Saturday, March 22, 2025
Homeब्रेकिंग न्यूजKalyan Crime : आरोपी विशालने पत्नीच्या मदतीने लावली मृतदेहाची विल्हेवाट

Kalyan Crime : आरोपी विशालने पत्नीच्या मदतीने लावली मृतदेहाची विल्हेवाट

कल्याण : ठाणे जिल्ह्यातील कल्याण पूर्व येथे तेरा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी विशाल गवळी, त्याची पत्नी आणि अन्य एका व्यक्तीला अटक केले आहे. कसून चौकशी केल्यावर विशालने पोलिसांसमोर धक्कादायक कबुली दिली आहे. विशालने तब्बल तीन लग्न केली. त्याच्यावर सहा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. विशालला पोलिसांनी एकदा तडीपार केले होते. पण त्याच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती. धक्कादायक म्हणजे तेरा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून हत्या केल्यानंतर विशालने पत्नीच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावली होती.

विशालवर आतापर्यंत दोन विनयभंग, मुलावर लैंगिक अत्याचार, दोन वेळा मारामारी आणि एक जबरी चोरी केल्याचा गुन्हा दाखल आहे. हे सहा गुन्हे केलेल्या आणि तडीपारीचा अनुभव घेतलेल्या विशालने कल्याणमध्ये तेरा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून हत्या केली, नंतर पत्नीच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावली. विशालला पोलिसांनी शेगाव येथील सलूनमध्ये (केश कर्तनालय) दाढी करत असताना अटक केली. सध्या विशाल, त्याची पत्नी आणि अटकेतील तिसरी व्यक्ती हे सर्व जण पोलीस कोठडीत आहेत.

मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर विशालने कल्याणमधील आधारवाडी परिसरातल्या एका वाईन शॉपमधून दारू खरेदी केली. आधारवाडी परिसरातल्या सीसीटीव्ही फूटेजमधून ही बाब समोर आली आहे.विशालच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या माहितीमुळे गुन्ह्याबाबतची अधिकची माहिती प्रकाशात आली आहे.

विशालने मुलीला संध्याकाळी पाचच्या सुमारास घरात घेतले आणि गैरकृत्य केले. नंतर मुलीची हत्या केली. हत्या केल्यानंतर विशालने मुलीचा मृतदेह एका बॅगेत कोंबला. नंतर तो पत्नीची वाट बघत बसला. संध्याकाळी सातच्या सुमारास विशालची बँकेत नोकरी करत असलेली पत्नी घरी परतली. यावेळी विशालने घडलेला सर्व प्रकार कथन केला. नंतर मृतदेहाची विल्हेवाट कशी लावावी याबाबत विशाल आणि त्याची पत्नी यांच्यात चर्चा झाली. योजना ठरवल्यावर विशाल आणि त्याच्या पत्नीने घरातील रक्ताचे डाग पुसले. ठरवल्याप्रमाणे विशालने मित्राची रिक्षा बोलावली. रात्री साडेआठच्या सुमारास रिक्षा आली. या रिक्षेतून रात्री नऊच्या सुमारास बापगावच्या दिशेने रवाना झाले आणि वाटेत मृतदेह फेकून घरी परतले. घरी परतताना विशालने आधारवाडी परिसरातल्या एका वाईन शॉपमधून दारू खरेदी केली.नंतर तो शहर सोडून पत्नीच्या गावी निघून गेला. पण पत्नी नोकरीत आयत्यावेळी रजा घेणे शक्य नसल्यामुळे घरीच थांबली होती. पोलीस बेपत्ता मुलीची चौकशी करत होते त्यावेळी घराबाहेर थोडे रक्त दिसले. रक्ताचे हे डाग बघून संशय येताच पोलिसांनी विशालच्या पत्नीला ताब्यात घेतले. उलटसुलट प्रश्न विचारताच विशालच्या पत्नीने गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी शेगावमधून विशालला अटक केली.

बदलापूर आणि कल्याण प्रकरणातील साम्य

बदलापूर येथे शाळेत दोन मुलींचे लैंगिक शोषण झाले तर कल्याणमध्ये तेरा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आली. दोन्ही प्रकरणातील आरोपींनी तीन लग्न केली होती. बदलापूरचा आरोपी अक्षय शिंदे याने तीन लग्न केली होती तर कल्याणचा आरोपी विशाल गवळी यानेही तीन लग्न केली असल्याचे उघड झाले आहे. यामुळे बदलापूर प्रकरणाप्रमाणेच कल्याणच्या आरोपीबाबत कठोर धोरण अवलंबावे अशी मागणी होत आहे. आरोपीला कठोर शिक्षा करावी, अशी मागणी भाजपा आमदार सुलभा गणपत गायकवाड यांनी केली आहे. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचे सूतोवाच आमदार सुलभा गायकवाड यांनी केले.

‘कल्याण प्रकरणाची सुनावणी जलद गती न्यायालयात करू’

कल्याण प्रकरणातील आरोपी आणि सहआरोपी अशा एकूण तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. सर्व आरोपी पोलिसांच्या कोठडीत आहेत. या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात अर्थात जलद गती न्यायालयात व्हावी यासाठी आवश्यक ती कायदेशीर विनंती केली जाईल; असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -