माणगाव : रायगड जिल्ह्यातील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित मुंबई गोवा महामार्गाचे (Mumbai-Goa highway) अद्यापही रखडलेल्या अवस्थेत आहे. तसेच ठिकाठिकाणी बायपास, उड्डाणपूल, पुल, मोर्यांची कामे रखडली आहेत. महामार्गाचे काम बंद आहेत तर काही ठिकाणी रस्त्याची बांधकामे मुंगीच्या पावलांनी सुरू आहे. त्यातच काही ठेकेदार काम बंद ठेवून पळून गेले आहेत तर काही ठिकाणी वन विभागाने महामार्गाला हरकती घेतल्या आहेत. तसेच जमिनीचे हस्तांतरण, मोबदला, फसवणूक, भावकी, गावकी, वादंगामुळे न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत. निधीची वानवा, खड्डे, वाहतुकीची कोंडी त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधींची कमालीची उदासीनता दिसून येत आहे. या व अशा अनेक कारणांमुळे महामार्गाला अडथळ्यांची साडेसाती लागलेली आहे. त्यामुळे हा महामार्ग पुर्ण होण्यासाठी वाट पाहण्याशिवाय दुसरा मार्ग उरलेला नाही अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
उत्तर रायगड जिल्ह्यातील महामार्गाचे काम विविध आंदोलने आणि जनतेच्या रेट्यामुळे कसेबसे घाई गडबडीत तात्पुरते झाले आहे. मात्र नागोठणे, रातवड, इंदापूर, माणगाव, काळ नदी, गोद नदी आणि लोणेरे येथील पुलांची बांधकामे दोन वर्षांपासून रखडलेल्या अवस्थेत आहेत. तसेच सुमारे २५ अरुंद मोर्यांची बांधकामे सुरूच झालेली नाहीत. दरम्यान वेळेत काम पूर्ण न केल्याने ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्यात आली. त्यांच्यावर मनुष्य वधाचा गून्हे दाखल करुन अटक करण्यात आली. या कारवाईमुळे काही ठेकेदार काम बंद ठेवून पळून गेले. त्यामुळे पुन्हा एकदा या कामांची निविदा काढण्यात येणार आहे असे खासदार सुनील तटकरे आणि आमदार भरत गोगावले यांनी सांगितले. जी कामे सुरू आहेत ती अत्यंत संथ गतीने सुरू आहेत. माणगाव येथील बहुप्रतिक्षित बायपास महामार्गाचे काम दोन वर्षांपासून रखडलेल्या अवस्थेत आहे. कोकण रेल्वे आणि महामार्ग कार्यालय यांच्या मधील वादाने काम थांबले आहे. तेथे कोकण रेल्वेचे दुपदरीकरणाचे काम सुरू आहे. रेल्वेच्या मार्गावरुन गर्डर टाकताना रेल्वेचा मेगा ब्लॉक घेण्याची विनंती धुडकावून लावली होती. तेव्हापासून बायपासचे काम बंद आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी कोणीही प्रयत्नशील नाही. याकडे लक्ष दिले जात नाही असा आरोप केला जात आहे.
Health: थंडीच्या दिवसांत नाही वाढणार वजन, दररोजच्या डाएटमध्ये सामील करा हे ६ पदार्थ
१७ वर्षांपासून हा महामार्ग रोखला गेला आहे. त्यामुळे खड्डे आणि वाहतुकीची कोंडी आदी समस्यांना प्रवासी आणि पर्यटक यांना तोंड द्यावे लागत आहे. हजारोंच्या संख्येने अपघातात नाहक बळी गेले आहेत. अनेक जण जखमी झाले आहेत. तरीही हा महामार्ग साडेसातीच्या फेर्यात अडकला आहे. हा प्रश्न अतिशय संवेदनशील असूनही लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प बसले आहेत. याचे सर्वांना नवल वाटत आहे. सुरवातीला हा महामार्गाचे डांबरीकरण सुरू करण्यात आले होते. मात्र अति पाऊस पडत असल्याने या महामार्गाला खड्ड्यातून तारेवरची कसरत करुन मार्ग काढावा लागत प्रवास करावा लागत होता. त्यामुळे डांबरीकरण रद्द करुन काँक्रीटीकरण करण्यासाठी खासदार सुनील तटकरे यांनी मंजुरी आणली. दरम्यान याचेही घाईघाईने कामं केल्याने हा मार्ग काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे झाले. त्यामुळे आधीच उल्हास त्यातून पडला पाऊस अशी दैन्यावस्था झाली. याबाबत खासदार सुनील तटकरे आणि आमदार भरत गोगावले यांनी प्राध्यान्याने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांना कधी यश येईल ते त्यांनाही सांगता येत नाही. तोपर्यंत जनतेने खड्डे, वाहतुकीची कोंडी वाढतच जाणार आहे आणि नरकयातना भोगाव्या लागणार आहेत अशा उद्विग्न प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
हा मार्ग पुर्ण होत नसल्याने रोजगार, व्यवसाय, पर्यटन, शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण यावर दुरगामी परिणाम होऊन कोकण पर्यायाने रायगड जिल्हा ५० वर्ष मागास राहीला आहे. येथील बहुतांशी तरुण रोजगाराच्या निमित्ताने मुंबई, गोवा, पूणे आणि अन्य राज्यांत नोकरीसाठी पलायन करत आहे. याचे कोणालाही सोयरे सुतक नाही असे खेदाने म्हणावे लागते.
माणगांव बायपासच्या कामाच्या आधीच्या ठेकेदाराने मी काम करण्यास असाह्य आहे, असे सांगितले आहे. त्यामुळे बायपासच्या कामाची नवीन निविदा काढण्यात आली आहे. फेब्रुवारी आसपास बायपासचे काम सुरू करण्यात येईल. – पंकज गोसावी, महामार्ग उपअभियंता