संतोष वायंगणकर
महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात कोकणातील नितेश राणे, उदय सामंत, अदिती तटकरे, भरतशेठ गोगावले, योगेश कदम अशा पाच कोकणच्या शिलेदारांची वर्णी लागली. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. नवीन मंत्र्यांना शपथविधी घेताना कोकणातील कोणा-कोणाची वर्णी लागणार, कोणाला स्थान मिळणार आहे असे प्रश्न उपस्थित होत असताना ज्यांना मंत्रीपद मिळण आवश्यक होतं. त्यांना कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद मिळाले. मंत्री मंडळाचा विस्तार केव्हा होणार याची चर्चा होत असताना तो विस्तार झाला. मग आता मंत्र्यांना खातेवाटप केव्हा जाहीर होणार या प्रश्नाभोवती चर्चा होऊ लागली. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातही विधानभवनाच्या प्रांगणात कोणत्या मंत्र्यांना कोणते खातं मिळू शकेल. मग कोणाचा अनुभव किती आहे. अपेक्षित खातं मिळेल की खातेवाटपातही धक्कातंत्राचा वापर होईल का? अशी उगाचच चर्चा मात्र विधानभवन परिसरात ऐकायला मिळायची. काही पत्रकारांकडून मंत्र्यांना देखील तुम्हाला कोणत खातं मिळेल असं वाटत असले प्रश्न विचारले जात होते. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेलाही कोणाला कोणत खातं मिळणार याची निश्चितच उत्सुकता होतीच.
शनिवारी रात्री उशिराने महाराष्ट्र मंत्रिमंडळातील मंत्र्यांना खातेवाटप जाहीर करण्यात आले. साहजिकच महाराष्ट्राबरोबरच कोकणातील मंत्र्यांच्या वाट्याला कोणत्या खात्याचा कारभार आला आहे, हे पाहणं महत्त्वाच ठरणार होतं. उदय सामंत यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाचा कार्यभार येईल अशी चर्चा होती; परंतु उदय सामंत यांच्याकडे यापूर्वी त्यांच्याकडे असलेले उद्योग मंत्रालय पुन्हा एकदा उदय सामंत यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. अदिती तटकरे यांच्याकडे महिला व बालविकास विभागाच्या मंत्रालयाचा कार्यभार सोपविण्यात आले आहे. नितेश राणे यांच्याकडे मत्स्योद्योग आणि बंदर विकास विभागाचा कार्यभार देण्यात आला. ना.भरतशेठ गोगावले यांना पलोत्पादन व रोजगार हमी योजना या विभागाचा कार्यभार देण्यात आला, तर राज्यमंत्री असलेल्या योगेश कदम यांच्याकडे गृह, अन्न आणि नागरीपुरवठा आदी खात्यांचा कार्यभार देण्यात आला. या मंत्रिमंडळ विस्तारात कोकणसाठी एक वैशिष्ट्यता आहे. १९९५ साली विद्यमान खा.नारायण राणे हे प्रथम कॅबिनेट मंत्री म्हणून तत्कालिन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले तेव्हा त्यांच्याकडे दुग्धविकास, पशुसंवर्धन, मत्स्यउद्योग आणि बंदर विकास या विभागांचा कार्यभार सोपविण्यात आला होता.
एक विलक्षण योगायोग असा आहे की खा.नारायण राणे यांचे सुपूत्र असलेल्या नितेश राणे यांच्याकडे पहिल्याच मंत्रीपदाचा कार्यकाळात मत्स्यद्योग आणि बंदरे विकास विभागाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. तर माजी मंत्री रामदासभाई कदम यांचे सुपूत्र दापोलीचे आमदार आणि महाराष्ट्र मंत्रिमंडळातील राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे गृह (शहर) विभागाचा कार्यभार देण्यात आला आहे. रामदास कदम राज्यमंत्री म्हणून गृहविभागाचा कार्यभार त्यांच्याकडे होता. तोच गृह विभाग राज्यमंत्री असलेल्या योगेश कदम यांच्याकडे आहे. मत्स्योद्योग आणि बंदर विकास विभागाचे मंत्री असलेले नितेश राणे यांच्याकडे असलेले हे दोन्ही विभाग कोकण विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. मत्स्योद्योगाच्या माध्यमातून कोकणातील शितगृह प्रक्रिया उद्योगांची मोठ्या प्रमाणावर उभारणी होऊ शकते. कोकणाला आर्थिक सक्षमता आणण्यासाठी आणि कोकणच्या किनारपट्टीला पूर्वाश्रमीचे दिवस येण्यासाठी कोकणातील बंदारांचा विकास आणि त्या माध्यमातून आर्थिक समृद्धी येऊ शकेल. रेडी ते रेवस पर्यंतच्या सागरी किनारपट्टीवरील बंदरे विकसित होतील. आजवर जे घडल नाही ते घडविण्याची कल्पकता मत्स्यद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्यामध्ये आहे. त्यामुळे नजिकच्या काळात कोकणविकासाचे एक वेगळे सकारात्मक चित्र पाहावयास मिळेल. महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून उद्योग मंत्रालयाचा फायदा कोकणाला होईल अशी अपेक्षा करावयास काहीच हरकत नसावी. मागील मंत्रीपदाचा त्यांना असलेला अनुभव कोकणात उद्योगांची उभारणी करण्यासाठी आणि भकास वाटणाऱ्या कोकणच्या एमआयडीसींमध्ये पुन्हा एकदा उद्योगांच्या गतीमानतेने फारमोठे बदल घडले पाहिजेत. कोकणच्या विकासातील मागासलेपणा आता दूर व्हायलाच पाहिजे. पाच-पाच मंत्री कोकणातील असताना कोकणातील विशेष करून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांची स्थिती
बदलली पाहिजे.