मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत (Ladki Bahin Yojana) लाडक्या बहिणींना सरकारकडून डिसेंबर महिन्याचा सहावा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे. मात्र राज्यातील सुमारे २ कोटी ३४ लाख लाभार्थी लाडक्या बहिणींचे फॉर्म भरून घेणाऱ्या अंगणवाडी सेविका प्रती फॉर्म मागे मिळणारे पन्नास रुपये अद्याप मिळाले नाहीत.त्यामुळे ही योजना यशस्वी करण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस सरकारला परक्या आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) राज्यात प्रचंड यशस्वीच झाली नाही, तर निवडणुकीच्या मैदानातही महायुतीसाठी गेमचेंजर ठरली आहे. या योजनेतील २ कोटी ३४ लाख लाभार्थींपैकी बहुतांशी महिलांनी महायुतीला भरभरून मतदान केले आणि त्यामुळेच महायुती सत्तेत आधीच्या तुलनेत जास्त भक्कमपणे परत आली, असेच राजकीय विश्लेषण केले जाते.आता नवे सरकार सत्तेवर बसल्यानंतर योजनेतर्गत लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळण्यास ही सुरुवात झाली आहे. पुढील काही दिवसात सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये पोहोचतील. मात्र,या योजनेसाठी खेडोपाडी,गल्लोगल्ली गरीब महिलांचे फॉर्म भरून घेणाऱ्या,सरकारकडे त्यांची रीतसर नोंद करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मात्र सरकार विसरले, असेच चित्र आहे. कारण अवघ्या दोन तीन महिन्यात तब्बल दोन कोटी ३४ लाख फॉर्म भरून घेत अगदी कमी वेळेत योजना यशस्वी करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना प्रती फॉर्म मागे सरकारने पन्नास रुपये देण्याचे मान्य केले होते. मात्र,त्या संदर्भात एक दमडीही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मिळालेली नाही.
जून महिन्यात योजना लॉन्च झाली तेव्हा सरकारने मिशन मोडमध्ये काम केलं. त्यामुळे राज्यातील तब्बल एक लाख आठ हजार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ही दिवस रात्र या कामात लागल्या होत्या. त्या काळात आपापली अंगणवाडी आणि त्याच्याशी जोडलेल्या बालकांचे पोषण व आरोग्य सांभाळत एक एक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी शेकडो महिलांचे फॉर्म भरून दाखवले होते. त्यामुळे योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या तब्बल सव्वा दोन कोटीपेक्षा जास्त झाली होती. एवढं चांगलं काम करून दाखवलं म्हणून सरकार लवकरच आपलेही पैसे देईल, अशी अपेक्षा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना होती. मात्र योजनेचा सहावा हप्ता लाभार्थींच्या खात्यात पोहोचत असतानाही योजना यशस्वी करणाऱ्या महिलांना दमडीही मिळालेली नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) यशस्वी होऊन राज्यात महायुतीचा सरकार पुन्हा सत्तेत आलं आहे. नवीन वर्षात तरी सरकार आमची आठवण ठेवेल, अशी अपेक्षा आता अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी व्यक्त केली आहे.