श्रीनिवास बेलसरे
जुन्या चित्रपटांत गाण्यांना आणि संगीताला अनन्यसाधारण महत्त्व होते. अनेक चित्रपटांत तब्बल ९/१० च्या आसपासही गाणी असायची. कथेला, अभिनयाला, कलाकार निवडीलाही खूप महत्त्व दिले जाई. त्यामुळे त्या चित्रपटांची पकड लोकांच्या मनावर आजही टिकून आहे. ‘मेरा नाम जोकर’सारखा एखादा चित्रपट सुरुवातीला पडला तरी नंतर राज कपूरचे चाहते तो अनेकदा बघत असत आणि त्यातली आशयपूर्ण, कर्णमधुर गाणी, तर कित्येक वर्षे रसिकांच्या मनावर
राज्य करत.
असाच एक चित्रपट होता. १९६३ साली आला – ‘दिल ही तो हैं’! निर्माते होते बी. एल. रावल आणि दिग्दर्शक पी. एल. संतोषी आणि सी. एल. रावल. प्रमुख भूमिकेत होते. राज कपूर (युसूफ), नूतन (जमिला बानो), प्राण (शेखू), आगा (बशीर), नजीर हुसेन (खान बहादूर), मनोरमा (शेखूची आई) आणि लीला चिटणीस (आया). नवाब जलालुद्दिन यांची तीन अपत्ये लहानपणीच मृत्यू पावल्यामुळे, ते आपले चौथे अपत्य असलेल्या युसूफला (राज कपूर) सांभाळायला नातेवाइकांकडे ठेवतात. जेव्हा मुलाला परत नवाबांकडे पाठवायचे असते तेव्हा युसूफऐवजी, आपल्याच मुलाचे कल्याण व्हावे, म्हणून नातेवाईक त्याचा मुलगा शेखू (प्राण) याला ‘हाच तुमचा युसूफ’ म्हणून नवाबांकडे पाठवतो. त्यातून गुंतागुंत होत गेलेली गंमतीशीर कथा म्हणजे ‘दिल ही तो हैं.’ रोशनसारख्या संगीतकाराचे कर्णमधुर संगीत आणि साहीरसाहेबांची तब्बल १० गाण्यांमुळे चित्रपट आजही अनेकांच्या लक्षात आहे. दहापैकी निवडक २/३ गाण्यांचा नुसता उल्लेखही अनेकांना त्यांचा तरुणपणीचा काळ आणि त्यात येऊन गेलेल्या वेगवेगळ्या व्यक्ती आठवायला लावेल.
नुकत्याच प्रेमात पडलेल्या युवा मनाची अवस्था दाखवणारी आशाताईंच्या मधाळ आवाजातली कव्वाली ‘निघाहे मिलाने को जी चाहता हैं’ अप्रतिम होती. मुकेशने गायलेले ‘दिल जो भी कहेगा मानेंगे, दुनिया में हमारा दिल ही तो हैं’ आणि त्याच्याबरोबर सुमन कल्याणपूर यांनी गायलेले ‘चुरा न ले तुम्हे ये मौसम सुहाना, खुली वादीयो में अकेली ना जाना,’सारखे सुंदर भावगीत त्या काळच्या जगण्यातील एकंदर निवांतपणाची आठवण देते. राज कपूरच्या निरागस अभिनयाने भरलेले ‘भुलेसे मुहब्बत कर बैठा, नादान था बेचारा, दिल ही तो हैं.’ सारख्या गाण्यांनी आपल्याही मनात कुठेतरी दडी मारलेलीच असते. मन्नाडेंच्या पहाडी आवाजातले, ‘लागा चुनरी मे दाग,’ आजही जाणकारात लोकप्रिय आहे. घरगुती गाण्याच्या भेंड्यातही ते अजून साभिनय गायले जाते. याच चित्रपटात राज कपूरच्या तोंडी मुकेशने गायलेले एक नाजूक प्रेमगीत होते-
‘तुम अगर मुझको न चाहो
तो कोई बात नहीं,
तुम किसी और को
चाहोगी तो मुश्कील होगी.’
काहीशा भाबड्या प्रेमिकाच्या मनात हमखास येणारी भावना साहिरजींनी छान चितारली होती. तो तिला म्हणतोय, जशी मला तू हवीहवीशी वाटतेस तसे तुला माझ्याबद्दल वाटत नसेल तरी काही हरकत नाही. पण जर तुला दुसऱ्या कुणाबद्दल प्रेम असेल, तर माझे फार अवघड होऊन बसेल गं! आता जरी ‘आपल्यात काही संबंध नाहीत,’ असे तू म्हणशील तरी प्रिये, निदान दुरावा नाही याचेही मला खूप समाधान आहे. आपल्यात काही घडले नसेल तरी हरकत नाही, निदान काही बिघडलेले नाही हा दिलासा काय कमी आहे?
