Thursday, March 20, 2025
Homeसाप्ताहिककोलाजअष्टपैलू अटलजी

अष्टपैलू अटलजी

“भारताच्या पश्चिम किनाऱ्याला सुशोभित करणाऱ्या महासागराच्या तटावर उभा राहून मी अशी भविष्यवाणी करण्याचे धाडस करतो की, अंधार नाहीसा होईल, सूर्य उगवेल, कमळ उमलेल आणि ही भविष्यवाणी आज खरी झालेली आपण पाहातोय, राजनेता आणि कवी असा अलौकिक संगम म्हणजे अटलजी…”

डॉ. कांता नलावडे

“हिंदू तनमन हिंदू जीवन रग रग हिंदू मेरा परिचय” असा आपला परिचय देणारे भारतरत्न पूर्व प्रधानमंत्री श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांची २५ डिसेंबर २०२४ रोजी जन्मशताब्दी आहे. श्रद्धेय अटलजींचा जन्म मध्य प्रदेशात ग्वालियरमध्ये शिंदेंच्या छावणीत २५ डिसेंबर सन १९२४ च्या ब्रह्ममुहूर्तावर झाला. योगायोग असा की त्याच दिवशी ईसा मसीहांचाही जन्मदिवस होता. खरे तर अटलजींना आपला वाढदिवस मनापासून साजरा करायला आवडत नसे, त्यांनी आपल्या “नये मिलका पत्थर या कवितेतून सुचित केले होते. ते म्हणतात…
“केवल काया जीती मरती
“इसलिये उम्रका बढ़नाभि
त्योहार हुआ
नये मिलका पत्थर पार हुआ”
‘उम्रका बढ़ना त्योहार हुआ’
या ओळी खूप काही सांगून जातात…

राजकारणात राहून अजात शत्रू असणारा नेता प्रथितयश कवी, अपराजेय वक्ता, संवेदनशील व्यक्ती, मंत्रमुग्ध करणारी वाणी, साधी राहाणी, उच्च विचारसरणी असणारे लोकप्रिय पंतप्रधान, तसेच खाण्याची तेवढीच रुची ठेवणारे अटलजी खिचडीचेही शौकिन होते. मानवी जीवनाप्रमाणेच राजकीय पक्षाचेही जीवन सतत बदलते, विकसित होत राहाते. काळ बदलतो, शक्ती वाढत असते. भारतीय जनता पार्टीचा प्रवास जनसंघ जनता पार्टी असा सुरू झाला. भारतीय जनता पार्टीचा संघर्षमय प्रवास शून्यातून विश्व निर्माण करणारा ठरला. स्थापनेपासूनच पक्षाची शक्ती वाढत राहिली. पिढ्या बदलल्या, नेते बदलले तरीही पक्षाचा प्रवाह खळखळतच राहिला. मूळ विचारधारा पुढे नेणारे नव्या पिढीतले नवे नेतृत्व उभे राहिले. याचे कारण या विचारधारेचा कस बावनकशी होता. त्याचा पाया १९८० साली भारतीय जनता पार्टीच्या रूपाने भक्कम उदयाला आला. भारतीय जनता पार्टीचे प्रथम राष्ट्रीय अध्यक्ष अटलजींच्या नावाची घोषणा झाली व एकच जयघोष आसमंतात दुमदुमला. त्यावेळचे भारतीय जनता पार्टीचे प्रथम अध्यक्ष अटलबिहारी वाजपेयी यांच्या पहिल्या भाषणाने हा पाया अधिकच भक्कम झाला. “मी हे जाणतो की भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष पद हा काही एखादा अलंकार नव्हे, वस्तुतः हे पद नव्हे तर आव्हान आहे. परमेश्वराला माझी प्रार्थना आहे की, तो मला शक्ती आणि विवेक देवो, ज्यामुळे मी ही जबाबदारी योग्य रीतीने पार पाडू शकेन.” पुढे ते म्हणतात, “आम्ही तर एका हातात भारताची राज्यघटना आणि दुसऱ्यामध्ये समतेचे निशाण घेऊन मैदानात लढू आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि संघर्ष यांच्यापासून प्रेरणा घेऊ, सामाजिक समतेचा बिगुल फुंकणारे महात्मा फुले आमचे पथदर्शक असतील. विचारांची उंची असणारे असे हे अटलजी खरे तर द्रष्टेही होते.

