विरार : अलिकडे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाची दुर्दशा झाली असतानाच विरार ते वज्रेश्वरी (Vajreshwari ) हा रस्ता देखील दुरुस्तीच्या कामामुळे तसेच वाढत्या वाहनांमुळे गैरसोयीचा झाला आहे. या अरुंद रस्त्यावर वाहने प्रचंड वाहनांची संख्या वाढली आहेत. त्यामुळे वाहनांचा खोळंबा होत आहे. या मार्गाचे तातडीने चौपदरीकरण करण्यात यावे जेणेकरुन वाढत्या वाहनांना आपल्या निर्धारित वेगाने जाता येईल. गेली कित्येक वर्षे सार्वजनिक बांधकाम खात्याने, एमएमआरडीएने किंवा द्रुतगती महामार्गाच्या प्राधिकरणाने त्या विषयी पावले उचललेली नाहीत. त्यामुळे या रस्त्यावर क्रशर, दगड-माती, रेती, वाहून नेणारे डंपर मोठ्या संख्येने रस्त्यावरुन दिवसभर वाहतूक करतात. त्यामुळे एसटी, खासगी बसेस, रिक्षा व इतर वाहनांना रस्त्यावरुन किमान वेगाने देखील जाता येत नाही. याबाबत आरटीओ, वाहतूक शाखेचे पोलिस यांचा रस्त्यावर वाहतूक नियंत्रणासाठी मागमूस आढळत नाही.
निवडणुका होतात. निवडून आलेले लोकप्रतिनिधी रस्ते व महामार्गाचा विकास, चौपदरीकरण या विषयी कोणतीच भूमिका घेत नाहीत. ठाणे व पालघर जिल्ह्याचा हा आदिवासी पट्टा असल्याने या भागाचा विकासाच्या दृष्टीने आग्रहपूर्वक शासकीय स्तरावर विचार केला जात नाही. भिवंडी, नाशिक, जळगाव, धुळे अशा उत्तर महाराष्ट्रात जाणारी वाहतूक या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात होते. प्रशासन या रस्त्याच्या दृष्टीने कोणती खबरदारी घेते हे कळण्यास मार्ग नाही.
मागील राज्य सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांना मंत्रीमंडळात स्थान मिळालेले नाही. भाजपाचे पालघरचे खासदार डॉ.हेमंत सवरा तसेच भिवंडीचे खासदार बाळ्यामामा म्हात्रे याबाबत भूमिका घेत नाहीत. ठाणे व पालघर जिल्ह्याला या भागासाठी विधानसभेत अपेक्षित प्रतिनिधित्व मंत्रीमंडळात मिळालेले नाही. त्यामुळे महामार्गाचे सबलीकरण व चौपदरीकरण व आवश्यक तो रस्ते विकास कोण करणार? हा प्रश्न आहे. बोईसरचे आमदार शिंदे-शिवसेना गटाचे विलास तरे, तसेच भिवंडी ग्रामीणचे आमदार शिवसेना —शिंदेगटाचे शांताराम मोरे, तसेच पालघरचे आमदार शिवसेना शिंदेगटाचे राजेंद्र गावित यांनी विरार, वसई, वाडा, भिवंडीमार्गे ठाणे, नाशिकला जाणाऱ्या विविध मार्गांची तातडीने पुर्नबांधणी करावी, रस्त्यांचा अपेक्षित विकास साधावा अशी मागणी अभिव्यक्ती जनमंचचे अध्यक्ष उमाकांत वाघ यांनी केली आहे.
मंदिर परिसरात कोंडी
वज्रेश्वरीमध्ये खासगी वाहने, डंपर, अवजड व लक्झरी वाहनांची ये-जा, नियमांचे उल्लंघन करणारे चालक, अरुंद रस्ते व रस्त्याच्या दुतर्फा लावलेली वाहने व बांधकामे यामुळे सतत वाहतूक कोंडी असते. सुट्ट्यांच्या काळात तर मोठ्या प्रमाणात पर्यटक व भाविक दाखल झाले होते. या वाहनांमुळे वाहतुकीवर प्रचंड ताण येऊन वारंवार अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे.