मुंबई : अलीकडेच घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत अनेकजण जखमी झाले. वारंवार आवाहन करून सुद्धा अनेकदा रस्ते आणि पदपथांवर पूर्वपरवानगीशिवाय फलक (होर्डिंग, बँनर किंवा पोस्टर) अनधिकृतपणे लावले जातात. मात्र याबाबत मुंबई महापालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आता महापालिकेकडून होर्डिंग छापणाऱ्या प्रिंटरना नोटीस बजावली जाणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबईत सार्वजनिक रस्ते आणि पदपथांवर पूर्वपरवानगीशिवाय फलक (होर्डिंग, बँनर किंवा पोस्टर) लावण्यास मुंबई महापालिकेकडून मनाई करण्यात आली आहे. तरीही अनधिकृत फलकबाजी होतेच. यावरून नुकतीच उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आता अनधिकृत फलक छपाई करून देणाऱ्या प्रिंटरना नोटीस बजावण्याचे पाऊल महापालिका उचलणार आहे. तसेच राजकीय पक्षांनाही अनधिकृत फलकबाजी रोखण्यासाठी आवाहन केले जाणार आहे.
Nandesh Umap : गायक नंदेश उमप यांच्या सुरांवर थिरकले कोळी बांधव
मुंबईत अनधिकृत फलक काढण्याची मोहीम मुंबई महापालिकेच्या अनुज्ञापन खात्याकडून वेळोवेळी राबवण्यात येते. तसेच संबंधितांविरोधात कारवाईही करण्यात येते. अनधिकृत फलक लावू नये, असे आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात येते. तसेच महापालिकेच्या www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर अधिकृत जाहिरात फलकांची यादीही प्रसिद्ध करण्यात येते. अनधिकृत फलक लावणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेविरोधात ‘महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक कायदा १९९५’मधील तरतुदी तसेच मुंबई महापालिका कलमांन्वये कादेशीर कारवाई करण्याची तरतूद आहे. त्यानुसार, संबंधितांवर गुन्हा दाखल करणे तसेच न्यायालयीन दावा दाखल करणे या कायदेशीर कारवाईचा समावेश आहे.
जानेवारी २०२४ मध्येही अनधिकृत फलकबाजी रोखण्यासाठी त्याची छपाई करून देणाऱ्या प्रिंटरना नोटीस बजावण्याचे निर्देश त्यावेळी मुंबई महापालिकेने दिले होते. त्यानंतर काही दिवस अनधिकृत फलक व प्रिंटरविरोधी कारवाई झाली. मात्र ही कारवाई आता थंडावली असून, पुन्हा एकदा या कारवाईच्या अंमलबजावणीचा विचार केला जात आहे. अनधिकृत फलक छपाई करणाऱ्या प्रिंटरना कायदेशीर नोटीस बजावली जाणार आहे. अनुज्ञापन विभागासोबत होणाऱ्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे.