ठाणे : निवृत्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू विनोद कांबळी याच्या मेंदूत रक्ताच्या गुठळ्या झाल्या आहेत. विनोदला स्वतःच्या पायांवर उभे राहणे आणि चालणे कठीण झाले आहे. पायात पेटके येण्याचा त्रास त्याला वारंवार जाणवत आहे. लघवीच्या तपासणीतून त्याला इन्फेक्शन झाल्याची बाब समोर आली आहे. तब्येत बिघडली, वारंवार उलट्या होऊ लागल्या, चक्कर येऊ लागली. यामुळे विनोद कांबळीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या विनोद कांबळीवर ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
उपचार सुरू आहेत आणि प्रकृती स्थिर दिसत आहे. पण विनोद कांबळीच्या तब्येतीला असलेला धोका अद्याप कमी झालेला नाही. यामुळे वैद्यकीय पथक सतत त्याच्या तब्येतीतील चढउतारांची नोंद करुन उपचारांत आवश्यक ते बदल करत आहे. आणखी काही दिवस विनोद कांबळीला कडक पथ्य पाळून रुग्णालयातच उपचार घ्यावे लागतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
विनोदची ‘मेडिकल हिस्टरी’ जाणून घेऊन तसेच त्याच्या वेगवेगळ्या वैद्यकीय चाचण्या करून घेऊन उपचारांची रुपरेखा निश्चित केली आहे. या उपचारांना विनोद कांबळी कसा प्रतिसाद देतो यावरुन त्याला रुग्णालयात किती काळ राहावे लागेल याचा अंदाज पुढील काही दिवसांत सांगता येईल, असे डॉक्टरांनी सांगितले. सध्या रुग्णालयातच विनोदवर उपचार करणे आवश्यक असल्याचे डॉक्टर म्हणाले. विनोदच्या आणखी काही वैद्यकीय चाचण्या होणार आहेत, असेही डॉक्टरांनी सांगितले.
विनोद कांबळीची क्रिकेटमधील कामगिरी
विनोद कांबळी १७ आंतरराष्ट्रीय कसोटी आणि १०४ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळला आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ५४.२० च्या सरासरीने १०८४ तर एकदिवसीय सामन्यांत ३२.५९ च्या सरासरीने २४७७ धावा केल्या आहेत. विनोदने कसोटी क्रिकेटमध्ये चार शतके आणि तीन अर्धशतके तर एकदिवसीय सामन्यांत दोन शतके आणि चौदा अर्धशतके केली आहेत. फलंदाज म्हणून विनोदने कसोटी क्रिकेटमध्ये २२७ ही वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या उभारली आहे. त्याने एकदिवसीय सामन्यांच्या क्रिकेटमध्ये १०६ ही वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या उभारली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करून विनोदने सात धावा देत एक बळी पण घेतला आहे.