Sunday, June 22, 2025

नायर रुग्णालयातील हृदय शस्त्रक्रिया विभाग आठवडाभरापासून बंद

नायर रुग्णालयातील हृदय शस्त्रक्रिया विभाग आठवडाभरापासून बंद

मुंबई : आठवडाभरापासून नायर रुग्णालयातील हृदय शस्त्रक्रिया विभागातील काही भाग बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे बायपाससारख्या शस्त्रक्रिया होत नसल्याने रुग्णांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शस्त्रक्रिया विभागासाठी लागणाऱ्या उपकरणांची देयके प्रलंबित राहिल्यामुळे कंत्राटदारांनी उपकरणांचा पुरवठा बंद केला आहे.


मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयामध्ये १८०० खाटा असून दररोज साडेतीन ते चार हजार रुग्ण बाह्यरुग्ण विभागामध्ये उपचारासाठी येतात. हृदय शस्त्रक्रिया विभागामध्ये दररोज उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. यापैकी काही रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता भासते. हृदय शस्त्रक्रियेसाठी लागणारी महत्त्वपूर्ण उपकरणे नायर रुग्णालय प्रशासनाकडून पुरविण्यात येतात. मात्र रुग्णालयाला ही उपकरणे पुरविणाऱ्या कंत्राटदारांची देयके मागील काही दिवसांपासून प्रलंबित आहेत.



देयके मंजूर होत नसल्याने कंत्राटदारानी उपकरणांचा पुरवठा आठवडाभरपूर्वी अचानक बंद केला. त्यामुळे रुग्णालयामध्ये होणाऱ्या शस्त्रक्रियांपैकी बायपास शस्त्रक्रिया आठवडाभरापासून बंद करण्यात आल्या आहेत. अचानक घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे रुग्णांना नाहक त्रास होत आहे. त्यांना शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयात जावे लागत आहे. कंत्राटदाराकडून उपकरणांचा पुरवठा बंद झाल्याने शस्त्रक्रिया बंद कराव्या लागल्याची माहिती नायर रुग्णालयातील सीव्हीटीएस विभागातील एका डॉक्टरने दिली.

Comments
Add Comment