा किंवा करू नका पण कर्म केले की, त्याची प्रतिक्रिया ही होतेच व होणारच. तुम्हाला पाहिजे तशी होणे किंवा न होणे हे तुझ्या हातात नाही. इथे एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे की, कर्म करणे तुमच्या हातात आहे पण कर्माचे फळ तुमच्या इच्छेप्रमाणे मिळणे हे तुमच्या हातात नाही. याला कारण यामध्ये अनेक घटक असतात. मुले अभ्यास करतात पण पास होणार की, नापास होणार याला अनेक कारणे असतात. अभ्यासही चांगला केलेला आहे, पेपरही चांगले लिहिलेले आहेत तरी मुलगा नापास होतो का? तो परीक्षक जो आहे त्याचा मूड बरोबर नसेल, तर मार्क्स कमी देतो.
इथे तुमच्या हातात काही नाही. अपेक्षेप्रमाणे फळ मिळाले पाहिजे पण तसे होतेच असे नाही. आपण प्रवासाला जातो तेव्हा गाडीचे रिझर्वेशन वगैरे सगळे आपणच करतो, आपण त्यासाठी जे काही करायला पाहिजे ते करतो, पण तसे होईलच असे नाही. अचानक कुठलातरी मोर्चा आला, तुम्ही तिकडेच अडकून पडलात आणि गाडी चुकली, विमान चुकले तर इथे तुमच्या हातात काही नाही. कर्म तुमच्या हातात आहे पण कर्माचे फळ मनाच्या विरुद्धही मिळू शकेल. चांगले कर्म केले की फळ तुम्हाला निश्चितच मिळणार आहे. ते तुमच्या अपेक्षेप्रमाणे मिळणे किंवा न मिळणे हे तुमच्या हातात नाही. इथे पुण्य पाहिजे असे जीवनविद्या सांगते.