Sunday, May 11, 2025

महामुंबईताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Railway Award : 'अतिविशिष्ट रेल सेवा पुरस्कार' सोहळ्यात मध्य रेल्वेची चमक

Railway Award : 'अतिविशिष्ट रेल सेवा पुरस्कार' सोहळ्यात मध्य रेल्वेची चमक

मुंबई :  अश्विनी वैष्णव, रेल्वे मंत्री, यांनी भारत मंडपम, प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे आयोजित ६९व्या रेल्वे सप्ताह "अतिविशिष्ट रेल सेवा पुरस्कार (AVRSP)" सोहळ्यात उत्कृष्ट कामगिरीसाठी १०१ पात्र रेल्वे कर्मचाऱ्यांना विविध श्रेणींमध्ये सन्मानित केले तसेच क्षेत्रीय पातळीवरील उत्कृष्ट कामगिरीसाठी २२ शिल्ड्स झोनल रेल्वेंना प्रदान केल्या.

मध्य रेल्वेसाठी हा अभिमानाचा क्षण होता कारण मध्य रेल्वे मुख्यालयातील दोन अधिकारी आणि मुंबई विभागातील दोन कर्मचाऱ्यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते वैयक्तिक श्रेणीत "अतिविशिष्ट रेल सेवा पुरस्कार" प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्राप्त करणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती पुढीलप्रमाणे आहे ...

हेमंत जिंदल, उपमुख्य दक्षता अधिकारी, मध्य रेल्वे मुख्यालय यांनी नवकल्पना, प्रक्रिया व कार्यप्रणालींमध्ये सुधारणा करून खर्चात बचत, उत्पादनवाढ व आयात प्रतिस्थापन यासाठी पुरस्कार प्राप्त केला.




जिंदल यांनी "ऑनलाईन दक्षता स्थिती व्यवस्थापन प्रणाली (OVSMS)" तयार केली, जी सर्व राजपत्रित व अराजपत्रित कर्मचाऱ्यांसाठी दक्षता स्थिती कागदविरहित पद्धतीने जारी करण्याची सुविधा देते. यामुळे दक्षता स्थिती जारी करण्याचा कालावधी ६ दिवसांवरून एका दिवसावर कमी झाला आहे. त्यांनी खाजगी साइडिंग मालकांकडून रु.४७.११ कोटींच्या पुनर्प्राप्तीच्या प्रस्तावात महत्त्वपूर्ण योगदान दिले, ज्यापैकी रु. ६.३१ कोटी ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वसूल झाले आहेत.

व्ही. एम. माशीदकर, मुख्य आगार साहित्य अधीक्षक यांनी साहित्य व्यवस्थापन विभाग प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण केल्याबद्दल पुरस्कार प्राप्त केला. उच्च मूल्य असलेल्या टेंडर प्रकरणांची प्रक्रिया ३० दिवसांत पूर्ण करून वेळेत प्रकरणे निकाली काढण्याचे उल्लेखनीय कार्य केले. माशीदकर यांनी साठा आणि थकबाकीचे मासिक नियोजन करून साहित्याची उपलब्धता सुनिश्चित केली.

सुधा वेदप्रकाश द्विवेदी, उपमुख्य तिकीट निरीक्षक, मुंबई विभाग यांनी महसूल वाढ व विनातिकीट प्रवास रोखण्यासाठी विशेष प्रयत्नांसाठी पुरस्कार प्राप्त केला. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे ९,१०५ नियमबाह्य प्रवास प्रकरणे शोधून रु. ३२,२५,०८० इतकी रक्कम वसूल करण्यात आली. त्यांनी "तेजस्विनी" महिला तिकीट तपासणी पथकाबरोबर काम करताना प्रवासी तक्रारींवरही तात्काळ कार्यवाही केली.

पवन नीना फिरके, सहाय्यक/सीअँडडब्ल्यू (खलाशी सहाय्यक), मुंबई विभाग परिचालन यांनी सुरक्षा व मालमत्तेच्या देखभालीसाठी अनुकरणीय कामगिरी बजावल्याबद्दल पुरस्कार प्राप्त केला. ट्रेन क्र. 17614 नांदेड - पनवेल एक्सप्रेसची तपासणी करताना गरम ऍक्सलची समस्या ओळखून संभाव्य अपघात टाळला. हे प्रतिष्ठित पुरस्कार कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीची पोचपावती देतात आणि इतरांना उत्कृष्टतेसाठी प्रयत्नशील होण्याची प्रेरणा देतात.

Comments
Add Comment