Sunday, August 24, 2025

Weather Update : पुढील ५ दिवस महत्त्वाचे; बदलणार राज्याचे हवामान!

Weather Update : पुढील ५ दिवस महत्त्वाचे; बदलणार राज्याचे हवामान!

जाणून घ्या कुठे थंडीचा कडाका तर कुठे पावसाच्या धारा?

मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यभरात हाडं गोठवणाऱ्या थंडीनं नागरिक कुडकुडले होते. मात्र काही ठिकाणी थंडीचा जोर ओसरत असल्याचे दिसून येत आहे. अशातच आता पुढील ५ दिवस संपूर्ण राज्याच्या तापमानात बदल होणार आहे. काही भागात थंडीचा जोर कायम राहणार आहे. मात्र काही ठिकाणी नागरिकांना हिवाळ्यात पावसाचा अनुभव घेता येणार आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा येत्या काही तासात पुढे सरकणार असून पूर्व-इशान्येकडे दाब वाढणार आहे. परिणामी इशान्येकडील राज्यांमध्ये पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. याचाच परिणाम महाराष्ट्राच्या तापमानावर होणार असून पुढील दोन दिवसात राज्यात काही भागात पावसाची शक्यता आहे.

कुठे असणार थंडीची लाट?

उत्तरेकडील राज्यांमध्ये म्हणजे, जम्मू काश्मीर,हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थानमध्ये थंडीची लाट कायम आहे. कोरड्या वाऱ्यांचा झोत महाराष्ट्राकडे असल्याने राज्यात गारठा जाणवत असून पहाटे दाट धुकं आणि कडाक्याची थंडी आहे.तर दुसरीकडे बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्याची तीव्रता वाढल्याने येत्या दोन दिवसात पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे.

कुठे पडणार पाऊस?

पूर्व व पश्चिम विदर्भात हलक्या ते मध्यम सरींच्या पावसाचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्राने दिला आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात येत्या ४ ते ५ दिवसात किमान तापमान चढेच असेल. येत्या २४ तासांत किमान तापमानात हळूहळू २-४ अंशांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Comments
Add Comment