कल्याणमध्ये एका इमारतीमध्ये राहणाऱ्या दोन अमराठी कुटुंबांतील वाद मिटवायला जाणाऱ्या धीरज देशमुखचा मराठी असण्यावरून केलेला अपमान आणि त्यानंतर बाहेरून माणसे आणून केलेल्या जबर मारहाणीनंतर मराठी आणि अमराठी भाषिक वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कल्याण पश्चिमेकडील योगीधाम परिसरातील अजमेरा हाईट्स या उच्चभ्रू सोसायटीत सरकारी नोकरी करणारे अखिलेश शुक्ला आणि वर्षा कल्वीकट्टे राहतात. अखिलेश यांच्या पत्नी गीता या घराबाहेर देवपूजा करून धूप लावतात. धूप लावल्याने कल्वीकट्टे यांच्या घरात हा धूर जातो. तीन वर्षांच्या बाळाला आणि वयोवृद्ध आईला या धुरामुळे श्वासोच्छ्वासाचा त्रास होतो. ही बाब वर्षा यांनी गीता यांना सांगितली. मात्र गीता यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्या बाजूला राहणारे अभिजीत देशमुख आणि धीरज देशमुखने मध्यस्थी केली. धीरजने दोन्ही कुटुंबांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी तुम्ही मराठी लोक भिकारडे आहात. चिकन, मटण खाऊन घाण करता, अशी शेरेबाजी शुक्ला यांच्या पत्नीने केल्याने वादाला वेगळे वळण लागले. त्यांच्या मध्यस्थीचा अखिलेशला राग आला.
त्याने बाहेरून १० ते १५ माणसे बोलावून देशमुख आणि कल्वीकट्टे कुटुंबीयांच्या घरात घुसून लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. शुक्लाने केलेल्या मारहाणीत धीरज गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्यावर १० टाके पडले. अभिजीत हा सुद्धा जखमी झाला. या घटनेचा व्हीडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाचे वातावरण पसरले. १९ डिसेंबर रोजीच्या घटनेचे पडसाद नागपुरात झालेल्या हिवाळी अधिवेशनातही उमटले. मराठी माणसाचा अपमान आणि मारहाण प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी शुक्लासह त्याच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेतले असून एमटीडीसीचा कर्मचारी असलेल्या शुक्ला याला निलंबित करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली. मुंबई ही मराठी माणसांची आहे. कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले. एखाद्याने काय खायचे आणि कसे राहायचे, याचे स्वातंत्र्य संविधानाने दिले आहे. पण अशाप्रकारे रोखण्याचा कोणालाही अधिकार नाही. या आधारावर भेदभाव मान्य नाही. अशा तक्रारी आल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
मुंबईत, महाराष्ट्रात राहूनही मराठी माणसांना अतिशय तुच्छ वागणूक देणारे अनेक प्रकार यापूर्वीही घडलेत. मात्र कल्याणमधील प्रकार अक्षरश: कळस होता. मारहाणीच्या घटनेनंतर कल्याणमधील शेकडो नागरिक १९ डिसेंबरच्या रात्री एकत्र जमले आणि शुक्ला यांच्यावर कारवाई करत मराठी कुटुंबाला न्याय देण्याच्या मागणीसाठी अजमेर हाइट्स परिसरात ठिय्या दिला होता. लोकप्रक्षोभामुळे राज्य सरकारने याची तातडीने दखल घेतली तरी स्थानिक पोलिसांची भूमिका संदिग्ध राहिली आहे. अखिलेश शुक्ला हा एमटीडीसीमध्ये अकाऊंटंट आहे. मात्र आयएएस अधिकारी असल्याचे सांगून, मंत्रालयात काम करतो, असे सांगून सोसायटीमधील रहिवाशांना धमकवायचा. खासगी गाडीवर अंबर दिवा लावून फिरायचा, अशी त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. शुक्ला हा पूर्वीपासूनच या परिसरात लोकांना धमकावण्याचे काम करत आहे. महिलांशीही असभ्य वर्तणूक करत असून अनेक सण-उत्सवांमध्ये देखील तो आणि त्याचे कुटुंबीय लोकांशी वाद निर्माण करतात, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. मागील वर्षी महाशिवरात्रीच्या कार्यक्रमांमध्ये देखील रात्रीच्या वेळी सुरू असलेला अभिषेक कार्यक्रम शुक्ला आणि त्याच्या पत्नीने बंद पाडला होता. आता तर त्याने हद्दच केली. मराठी भाषिकांचा अपमान करताना थेट मराठी माणसांना मारहाण केली. देशमुख कुटुंबीयांना मारहाण केल्यानंतरही त्याची अरेरावी दिसून आली. माझे तुम्ही काहीही करू शकणार नाही. माझी वरपर्यंत ओळख आहे.
मंत्रालयातून एक फोन येईल, अशी धमकी सर्वांना दिली होती. स्थानिक पोलिसांचे अभय असल्यानेच शुक्ला मनमानी पद्धतीने वागत होता. काही अधिकारी त्याला मदत करत होते. सदर घटनेनंतर शुक्ला हा कुटुंबासह घर बंद करून बाहेरगावी गेला. दोन-तीन दिवस तो फरार होता. त्याला अटक करण्यात पोलिसांनी दिरंगाई केली. त्यामुळे पोलीस अधिकच अडचणीत आले. पोलिसांची भूमिका संशयास्पद आहेच. तरीही त्यांनी सारवासारव करून कल्याण प्रकरणात आपला सहभाग नसल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणी आम्ही कारवाई करत आहोत. कुणालाही सोडणार नाही. दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याप्रमाणे चौकशी करून दोषींवर कारवाई करू, या प्रकरणाचा पुढील तपास एसीपी करत आहेत, असे खडकपाडा पोलिसांतर्फे सांगण्यात आले. तक्रार दाखल करवून घेण्यास दिरंगाई करणारा पोलीस अधिकारी लांडगे याच्याविरुद्ध अनेक तक्रारी आल्या आहेत. त्याच्यावर कारवाई करण्याचे आश्वासनही पोलिसांनी दिले. मात्र यापुढे असे प्रकार घडू नयेत. तसे झाल्यास मराठी भाषिकांवर अन्याय होणार नाही, याची काळजी पोलिसांनी घ्यावी. महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जिथे सर्वधर्मसमभाव आहे.
आर्थिक राजधानी असल्याने येथे नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने लाखो लोक येतात. उद्योगनगरी असलेल्या मुंबईत सर्वाधिक मराठी भाषिक असले तरी आम्ही परप्रांतियांना कधी आडकाठी केली नाही. त्यामुळे येथे विविध धर्मांचे, जातींचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. मात्र काही नतद्रष्ट लोकांमुळे अमराठी (अन्य भाषिक) लोक बदनाम होत आहेत. गेल्या काही वर्षांत परप्रांतियांचे प्रमाण वाढले असले तरी भूमिपुत्र मराठी माणसांचीच मुंबई आहे आणि राहील. कल्याण येथील अजमेरा हाईट्स या उच्चभ्रू सोसायटीमध्ये धूप-अगरबत्ती लावल्याच्या कारणावरून सरकारी अधिकारी अखिलेश शुक्ला आणि त्याच्या पत्नीने गुंडांच्या साथीने मराठी माणसांवर हल्ला केला. हा मुद्दा राजकारणाशी जोडून राजकारण तापले. पण प्रत्येकाने काय खायचे, कसे राहायचे याचा अधिकार प्रत्येकाला आहे. त्यात कोणीही हस्तक्षेप करू नये, तसेच या प्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांना दिली. पण तरीही एक घटना घडल्यानंतर तशीच घटना पुन्हा घडते. असे का होते याचा विचारही करणे गरजेचे आहे.