मुंबई : कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात एका गुन्ह्यासंदर्भात शनिवारी दुपारी न्यायालयीन कामकाज सुरू असताना एका आरोपीने किरकोळ कारणावरून चप्पल भिरकावली होती. तसेच, एक बंदूकधारी खाजगी सुरक्षा रक्षक न्यायालय आवारात फिरत असल्याचा एक व्हिडिओ समाज माध्यमातून व्हायरल झाला होता. या दोन्ही प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत न्यायालयीन कर्तव्यावरील अकरा पोलिसांना गुरुवारी सेवेतून निलंबित केले आहे. या दोन्ही घटना प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
निलंबित ११ पोलिसांत एका पोलीस अधिकाऱ्याचा समावेश आहे. खडकपाडा पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यातील आरोपी किरण भरम यांना शनिवारी दुपारी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात पोलिसांनी हजर केले होते. यावेळी न्यायालयीन कामकाज सुरू असताना आरोपी किरण याने न्यायाधीशांच्या दिशेने चप्पल भिरकावली होती. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात किरण यांच्या विरुध्द पोलिसांना शासकीय कर्तव्य करण्यापासून परावृत्त केल्याचा गु्न्हा दाखल करण्यात आला होता.
CM Devendra Fadnavis : राज्याच्या सर्वांगिण प्रगतीसाठी पुढील १०० दिवसांचा आराखडा
न्यायालयातील दुसऱ्या एका प्रकरणात न्यायालयीन कामासाठी आवारात आलेल्या एका व्यक्तीसोबत एक बंदूकधारी खाजगी सुरक्षा रक्षक फिरत असल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. न्यायालय आवारात शस्त्र घेऊन फिरण्यास प्रतिबंध असताना बंदूकधारी इसम न्यायालय आवारात आलाच कसा असे प्रश्न वकिलांकडून उपस्थित करण्यात येत होते. याप्रकरणी ही गुन्हा दाखल झाला होता.
या दोन्ही प्रकरणांची पोलीस उपायुक्त झेंडे यांच्या आदेशावरून चौकशी करण्यात आली. या चौकशीत न्यायालयीन कर्तव्यावर असलेले पोलीस कर्तव्यात कसूरपणा, निष्काळजीपणा करत असल्याचे स्पष्ट झाल्याने उपायुक्त झेंडे यांनी एकूण ११ पोलिसांना गुरुवारी निलंबित केले.