‘अब अगर मेल नहीं है,
तो जुदाई भी नहीं.
बात तोड़ी भी नहीं,
तुमने बनाई भी नहीं.’
तो म्हणतो, ‘मला हे समाधान पुरेसे आहे की, आज तू माझी नसशील तरी अजून इतर कुणाचीही नाहीस. तेही पुष्कळ आहे,’ असे हे काहीही बहाणे शोधून समाधान मानत राहणे केवळ साहीरसारखा रोमँटिक शायरच इतके छान मांडू शकतो.
‘ये सहारा भी बहुत है
मेरे जीनेके लिए,
तुम अगर मेरी नहीं हो,
तो पराई भी नहीं.’
राज कपूर लाडीक नूतनला म्हणतो, ‘तुला माझ्या प्रेमळ मनाचे कौतुक वाटले नाही तरी काही हरकत नाही पण जर तुला दुसऱ्या कुणाच्या मनाने मोहिनी घातली, तू त्याची तारीफ केलीस, तर माझे फार अवघड होऊन बसेल गं!’
‘मेरे दिल को न सराहो तो
कोई बात नहीं,
गैरके दिल को सराहोगी
तो मुश्कील होगी.’
नूतन प्राणच्या शेजारी सोफ्यावर बसलेली असते. राज कपूरचे गाणे ऐकून ती तेथून उठून पुढे येते आणि त्याच्या प्रत्येक वाक्यावर लाडीक प्रतिसाद देऊ लागते. तेव्हा तो म्हणतो, ‘तू तर काय सुंदरच आहेस. सगळ्यांचेच तुझ्यावर प्रेम बसेल, मी तुझ्या प्रेमाला आसुसलो आहे तसे इतरही अनेकजण असतीलच. तुला सर्वांच्याच डोळ्यांत ही अभिलाषा दिसत असेल ना? तुझे प्रेम न मिळाल्याने माझ्या हृदयात जशी एक रुखरुख असते तशीच तुला ती अनेकांच्या हृदयात दिसत असेल. माझे हे दु:ख न जाणवल्याने तू अस्वस्थ झाली नाहीस तरी चालेल पण कुणा भलत्याच्या दु:खाची दखल घेशील, तर
प्रिये, माझे काय होईल?
‘तुम हसीं हो तुम्हे सब
प्यारही करते होंगे,
मैं तो मरता हूँ तो क्या
और भी मरते होंगे.
सबकी आँखों में इसी शौक का
तुफा होगा,
सबके सीनेमें यही दर्द उभरते होंगे.
मेरे गममें न कराहो तो
कोई बात नहीं,
औरके गममें कराहोगी तो
मुश्कील होगी.
तुम किसी औरको…
साहिरची शैलीच वेगळी आहे. तो प्रेयसीला म्हणतो, तुझे हसणे एखाद्या कळीच्या फुलण्यासारखे मनमोहक आहे. तू हसत राहा, फूलत राहा. सर्वांच्या नजरेत असलीस तरी तुझ्या मनाची अनमोल निरागसता सांभाळ. पण देव करो आणि माझ्यावर कधी अशी वेळ न येवो की इकडे मी तुझ्यासाठी झुरतोय आणि तिकडे तू कुणा परक्याच्या बाहुपाशात अडकशील. प्रिये, तू आपल्या प्रेमाचे नाते जपले नाहीस तरी चालेल पण माझी प्रिया माझ्या शत्रूच्या सहवासात दिसली, तर माझे फारच अवघड होऊन बसेल. हे मात्र विसरू नकोस.
‘फूल की तरह हँसो,
सबकी निगाहों में रहो,
अपनी मासूम जवानी की,
पनाहो में रहो.
मुझको वो दिन ना दिखाना,
तुम्हे अपनीही कसम,
मैं तरसता रहूँ तुम,
गैरकी बाहोंमें रहो.
तुम जो मुझसे न निभाओ,
तो कोई बात नहीं.
किसी दुश्मनसे,
निभाओगी तो मुश्कील होगी.
तुम किसी औरको
चाहोगी तो मुश्कील होगी.’
हे असे नाजूक प्रियाराधन, ही लाडीक नोकझोक, प्रेमभावनेचे हे संयत पण आग्रही प्रतिपादन मांडायला आता असे तबियतने लिहिणारे शायर कुठे आहेत? म्हणून तर हा नॉस्टॅल्जिया!