स्वाती पेशवे
दरवर्षी २४ डिसेंबर रोजी भारतीय ‘ग्राहक दिन’ साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर आजच्या डिजिटल युगातील ग्राहकांच्या हक्कांची चर्चा होणे गरजेचे आहे. सध्या ऑनलाइन शॉपिंग आणि ई-कॉमर्सचा प्रचंड विस्तार झाला आहे. त्यामुळे ग्राहकांसमोर नवनवीन आव्हाने निर्माण झाली आहेत. त्यामुळेच बनावट उत्पादने, सायबर फसवणूक आणि गोपनीयतेचे उल्लंघन यासंबंधीच्या अधिकारांबद्दल त्यांनी जागरूक असणे महत्त्वाचे आहे.
आजच्या जगात ग्राहक हा राजा आहे. देशाची तसेच जगाची अर्थव्यवस्था भोवती फिरत असल्यामुळे ग्राहकाचे महत्त्व कमालीचे वाढले असून सगळी आर्थिक यंत्रणाच त्याच्याभोवती फिरत असल्याचे चित्र दिसते. त्यामुळेच दर वर्षी २४ डिसेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या भारतीय ग्राहक दिनाला अलीकडे आगळे महत्त्व आल्याचे दिसते. हा दिवस लोकांना ग्राहक चळवळीचे महत्त्व अधोरेखित करण्याची संधी देतोच; खेरीज ग्राहकाला त्याच्या हक्क आणि जबाबदाऱ्यांबद्दल जागरूक करतो. थोडक्यात, ग्राहक हक्क दिनाची उद्दिष्ट्ये साध्य करणे हे या सादरीकरणामागचे प्रयोजन असते. या पार्श्वभूमीवर आणि या दिवसाच्या निमित्ताने ग्राहक संरक्षण कायद्याचे उद्दिष्ट जाणून घेणे गरजेचे आहे. त्यातील एक म्हणजे ग्राहकांनी सदोष वस्तू आणि सेवांची नेमकी पारख करणे. हे झाले तरच ते अशा नकली, अयोग्य वस्तू आणि सेवांच्या खरेदीपासून दूर राहू शकतील. आज व्यापाराच्या अनुचित व्यापारपद्धती सर्रास पाहायला मिळतात. यामार्फत ग्राहकांचे आर्थिक शोषण करण्याचे अनेक प्रकार घडताना दिसतात. अशा विविध प्रकारांपासून प्रभावी संरक्षण प्रदान करणे आणि याप्रती जागरूकता निर्माण करणे हे या दिवसाच्या साजरीकरणाचे एक उद्दिष्ट्य आहे. ग्राहकांना त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी आणि फसवणूक, काळाबाजार इत्यादींना बळी पडल्यास तक्रार करता यावी यासाठी हा दिवस साजरा
केला जातो.
राष्ट्रीय ग्राहक दिन सातत्याने साजरा केला जात आहे. यानिमित्ताने विविध थीम्सचा आधार घेतला जातो. जसे की, एका वर्षी राष्ट्रीय ग्राहक दिनाची थीम ‘कॉम्बेटग प्लास्टिक पोल्युशन’ अशी होती. प्लास्टिक कचरा ही जगासमोरील एक मोठी समस्या बनली असल्याचे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. या समस्येला तोंड देण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात असून अशा प्रकारच्या थीमवर एखादा दिवस साजरा करणे हा याविषयी जागरूकता निर्माण करण्याचा महत्त्वाचा प्रयत्न म्हणायला हवा. आपल्याकडे ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ अस्तित्वात असून हा कायदा आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वीकारल्या गेलेल्या सर्व ग्राहक हक्कांचे संरक्षण करतो. या कायद्यानुसार, ग्राहक हक्कांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी केंद्र, राज्य आणि जिल्हा स्तरावर ग्राहक संरक्षण परिषदांची स्थापना करण्यात आली आहे. या अंतर्गत ग्राहकांच्या अनेक अधिकारांचे रक्षण होते. त्यामुळेच प्रत्येक ग्राहकाने याची माहिती घ्यायला हवी. उदाहरणार्थ या कायद्यानुसार प्रत्येक ग्राहकाला सुरक्षेचा अधिकार आहे. या अन्वये त्याला जीवनाला हानिकारक असणाऱ्या वस्तू आणि सेवांपासून संरक्षण प्रदान केले जाते. त्याप्रमाणे प्रत्येक ग्राहकाला माहितीचा अधिकारही आहे. ग्राहकाला दिल्या गेलेल्या उत्पादने, सेवांची गुणवत्ता, प्रमाण, वजन आणि किंमत याविषयी माहिती देणे विक्रेत्यावर वा सेवा देणाऱ्यावर बंधकारक आहे. यामुळे कोणत्याही ग्राहकाची अनुचित व्यापार पद्धतींद्वारे फसवणूक होणार नसल्याची काळजी घेण्यात आली आहे. खेरीज प्रत्येक ग्राहकाला वस्तू आणि सेवा निवडण्याचा अधिकार आहे.
आजच्या काळात स्पर्धात्मक किमतींमुळे ग्राहकाची दिशाभूल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याने विविध प्रकारच्या वस्तू आणि सेवांचा तौलनिक अभ्यास करून योग्य त्या किमतीत खरेदी करणे हे यामागील उद्दिष्ट्य आहे. या बरोबरच ग्राहकांच्या तक्रारीची योग्य मंचावर सुनावणी घेण्याचा अधिकार आणि या प्रकरणाचा योग्य विचार केला जाईल, असे आश्वासन मिळणेही कायद्याने बंधनकारक आहे. प्रत्येक ग्राहक अनुचित किंवा प्रतिबंधात्मक व्यापारपद्धती तसेच शोषणाविरुद्ध कायदेशीर उपाययोजना करू शकतो. वरील कायदा त्याला हा महत्त्वपूर्ण अधिकार देतो. त्याचबरोबर ग्राहकाला नुकसानभरपाईचाही अधिकार आहे. एखाद्या उत्पादनामुळे किंवा सेवेमुळे ग्राहकाला हानी पोहोचल्यास त्याला किंवा तिला वाजवी भरपाई मिळण्याचा अधिकार या कायद्याने दिला आहे.
हे सर्व लक्षात घेता २४ डिसेंबर या दिवसाचे महत्त्व अधोरेखित होते. भारतातील मोठी बाजारपेठ आणि इथला प्रचंड मोठा ग्राहकवर्ग, त्याची मोठी क्रयशक्ती या सर्वांचे महत्त्व देशालाच नव्हे तर जागतिक बाजारपेठेला समजले असल्यामुळे आता प्रत्येक ग्राहकाने या अर्थाने साक्षर होण्याची गरज प्रकर्षाने जाणवते. तेव्हा ग्राहकांनी या मूळ कायद्याचा आणि नंतर त्यात १९९१ आणि १९९३ मध्ये झालेल्या सुधारणांचा अवश्य अभ्यास करावा. ग्राहक संरक्षण कायदा अधिक कार्यक्षम आणि उद्देशपूर्ण करण्यासाठी डिसेंबर २००२ मध्येही त्यात सर्वसमावेशक सुधारणा आणण्यात आली आणि १५ मार्च २००३ पासून अमलात आली, याचीही नोंद घ्यायला हवी.
ग्राहकांसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या अशा या दिनी विविध सामाजिक, सरकारी संस्था आणि ग्राहक मंचांद्वारे जनजागृती मोहीम राबवली जाते. त्यामध्ये कार्यशाळा आणि परिसंवाद आयोजित केले जातात. त्यामध्ये ग्राहकांना त्यांचे हक्क आणि कर्तव्ये याबद्दल माहिती दिली जाते. जनजागृतीसाठी सोशल मीडिया आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्मवरही अनेक मोहिमा राबवल्या जातात. यानिमित्ताने हेदेखील लक्षात घ्यायला हवे की, भारतातील ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी ग्राहक चळवळींनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ग्राहक संस्था आणि एनजीओ सक्रियपणे बाजारातील अनियमितता अधोरेखित करतात आणि ग्राहकांना न्याय मिळवून देण्यास मदत करतात. या संघटनांच्या सक्रियतेमुळेच ग्राहक संरक्षण कायदा अधिक प्रभावी झाला आहे. त्यामुळे ग्राहकांनी अशा चळवळींच्या बळकटीसाठी पुढे येण्याची गरज ओळखायला हवी. याचे कारण म्हणजे आतापर्यंत ग्राहक संरक्षणाच्या क्षेत्रात बरीच प्रगती झाली असली तरी अजूनही अनेक आव्हाने शिल्लक आहेत. बनावट जाहिराती, गुणवत्तेचा अभाव आणि ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण न होणे या अजूनही सामान्य समस्या आहेत. यासाठी सरकारने कडक नियम लागू करून ग्राहकांचे प्रबोधन करण्याची गरज आहे. खेरीज आजच्या जगात महत्त्वाच्या ठरणाऱ्या, आजच्या डिजिटल युगातील ग्राहकांच्या हक्कांची चर्चाही यानिमित्ताने व्हायला हवी. सध्या ऑनलाइन शॉपिंग आणि ई-कॉमर्सचा प्रचंड विस्तार झाला आहे. त्यामुळे ग्राहकांसमोर नवनवीन आव्हाने निर्माण झाली आहेत आणि होत आहेत.
बनावट उत्पादने, सायबर फसवणूक आणि गोपनीयतेचे उल्लंघन यासारख्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी ग्राहकांनी डिजिटल सुरक्षितता आणि यासंबंधीच्या आपल्या अधिकारांबद्दल जागरूक असणेही अत्यंत महत्त्वाचे आहे. आणखी एक महत्त्वपूर्ण मुद्दा पर्यावरण आणि ग्राहकांची जबाबदारी हा असून आज ग्राहकांची जबाबदारी केवळ त्यांच्या हक्कांपुरती मर्यादित नाही, तर पर्यावरणाप्रतीही आहे, हे यानिमित्ताने लक्षात घ्यायला हवे. शाश्वत आणि पर्यावरणपूरक उत्पादनांना प्राधान्य देणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे आणि जबाबदारीने खरेदी करणे ही काळाची गरज प्रत्येक ग्राहकाने आता तरी ओळखायला हवी. थोडक्यात, हा दिवस ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी, त्यांच्या जबाबदाऱ्या समजावून सांगण्यासाठी आणि संतुलित, पारदर्शक बाजारपेठ सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. केवळ जागरूक ग्राहकच समाज आणि बाजार या दोन्हींना सक्षम करू शकतात. हे लक्षात घेऊन हा दिवस साजरा केला तर ती केवळ औपचारिकता न राहता ग्राहक जागृतीचे सशक्त माध्यम ठरेल यात शंका नाही. हा दिवस खऱ्या अर्थाने यशस्वी करण्याचा हाच एक मार्ग आहे.