प्रथम अध्यक्ष या नात्याने केलेल्या भाषणाचा समारोप करताना ते म्हणतात, “भारताच्या पश्चिम किनाऱ्याला सुशोभित करणाऱ्या महासागराच्या तटावर उभा राहून मी अशी भविष्यवाणी करण्याचे धाडस करतो की, अंधार नाहीसा होईल, सूर्य उगवेल, कमळ उमलेल आणि ही भविष्यवाणी आज खरी झालेली आपण पाहातोय, राजनेता आणि कवी असा अलौकिक संगम म्हणजे अटलजी. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्य सेनानीबद्दल ते लिहितात : “जो बरसॉलक लडे जेलमे उनकी याद करे जो फांसीपर चढे, खेलमें उनकी याद करे, याद करे काला पानी को अंग्रेजोंकी मनमानीको, कोलूमे जूट तेल पेरले सावरकर के बलिदानी को.” सावरकरांना झालेली काळ्या पाण्याची शिक्षा, ५० वर्षे जेलमध्ये सोसलेले हाल, अशक्त असतानाही कोलूवर त्यांना तेल काढावे लागत असे, अशा सुपुत्रांसाठी या कवितेत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अटलजी म्हणायचे, कविता मुझे विरासतमें मिली है, गुठीके साथ पिलायी है. अटलजींचे वडील कृष्णबिहारी वाजपेयी हे प्रख्यात कवी होते. अटलजी संवेदनशील मनाचे होते, कोणावरही अन्याय वा अत्याचार झालेला त्यांना सहन होत नसे. महिलांवरील अत्याचाराने तर ते व्यथित व्हायचे, आजही महिला सुरक्षित नाहीत. तिची लाज राखणारा कोणी दिसत नाही. महाभारतातल्या प्रतीकाचा वापर करून “कौरव पांडव” या कवितेत ते म्हणतात :
“कौरव कौन
कौन पांडव
टेढा सवाल है
दोनो और शकुनि का पफैला
कुट जाल है
धर्म राजने छोडी नहीं
जुए की लत है
हर पंचायत में
पांचाली अपमानित है
बिना कृष्णके आज
महाभारत होना है
कोई राजा बने
रंक को तो रोना है”

ही कविता आपल्यालाही अंर्तमुख करते. १९९६ ला १० वी लोकसभा जिंकल्यावर पंतप्रधान अटलजींना विश्वासमत ठरावाला सामोरे जावे लागले होते. १३ दिवसांचे सरकार केवल १ मताने पडले होते. एका मतासाठी त्यांनी सौदेबाजी केली नाही आणि अटलजींनी आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सुपुर्द केला. त्या दिवशीचे संसदेमधील त्यांचे भाषण आजही गाजते आहे. लोकशाहीवर विश्वास ठेवणारे ते नेते होते. देशामध्ये कधी धृवीकरण होऊ देऊ नये, असे ठाम मत त्यांचे होते. “सरकारे आयेगी जायेगी, पार्टीया बनेगी बिगड़ेगी लेकिन देश अबादित रहना चाहिये, देशका लोकतंत्र जीवित और विकसित रहना चाहिये. मजबूत रहना चाहिए” संसदेत त्या भाषणात त्यांनी या भावना आपल्या व्यक्त केल्या होत्या.
देशाला जमिनीवर पाय असणाऱ्या व्यक्तींची गरज आहे, असे म्हणताना ते सांगतात :
धरतीको बौनोंकी नहीं
उंचे कदके इंसानोंकी जरूरत है किंतु इतने उंच भि नहीं
कि पावलले दूब ही न जमे
अटलजींच्या जन्मशताब्दीबद्दल लेख लिहिताना त्यांनी त्यांच्या वाढदिवशी केलेल्या कवितेने समोरोप करते.
हर पचीस दिसंबरको जीनेकी नई सीडी चढता हूँ नए मोडपर
औरोंसे कम स्वयंसे ज्यादा लढता हूँ मेरा मन तुझे अपनीही अदालत में खड़ा कर जब जिरह करता है मेरा हलफनामा मेरे ही खिलाफ पेश करता है
तो मैं मुकादमा हार जाता हूँ
आत्मपरीक्षण करणारे अष्टपैलू, अजातशत्रू भारतरत्न पूर्व प्रधानमंत्री अटलजींना जन्मशताब्दीसाठी
शतशः वंदन !!!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -