नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील पाच राज्यांमध्ये नव्या राज्यपालांची नियुक्ती केली आहे. राज्यपाल नियुक्तीचा आदेश मंगळवार २४ डिसेंबर रोजी रात्री काढण्यात आला. या आदेशानुसार माजी लष्करप्रमुख आणि केंद्र सरकारचे माजी राज्यमंत्री व्ही. के. सिंह मिझोरमचे राज्यपाल झाले. गृह मंत्रालयाचे माजी सचिव अजयकुमार भल्ला मणिपूरचे राज्यपाल झाले. मणिपूरमध्ये हिंदू मैतेई आणि ख्रिश्चन कुकी यांच्यात संघर्ष सुरू आहे. नवे राज्यपाल नियुक्त झाल्यानंतर हा संघर्ष सोडवण्यासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे काही प्रयत्न होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.
केरळ आणि बिहार या दोन राज्यांच्या राज्यपालांची अदलाबदल झाली आहे. केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद आता बिहारचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. तर बिहारचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर आता केरळचे राज्यपाल म्हणून कार्यरत होणार आहेत. ओडिशाचे राज्यपाल रघुबर दास यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला आहे.मिझोरमचे विद्यमान राज्यपाल डॉ. हरी बाबू कंभामपती यांची ओडिशाच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे.