मोहन चरण माझींनी केले जागरूक राहण्याचे आवाहन
भुवनेश्वर : जनतेने कष्टाने कमावलेला पैसा गुंतवताना सतर्क राहणे आवश्यक आहे. मी स्वतः चिटफंड घोटाळ्याचा बळी ठरलो होतो. त्यामुळे जनतेने पॉन्झी योजनांबद्दल सतर्क राहणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी (Mohan Charan Majhi) यांनी केले. राष्ट्रीय ग्राहक दिन सोहळ्यात ते बोलत होते.
यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणाले की, पॉन्झी कंपन्यांचे एजंट त्यांच्या योजना अतिशय आकर्षक पद्धतीने मांडायचे आणि मीही त्यांच्या गोष्टीत येऊन गुंतवणूक केली, पण शेवटपर्यंत मला माझे पैसे मिळू शकले नाहीत असे माझी यांनी सांगितले. चिटफंडच्या नावाखाली 1990 आणि 2002 मध्ये दोन पॉन्झी कंपन्यांनी माझी फसवणूक केली. मी त्या योजनांमध्ये पैसे जमा केले, परंतु जेव्हा मॅच्योरिटीची वेळ आली तेव्हा त्या कंपन्या गायब झाल्या.
त्यानंतर फसवणूक झालेले पैसे परत मिळण्याची प्रक्रिया इतकी लांब आणि कठीण होती. त्यामुळे आपण पैसे परत घेऊ शकलो नाही. यासोबतच कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी संपूर्ण माहिती घ्यावी आणि पॉन्झी कंपन्यांच्या फंदात पडू नये, असे आवाहनही मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी केले. तसेच, अशी फसवणूक थांबवण्यासाठी जनजागृती आणि दक्षता आवश्यक आहे. कष्टाने कमावलेला पैसा सुरक्षित ठेवणे हे आमचे प्राधान्य असले पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या प्रयत्नांचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी कौतुक केले. ते म्हणाले की, सध्या परिस्थिती खूप बदलली आहे. चिट फंड घोटाळे थांबवण्यासाठी आणि ग्राहकांची फसवणूक होण्यापासून वाचवण्यासाठी केंद्राने आता कडक कायदे केले आहेत आणि नियम मजबूत केले आहेत. हे पाऊल ग्राहकांना संरक्षण देण्यासाठी एक महत्त्वाचा उपक्रम असल्याचे त्यांनी (Mohan Charan Majhi) सांगितले.