Friday, March 28, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यदिल आया गधी पे, तो परी क्या चीज है

दिल आया गधी पे, तो परी क्या चीज है

आजचा आपला लेख त्या तमाम महिलांना समर्पित आहे ज्यांच्या पतींचे विवाहबाह्य संबंध आहेत आणि त्याचा त्यांना किती आणि कसा त्रास होतोय हे त्या वेळोवेळी रडून रडून समुपदेशन दरम्यान सांगत असतात. आपण आजपर्यंत कौटुंबिक, वैवाहिक, रिलेशन शिप या विषयावर अनेक लेख लिहिले, प्रत्येक लेखात वेगवेगळे विषय हाताळले.

मीनाक्षी जगदाळे

या लेखातून आपण एक विशेष मुद्दा अधोरेखित करणार आहोत तो म्हणजे पत्नीला आपल्या पतीच्या अफेअरचं, विवाह बाह्य संबंध असण्याचं जसं खूप वाईट वाटतं, राग येतो, संताप होतो, त्याचप्रमाणे ती जी कोणी आहे ती बहुतेकवेळा आपल्यापेक्षा अत्यंत कमी शिकलेली, सर्वसाधारण, दिसायला फारशी सुंदर नसलेली, कसलेली स्टँडर्ड नसलेली, काही फार बॅकग्राऊंड नसलेली, साधारण किंवा व्यवस्थित बॅकग्राऊंड नसलेल्या कुटुंबातील असून पण त्याला माझ्यापेक्षा का आवडली किंवा माझ्या तुलनेत ती सरस का ठरली हा प्रश्न असतो. मी कुठेही तिच्यापेक्षा कमी नाही उलट मी जास्त वरचढ आहे मग तिला महत्त्व का? हा प्रश्न खऱ्या धर्माच्या, कायद्याच्या पत्नीला जास्त भेडसावताना दिसतो. आता या गोष्टीचा त्रास करून घेण्यात काहीच अर्थ नाही हे प्रथम महिलांना समजलं पाहिजे. जी गोष्ट सहजासहजी उपलब्ध होईल ती त्याच दर्जाची असेल हे प्रथम समजावून घ्या. जी कोणत्याही परपुरुषासोबत अनैतिक शारीरिकसंबंध ठेवून राहायला तयार होते त्यात कोणत्याही सामाजिक, वैयक्तिक, नैतिक मर्यादा पाळत नाही तीच स्टँडर्ड, शिक्षण, दर्जा, प्रोटोकॉल कसा असेल? जी स्त्री विवाहित पुरुषासोबत संबंध ठेवून दुसऱ्याचा संसार मोडू शकते तिच्यावर कोणते संस्कार असतील? हे आपणच समजावून घेतले तर त्रास कमी होईल. राहिला प्रश्न आपल्या नवऱ्याला ती का आवडली? तिच्यासोबत त्याने संबंध का ठेवलेत? तिच्यासाठी बायको मुलं सोडायला कसा तयार झाला? तिच्यामुळे घरात दुर्लक्ष का करतोय? तिच्यावर तो अमाप पैसा का खर्च करतो? घरातल्या जबाबदाऱ्या का घेत नाही. तो सगळं तीचच का ऐकतो? तिच्या ताब्यात इतका कसा गेला? अनेक महिलांना हे प्रश्न खूप त्रास देतात असे समुपदेशन दरम्यान समजते.

‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ हाच प्रकार इथे लागू होतो. जर त्या नवऱ्याला स्वतःची पत्नी, मुलं, संसार, कुटुंब यापुढे एखादी आयुष्यात टाइम पास म्हणून असलेली महिला श्रेष्ठ वाटत असेल, तर ते त्याच दुर्दैव आहे. बायको मुलांना घराला देण्याचा वेळ जर तो अशा अर्थहीन आणि बिनबुडाच्या रिलेशनला देत असेल, तर तुमचं प्रेम, मुलांचा सहवास त्याच्या नशिबात नाही. आयुष्य खूप कमी असत ते कोणासोबत कसं घालवायचं हे आपण ठरवायचं असत. अशा प्रकारचे अनैतिक संबंध कधीच जास्त कालावधीसाठी टिकतं नसतात. वर्षानुवर्षे जरी ते ओढून ताणून, नाईलाज म्हणून, मजबुरी म्हणून, गरज म्हणून ओढलेले असतील तरी त्याचा अंत हा वाईटच असतो हे आजपर्यंतच्या अनेक केसेसचा अनुभव सांगतोय. त्यामुळे आपल्या नवऱ्याने एखादी पर स्त्री ठेवली, लफडं केल, अफेअर केल म्हणून त्रासून जाऊन आपली मानसिकता, आरोग्य, करियर, अर्थार्जन याकडे दुर्लक्ष करून खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळल्यासारखं अजिबात वाटून घेवू नका. खूप महिला या ताणतणावमुळे स्वतःच्या तब्बेतीकडे, मुलांकडे दुर्लक्ष करतात अथवा स्वतः चुकीच्या वाटेवर जातात आणि त्यातून परिस्थिती अजून बिघडते. स्वतःच मानसिक खच्चीकरण होवू देवू नका, मनोधैर्य कमकुवत होऊ देऊ नका. परिस्थिती हुशारीने, धीराने हाताळली पाहिजे हे लक्षात घ्या.

जिच्याशी त्याने संबंध ठेवलेत ती जितकी दोषी आहे तितकंच आपलं नाण पण खोटं आहे हेही लक्षात घ्या. समोरील स्त्रीचा द्वेष आणि राग करण्यापेक्षा आपल्या नवऱ्याने काय चॉईस केला, त्याची लेवल इतकी का घसरली? त्याला नेमका इतक्या खालच्या स्तरावर जाऊन स्वतःच्या कोणत्या गरजा भागवायला अशी बाई का शोधावी लागली? ती बाई कोणत्या अपेक्षा, हेतू, स्वार्थ साधण्यासाठी त्याच्या सोबत आहे? यातून आपल्या नवऱ्याला वैयक्तिक, घराला, आपल्याला काय त्रास होऊ शकतो हे पहिले शोधण्याचा प्रयत्न करा. आपलं स्वतःच सुद्धा आत्मपरीक्षण नक्कीच करा. आपण बायको म्हणून कुठे कमी पडलो? कोणत्या कर्तव्यात मागे राहिलो का? आपलं काही चुकत आहे का? त्यानुसार स्वतःला बदलण्याचा प्रयत्न नक्कीच करून पहा, नवऱ्याशी शांतपणे बोलून चर्चा करून मार्ग निघतोय का ते पहिले बघा. हे सर्व करून पण, नवऱ्याला समजावून घेऊन आणि समजावून सांगून पण जर परिस्थिती बदलत नसेल तर स्वतःला दोष देण, नशिबाला दोष देण, इतरांना कोणालाही दोष देण बंद करा. ज्या व्यक्तीला तुमची गरज नाही, किंमत नाही त्यासाठी स्वतःची ऊर्जा, वेळ, भावना वाया घालवण्यापेक्षा स्वतःच अस्तित्व, स्वतःच जग निर्माण करा. आपल्या मुलांवर लक्ष केंद्रित करा. कोणताही चुकीचा निर्णय घाईत, रागात, भावनेच्या भरात घेऊ नका. जो पर्यंत नवऱ्याचे अनैतिक संबंध घराबाहेर आहेत तोपर्यंत तुम्हाला त्याला सावरण्याचा, संसार वाचवण्याचा नवऱ्याला सुधारण्याचा, स्वतःला बदलण्याचा जितका प्रयत्न करता येईल तितका नक्की करा. समुपदेशन दरम्यान काही प्रकरण अशीही येतात ज्या ठिकाणी नवऱ्याने बाहेर बाई ठेवली किंवा घरात आणून बाई ठेवली आहे. या वेळी मात्र महिलांचा संयम पूर्ण गेलेला असतो आणि आता कठोर कायदेशीर काय प्रक्रिया करायची? इतकं डोक्यावरून पाणी गेल्यावर कोणतीही महिला ही परिस्थिती स्वीकारायला तयार नसते.
[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -