Sunday, May 11, 2025

देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

नाताळच्या दिवशी गोव्यात प्रवासी बोट बुडाली

नाताळच्या दिवशी गोव्यात प्रवासी बोट बुडाली

पणजी : ऐन नाताळच्या दिवशी गोव्यातील कळंगुट समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांना घेऊन जात असलेली एक बोट बुडाली. या दुर्घटनेत एका पर्यटकाचा मृत्यू झाला. इतर २० जणांना वाचवण्यात आले. दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. बोटीत महाराष्ट्रातल्या खेडमधील एका कुटुंबातले १३ सदस्य होते. हे सर्व जण सुखरुप आहेत.


बोट बुडाल्यामुळे ५४ वर्षांच्या एका पर्यटकाचा मृत्यू झाला. इतरांना वाचवण्यात आले. दुर्घटनेनंतर काही जणांची तब्येत बिघडली होती, त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बोटीतील दोन जणांनी वगळता इतर सर्वांनी जीवरक्षक अंगरखा अर्थात लाईफ जॅकेट परिधान केले होते; असेही पोलिसांनी सांगितले. दोन मुले आणि दोन महिला यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतरांना प्रकृती स्थिर झाल्यानंतर घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. रुग्णालयात उपचार घेत असलेल्यांमध्ये सहा आणि सात वर्षांच्या अशा दोन मुलांचा तसेच २५ आणि ५५ वर्षांच्या अशा दोन महिलांचा समावेश आहे.


बोट किनाऱ्यापासून सुमारे ६० मीटर अंतरावर समुद्रात बुडाली. बोट बुडत असल्याची जाणीव होताच कळंगुट समुद्र किनाऱ्यावर कार्यरत असलेल्या १८ जीवरक्षकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. यामुळे मोठी जीवितहानी टळली. काही दिवसांपूर्वी मुंबईत नौदलाच्या स्पीड बोटीच्या इंजिनाची चाचणी सुरू असताना अपघात झाला होता. मुंबईत गेट वे ऑफ इंडिया जवळ नीलकमल नावाच्या फेरीबोटीला स्पीड बोटची धडक बसली. या अपघातात १५ पर्यटकांचा मृत्यू झाला होता.

Comments
Add Comment