Sunday, July 6, 2025

Kalyan incident : १३ वर्षीय चिमुकली खाऊ आणायला गेली मात्र घरी परतलीच नाही

Kalyan incident : १३ वर्षीय चिमुकली खाऊ आणायला गेली मात्र घरी परतलीच नाही

कल्याण : कल्याण पूर्वमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. खाऊ आणायला गेलेली १३ वर्षीय चिमुकली घरी परतलीच नाही. पीडित मुलगी सोमवारी आईकडून २० रुपये घेऊन खाऊ आणायला गेली होती. मात्र रात्री ती घरी पोहोचली नाही. यानंतर कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मंगळवारी कल्याण-पडघा रस्त्याच्या कडेला एका झुडपात मुलीचा मृतदेह सापडला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता पीडित मुलगी आईकडून २० रुपये घेऊन खाऊ आणण्यासाठी घराबाहेर पडली होती. पण सायंकाळी उशिरापर्यंत मुलगी घरी आली नाही, त्यानंतर मुलीच्या आईनं तिला शोधायला सुरुवात केली. सर्वत्र शोधाशोध करूनही मुलगी सापडत नाही, हे लक्षात आल्यानंतर महिलेनं आपल्या पतीला मुलगी सापडत नसल्याचं सांगितलं. यानंतर मुलीच्या वडीलही कामावरून तातडीनं घरी आले, दोघांनीही मुलीला शोधायला सुरुवात केली. पण मुलगी कुठेच सापडली नाही. यानंतर दाम्पत्यानं कोळशेवाडी पोलीस ठाण्यात जाऊन मुलगी बेपत्ता झाल्याचा गुन्हा दाखल केला.



त्यानंतर मंगळवारी कल्याण-पडघा रस्त्यावरील निर्जनस्थळी एका झुडपात मुलीचा मृतदेह आढळला आहे. हे ठिकाण मुलीच्या घरापासून १३ किलोमीटर दूर आहे. मुलीवर लैंगिक अत्याचार करून मग तिची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी पीडितेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जेजे रुग्णालयात दाखल केला आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.


मागील वर्षी शेजारी राहणाऱ्या तरुणाने माझ्या मुलीची छेड काढली होती. यावरून वाद झाल्यानंतर आरोपीनं तुम्हाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली होती. त्यामुळे माझ्या मुलीची हत्येत त्याचाच सहभाग असावा, त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करावा, अशी विनंती मुलीच्या वडिलांनी केली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे पोलीस शोध घेत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा