अॅड. रिया करंजकर
शाळेत शिक्षण कमी आणि शाळेसाठी लागणारी कागदपत्रे जास्त झालेली आहेत. ही कागदपत्रे जमा करताना पालकांच्या नाकी नऊ येते. काही कागदपत्रे आपल्याकडे नसतात, ती शोधण्यासाठी त्यांची धावपळ होते. एक कागदपत्र मिळाले की, त्याला दुसरे कागदपत्र पाहिजे असे सांगितले जाते, काही पालकांकडे ती असतात, तर काहींकडे ती नसतात. जातीचा दाखला काढल्यानंतर त्याची जात पडताळणी करताना गावच्या सातबाऱ्यापासून ते वास्तव्यापर्यंत सगळी कागदपत्रे लागतात. एवढेच नाही तर मुलांचे आजोबा तसेच त्यांच्याही पूर्वीपासूनची कागदपत्रे गोळा करावी लागतात. सचिन आणि त्याचा भाऊ वैभव हे कामानिमित्त मुंबई शहरांमध्ये राहत होते आणि गावाकडे त्यांचे आई-वडील व काका-काकी राहत होते. सचिनची मुले शाळेत जाऊ लागल्यावर त्यांना काही कागदपत्रांची जरुरी होती. एवढ्या वर्षे कुठल्याच कागदपत्रांची त्यांना जरुरी लागली नव्हती. त्यामुळे आता मुलांच्या शाळेसाठी त्यांची धावपळ सुरू झाली, म्हणून त्यांनी गावाकडील सातबारा उतारा काढला आणि सचिन आणि वैभवला अक्षरशः धक्का बसला. कारण अर्ध्यापेक्षा जास्त जमिनी त्यांच्या गावातल्या आप्पांच्या नावावर होती. तो त्यांच्या गावातला सावकार होता. त्यामुळे त्यांनी गावातील ग्रामपंचायतीमध्ये चौकशी केली असता तलाठी आणि ग्रामसेवक यांनी सांगितले की, आम्ही आता नवीन आलेलो आहोत हे अगोदरच झालेले आहे, त्यामुळे आम्हाला यातले काही माहीत नाही. सचिन आणि वैभवला वाटले की, आप्पाने आपल्या आई-वडिलांची घोर फसवणूक केलेली आहे. ते अडाणी आहेत. त्याच्यामुळे त्यांना काही कळले नाही, म्हणून ते दोघेही आप्पाकडे गेले आणि याच्याबद्दल जाब विचारला, त्यावेळी आप्पाने मी तुमची जमीन विकत घेतली आहे असे त्यांनी उत्तर दिले, तुम्हाला जे काय करायचे ते करा असे धमकी वजा उत्तर आप्पाने दिले. आपली जमीन विकली आहे तर आपल्याला त्याची खबर कशी नाही, असा दोघांनाही प्रश्न पडला, म्हणून आपल्या आई-वडिलांना प्रश्न विचारायचा ठरवले; पण त्यांना पूर्ण खात्री होते की, आपले आई-वडील असे काहीही करणार नाहीत. आपली जमीन विकणार नाही. तरीही त्यांनी आपल्या आई-वडिलांना विचारले की आपल्या सातबाराच्या उताऱ्यावर अप्पाचे नाव कसे, तर दोघांनीही उत्तर दिले की हे कसे झाले आम्हाला माहीत नाही, आम्ही एवढे दिवस आपली जमीन कसत आहोत, त्याच्यात पीक काढत आहोत, ती आपली जमीन आहे त्याचे नाव कसे लागले आपल्याला माहीत नाही. त्याने काहीतरी केले असणार असे सचिनच्या आई-वडिलांनी उत्तर दिले. सचिनच्या आईला तयार गोष्टीतले काहीच माहीत नव्हते. आपली जमीन आता आपल्या नावावर नाही म्हणून ती ढसाढसा रडू लागली.
मुलांना ती विनवू लागले की आपली जमीन आपल्या नावावर करून घ्या, त्यासाठी काहीही करा, म्हणून सचिन आणि वैभव यांनी शहरांमध्ये जाऊन आप्पाच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आणि ज्यावेळी आप्पा आणि सचिन वैभवच्या कुटुंबाला पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले, त्यावेळी आप्पांनी आपण ती जमीन विकत घेतलेली आहे आणि ती नावावर केलेली आहे असे तो ठामपणे सांगितले. ही जमीन आपण सचिनच्या वडिलांकडून विकत घेतलेली आहे आणि त्याचे थोडे थोडे पैसे मी त्यांना दिलेले आहे असे अप्पा सांगू लागला. पण सचिनचे वडील ते मान्य करत नव्हते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना दम दिल्यानंतर त्याने हो मीच ती जमीन आप्पाला विकलेली आहे आणि थोडे थोडे पैसे मी घेत होतो. त्यावेळी सचिनने विचारले ते पैसे तुम्ही काय केलेत आणि एवढी जमीन विकली त्याचे किती पैसे घेतलेत. त्यावेळी त्यांनी एवढ्या पूर्ण जमिनीचे दोन लाख रुपये घेतले असे सांगितले. लाखोंची जमीन दोन लाखाला आप्पाला सचिनच्या वडिलांनी विकली होती व ते दोन लाख रुपये कुठे आहेत असे विचारल्यानंतर मी थोडे थोडे पैसे घेत होतो आणि त्याची दारू पीत होतो आणि दारूसाठी ते पैसे उडवले असे सचिनच्या वडिलांनी सांगितले. ज्यावेळी सचिनच्या वडिलांना पैशांची गरज असायची त्यावेळी ते आप्पाकडून पैसे घेत असत, असे करता करता दोन लाख रुपये झाले होते आणि त्याच्या बदल्यात सचिनच्या वडिलांनी ती जमीन आप्पाच्या नावावर करून दिली होती.
दारूच्या नादामुळे सचिनच्या वडिलांनी ती जमीन घालून बसलेले होते. आज मुलांना शाळेमध्ये कागदपत्रांची गरज होती त्यासाठी शोधाशोध चालू झाली. त्यावेळी हा सर्व प्रकार सचिन आणि वैभवला समजला. मी सचिन आणि वैभव घरी आल्यानंतर त्यांना विचारत होते, त्यावेळी सचिनच्या वडिलांनी मला काहीच माहीत नाही असे उत्तर दिलेले होते. पोलिसांचा दम मिळाल्यानंतर मात्र त्यांनी ते कबूल केले. आपल्या वडिलांनी दारूसाठी जमीन विकली यापेक्षा आता ती जमीन आपली नाहीये याचे दुःख दोघांना होऊ लागले. रिटायर झाल्यानंतर गावी जाऊन शेती करणार असे सगळ्यांना सांगणारा सचिन आता गावी येऊन काय करणार होता. सचिन आणि वैभवी यांनी आपल्या वडिलांना कुठेतरी फसवले गेलेले आहे. लाखोंची जमीन दोन लाखांमध्ये आपण एक खरेदी केलेली आहे आणि या जमिनीचा व्यवहार होताना आपल्या वडिलांनी आपल्याला काही सांगितले नाही. या सगळ्यांचा विचार करून त्यांनी आप्पा यांच्याविरुद्ध न्यायालयात तक्रार दाखल केली. दारूसाठी जमीन गेली. या दारूमुळे अनेक घरही उद्ध्वस्त होतात. काहींचे आयुष्य बरबाद होऊन जाते. या दारूमुळे सचिन आणि वैभवची जमीन गेलेली होती आणि ती मिळवण्यासाठी त्यात न्यायालयीन लढाई लढत आहेत. (सत्यघटनेवर आधारित)