प्रशासन समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी झाले सज्ज
पुणे : शहरात भटक्या श्वानांचा (Stary Dogs) त्रास दिवसेंदिवस वाढतच असून, भटके श्वान चावल्याच्या दरमहा सरासरी दोन हजार घटना घडत आहेत. भटक्या श्वानांच्या प्रश्नाकडे महापालिका प्रशासनाने (Municipal Corporation) गांभीर्याने पाहावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
आंबेगाव पठार येथे पार्किंगमध्ये खेळत असलेल्या एका लहान मुलावर दोन ते तीन भटक्या श्वानांनी हल्ला केला. भारती विद्यापीठाच्या मागे असलेल्या चंद्रांगण सोसायटीमध्ये हा प्रकार घडला. महापालिकेने या घटनेची दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही सुरू केली असल्याची माहिती आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
Kisan Credit Card : मासेमारी करणाऱ्यांनाही मिळणार किसान क्रेडीट कार्ड
लहान मुलावर श्वानाने केलेल्या हल्ल्याच्या या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी खासगी डॉग रेस्क्यू टीमला बोलाविले. तसेच, भटके श्वान पकडण्यासाठी स्थानिक नागरिकदेखील रस्त्यावर उतरले. काही श्वान पकडून महापालिकेच्या ताब्यात देण्यात आले. या भागात गेल्या काही महिन्यांपासून भटक्या श्वानांचा त्रास वाढला असून, प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन तातडीने कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली.
आंबेगाव पठार भागात गेल्या महिनाभरात ३० श्वानांचे लसीकरण करून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तसेच, या भागात भटके श्वान पकडण्यासाठी दोन स्वतंत्र गाड्यांची आणि लसीकरणासाठी एका गाडीची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेच्या मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका फुंडे-भोसले यांनी दिली.
शहरातील अनेक भागांत भटक्या श्वानांची समस्या गंभीर होत चालली आहे. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून ये-जा करावी लागत आहे. भटक्या श्वानांना पकडून त्यांची नसबंदी करण्यासाठी महापालिकेकडून नियोजन केले जाते. एप्रिल २४ ते नोव्हेंबर २४ या आठ महिन्यांच्या काळात महापालिकेने १६ हजार ४७९ श्वानांना पकडून त्यांच्यावर नसबंदी शस्त्रक्रिया करून त्यांचे लसीकरण केले आहे, असे भोसले यांनी सांगितले.
रात्रीच्या वेळी वाहनचालकांना अधिक त्रास
शहरातील अनेक भागांत रात्रीच्या वेळी भटक्या श्वानांचा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागतो. हे श्वान वाहनचालकांच्या दिशेने भुंकत आणि धावत जात असल्याने अनेकदा अपघात घडत आहेत. गेल्या आठवड्यात आळंदी येथेदेखील भटक्या श्वानाने अनेकांना चावा घेतल्याचा प्रकार घडला होता.
भटके श्वान पकडल्याचा पालिकेचा दावा
आंबेगाव पठार येथील घटनेनंतर महापालिकेच्या पथकाने या भागात कारवाई करून मोकाट श्वानांना पकडल्याचा दावा केला जात आहे. गेल्या २० दिवसांत या भागातील २१८ श्वानांना पकडून त्यांची नसबंदी, लसीकरण केले आहे. तसेच, सध्या या भागातील १८ श्वान लसीकरण आणि नसबंदी करण्यासाठी महापालिकेच्या ताब्यात असल्याचा दावा केला जात आहे.