नवी दिल्ली : बनावट माहिती देऊन केंद्रीय लोकसेवा आयोगाची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या पूजा खेडकरला लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने पूजा खेडकरची (Pooja Khedkar) अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी केलेली याचिका फेटाळली आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोग ही देशातील एक प्रतिष्ठीत संस्था आहे. पूजा खेडकरने फक्त या संस्थेचीच नाही तर समाजाची फसवणूक केली आहे. या प्रकरणात चौकशी व्हायला हवी आणि तथ्य समोर यायलाच हवे. चौकशीतून फसवणुकीचा सगळा कट उघड होऊ शकेल, असे मत व्यक्त करत दिल्ली उच्च न्यायालयाने पूजा खेडकरला अटक टाळण्यासाठी संरक्षण देऊ शकत नाही असे सांगितले. दिल्ली उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यामुळे पूजा खेडकरला लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.
अरे व्वा! आता रेल्वेच्या काश्मीर प्रवासात मिळणार गरम पाणी, गरम हवा!
पूजा खेडकरवर बनावट कागदपत्रे सादर करून केंद्रीय लोकसेवा आयोगाची फसवणूक केल्याचा तसेच प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी म्हणून कार्यरत असताना पद आणि अधिकारांचा गैरवापर करण्याचा आरोप आहे. प्राथमिक चौकशीअंती केंद्रीय लोकसेवा आयोगाने प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरला सेवेतून बडतर्फ केले. तसेच पूजावर भविष्यात केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्यास बंदी घातली. यानंतर पूजा खेडकरची चौकशी व्हावी यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाने तक्रार नोंदवली. अटकेच्या शक्यतेची जाणीव होताच पूजा खेडकरने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आणि अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी धडपड सुरू केली. या प्रकरणात आतापर्यंत झालेल्या सुनावणीनंतर दिल्ली उच्च न्यायालयाने पूजा खेडकरला अटकपूर्व जामीन फेटाळला. आई आणि वडील सरकारी सेवेत उच्च पदावर कार्यरत आहेत. यामुळे पूजा खेडकरच्या कृत्यात त्यांचाही हात असण्याची शक्यता आहे. या शक्यतेचीही चौकशी करण्याचे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत.
दिल्ली पोलिसांनी पूजा खेडकर (Pooja Khedkar) विरोधात एफआयआर नोंदवून घेतली आहे. ओबीसी आणि दिव्यांग यांच्यासाठी असलेल्या आरक्षणाच्या तरतुदींचा फायदा मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून त्याद्वारे केंद्रीय लोकसेवा आयोगाची फसवणूक केल्याचा आरोप पूजावर आहे. पूजाने चौकशीला सहकार्य करण्याची तयारी दाखवताना अटक करू नये अशी मागणी करणारी याचिका केली होती. तर दिल्ली पोलिसांनी पूजाच्या याचिकेला विरोध करताना अटक करुन चौकशी करणे आवश्यक असल्याचे सांगितले. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने पूजा खेडकरची अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी केलेली याचिका फेटाळली.