परेलमधील सोशल सर्व्हिस लीग प्राथमिक शाळेचा उपक्रम
मुंबई : विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना प्रात्यक्ष कृतीतून व्यवहार समजण्यासाठी परेल येथील सोशल सर्व्हिस लीग प्राथमिक शाळेत (Social Service League Primary school) नेहमीच विविध उपक्रम राबवले जातात. लहान वयातच मुलांना व्यवहाराचे प्रशिक्षण मिळावे यासाठी यंदा शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी शाळेतील सभागृहात आगळावेगळा बाजारहाट भरवला होता. या बाजारहाट उपक्रमात शाळेच्या प्रांगणात उपलब्ध असणाऱ्या व्यवसायांचा समावेश होता.
दामोदर नाट्यगृहात होणारी तिकीट विक्री, वाचनालयात मिळणारी पुस्तके, स्त्रियांच्या औद्योगिक शाळेतील हस्तनिर्मित कलाकुसरीच्या वस्तू यांची खरेदी विक्री मधूनच स्वावलंबी बनण्याचे तंत्र विद्यार्थ्यांनी आपल्या नाट्यकरणातून पालकांना पटवून दिले. तसेच उपहारगृहासह जिमखानामध्ये होणारे सर्व व्यवहारांबद्दल यावेळी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. तसेच बदलत्या तंत्रज्ञानानुसार होणारे व्यवहार म्हणजेच कॅशलेस पेमेंट कसे केले जाते याचे मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमाची संकल्पना सोशल सर्व्हिस लीग प्राथमिक शाळेतील शिक्षिका आरती पाटील यांनी केली असून उपक्रमात शाळेतील शिक्षकांसह शिपाई व सर्व पालकांचा मोलाचा वाटा आहे. त्याचबरोबर हा बाजारहाट भरविण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका शरयू कोलगे यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे पदाधिकारी उमा शेट्टी मॅडम यांनी प्रत्यक्ष भेट देऊन मार्गदर्शन केले तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री.आनंद माईणकर, प्रकाश कोंडूरकरसर, विजय वर्टी, विशवनाथ सावंत सर यांचे प्रोत्साहन आणि सहकार्य लाभले.