काही जणांना धंदा कुटुंबातून परंपरागत मिळतो. काहींना नोकरी न करता धंदा करण्याचीच आवड असते. काहीजण गरज म्हणून धंद्यात पडतात, तर काही परिस्थितीमुळे धंद्यात उतरतात. संतोष कांबळे आज बॅग मॅन्युफॅक्चरिंगमध्ये एक मोठं नाव आहे. ते धंद्यामध्ये चॉईस म्हणून नाही, तर परिस्थितीमुळे झालेले उद्योजक असल्याचे सांगतात. आपल्याकडे ‘धंद्यात पडणे’ अशी म्हण आहे, पण संतोष कांबळे धंदा सुरू केल्यावर धंद्यात पडले नाहीत, तर त्या धंद्यात तरले आणि यशस्वीही झाले आहेत.
शिबानी जोशी
संतोष कांबळे यांचा बॅग निर्मितीचा प्रवास खूपच लक्षणीय आहे. खरे तर पिशव्या किंवा बॅग आपल्याला अगदी लहानपणापासून वार्धक्यापर्यंत दैनंदिन आयुष्यात लागतात. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण अनेक प्रकारच्या लहान-मोठ्या पिशव्या, बॅग वापरत असतो. पिशव्यांमध्ये आपण सामान ठेवतो; परंतु संतोष कांबळे यांनी याच पिशव्यांमध्ये आपली स्वप्न टाकली आणि ती स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यासही घेतला. खरे तर संतोष कांबळे यांनी सिव्हिल इंजिनीयरिंगच शिक्षण मोठ्या कष्टाने घेतलं. त्यांची आई मशीनवर साध्या पिशव्या शिवून विकत असे. आईने शिवलेल्या पिशव्या घेऊन मरिन लाईन्स रेल्वे स्टेशनवर उभे राहून संतोष लहानपणी पिशव्या विकत. १२ वर्षांचा मुलगा रेल्वे स्टेशनवर स्वतःचा माल घेऊन विकायला बसतो त्यावेळी आपला माल कसा जपायचा, तो नीट कसा मांडायचा, ग्राहकांना कसे पटवायचे, पोलीस, सुरक्षा व्यवस्थेशी कसे वागायचे? हे सर्व स्किल त्यांनी प्रॅक्टिकली अनुभवलेलं होतं. त्या छोट्याशा अनुभवाचा त्यांना नंतर धंद्यामध्ये सुद्धा खूप उपयोग झाला.
शिक्षण झाल्यावर एक-दीड वर्षे सिव्हिल क्षेत्रात त्यांनी नोकरी केली पण ते रमले नाहीत. त्याने स्वतःचा धंदा सुरू करायचं ठरवलं. पहिला प्रश्न होता भांडवल. त्यासाठी त्यांना स्ट्रगल करावं लागलं. दीड-दोन वर्षांच्या प्रयत्नानंतर यश मिळालं. भांडवल मिळाल्यानंतर सुरुवातीला त्यांनी धारावीसारख्या भागामध्ये जवळजवळ १६ ते १७ वर्षे छोटा गाळा घेऊन बॅग बनवण्याचे काम केलं. धारावीला अगदी छोट्या-छोट्या गल्लीबोळात बॅग्सची खूप मोठी अनऑर्गनाइज्ड इंडस्ट्री आहे. त्यांची ही दोन मशीनची फॅक्टरी तिथे सुरू झाली. नंतर ५ मशिन्सपासून ५० मशीनपर्यंत फॅक्टरी तिथे वाढत गेली. हळूहळू छोटी-मोठी कामं मिळू लागली. कांबळे यांनी नंतर मोठ्या कंपनीना एप्रोच व्हायचं ठरवलं आणि त्यांनी बाटा कंपनीला अप्रोच केलं. त्यांचे दोन लोकं पाहणी करण्यासाठी आले आणि धारावीतलं ऐकूणच वातावरण आणि अनऑर्गनाइज्ड रूप बघून त्यांनी ते काम द्यायला नकार दिला. त्याच वेळी कांबळे यांनी ठरवलं की आता आपण ऑर्गनाइज्ड सेक्टरमध्ये गेले पाहिजे आणि म्हणून त्यांनी कल्याण इथल्या एमआयडीसीमध्ये गाळा घेऊन आपला स्वतःचा कारखाना सुरू करण्याचे धाडस केले. आज त्यांच्या फॅक्टरीमध्ये २०० हून अधिक मशीन असून ३९० जणांचा स्टाफ शिफ्टमध्ये काम करत असतो. मोठमोठ्या कंपन्यांची कामं त्यांच्याकडे आहेत. जगभरातल्या सुप्रसिद्ध सफारी, अमेरिकन टुरिस्टर, सॅमसोनाईट, वाइल्डक्राफ्ट, व्हीआयपी या बॅग्स कं., तर DELL, HP, Lenovo, Acer इत्यादी मोठ्या लॅपटॉप कंपन्यांसाठी बॅग्स ते बनवतात. खरे तर त्यांच्या मोठ्या कामाची सुरुवात बाटाच्या नकारघंटेने झाली होती पण त्यातूनच जिद्दीने त्यांनी मोठे उद्योग ब्रँड मिळवायला सुरुवात केली. सर्व गुणवत्ता निर्देश, फॅक्टरीचे वातावरण, दर्जा, सर्व परवानग्या मिळवल्या. हे सगळं बघितल्यानंतरच त्यांना ऑर्डर्स मिळत गेल्या.
आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या बॅग्स बनविण्याबरोबरच डोमेस्टिक मार्केटमध्ये त्यांच्या बॅग्स जातात. त्यानी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधल्या मुलांची दप्तर बनवली. देशात एमएसएमई म्हणजेच लघू, सूक्ष्म, मध्यम उद्योगक्षेत्र देशाच्या औद्योगिक उत्पादनात ४०% सहभाग देत असते तसेच ४६% निर्यातसुद्धा या क्षेत्रातून होते आणि ६६% रोजगार या क्षेत्रातून निर्माण होतो. त्यांची कंपनी एमएसएमई क्षेत्रातच मोडते. अशा उद्योगांना आपल्या देशात खूपच वाव आहे असे ते म्हणतात. एमएसएमई उद्योग क्षेत्र हे देशाच्या आर्थिक विकासाचेे ‘ग्रोथ इंजिन’ आहे असे म्हणता येईल. स्वतः उद्योजक म्हणून स्थिरावत असताना त्यांनी समाजकार्य सुद्धा सुरू केले. डिक्की म्हणजेच दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री ही दलित किंवा एससी, एस्टी मुलांना उद्योजक बनवण्यासाठी काम करणारी राष्ट्रीय पातळीवरची संस्था आहे. या संस्थेच्या पश्चिम विभागाचे समन्वयक म्हणून संतोष कांबळे काम करतात. भांडवल, व्यवसाय निर्मिती, मार्केटिंग, सल्ला अशी सर्व काम डिक्कीतर्फे केली जातात. त्यामुळे ज्या एससी एसटी, दलित तरुणांना नोकरीत न अडकता उद्योग, व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांना अगदी बेबी स्टेपपासून भरारीपर्यंत सर्व मार्गदर्शन डिक्कीतर्फे मिळू शकेल. त्यांच्यासारखे अनुभवी लोक लिखित मार्गदर्शन करतात. त्यांनी जरूर त्याचा फायदा घ्यावा असेही संतोष कांबळे सांगतात.
कोणी तरी असं म्हणूनच ठेवलं आहे की, “अरे, स्वप्न तरी मोठी पाहा.” मोठी स्वप्न पाहायला काय जातंय? स्वप्न मोठं पाहिलं तरच आपण त्या उद्दिष्टापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत राहतो आणि तसेच स्वप्न संतोष कांबळे यांनी पाहिलं आहे. पुढच्या दोन वर्षांत त्यांना राज्यातली पहिल्या क्रमांकाची बॅगची फॅक्टरी करायची आहे. सध्या त्यांच्याकडे २०० हून अधिक मशीन आहेत. त्यांना १००० मशीन आणि ३७९० कामगार असलेली फॅक्टरी बनवायची आहे आणि त्या दिशेने त्यांची पावलं ही जोमानं यशाच्या मार्गावर पडत आहेत आणि हे स्वप्न आपण पूर्ण करणारच असा आत्मविश्वास संतोष कांबळे यांच्याकडे आहे. हजारो मैलांचा प्रवास एका पावलानेच सुरू होतो. त्यांची सुरुवात २००३ मध्ये झाली. २०१६ मध्ये बिझक्राफ्ट सोल्युशन्स प्रा. लि. झाली. करिअरची सुरुवात पिशव्या तयार करून केली आणि नंतर कॉर्पोरेट गिफ्टिंग कंपनी म्हणून विकसित झाली. आज बॅग, बॅकपॅक, स्कूल बॅग, लॅपटॉप बॅग, फेसमास्क, जिम बॅग, सायकल बॅग, स्पोर्ट्स बॅग, बाईक बॅग, सॅडल बॅग, ट्रॅव्हल बॅग अशा विविध मटेरियलच्या बॅग्स ते बनवतात. लहानपणापासून वार्धक्यापर्यंत प्रत्येकजण वेगवेगळ्या बॅग्स वापरत असतो. ही इंडस्ट्री दरवर्षी १६ टक्के वाढत आहे. त्यामुळे या क्षेत्रात वाव खूप आहे. त्यामुळे येत्या दोन वर्षांत राज्यातली पहिली कंपनी आणि स्वतःचा ब्रँड निर्माण करण्याचं संतोष कांबळे यांचं स्वप्न नक्कीच पूर्ण होईल यात शंका नाही.
joshishibani@yahoo. com