पं. आनंद भाटे
जाकिरभाई तबलावादक म्हणून मोठे होतेच खेरीज माणूस म्हणूनही ते तितकेच थोर होते. अनेक दिग्गजांबरोबर साथसंगत केलेली असली तरी आपल्यापेक्षा कमी वयाच्या कलाकाराबरोबर कार्यक्रम करताना ते त्याला कधीही आपले मोठेपण जाणवू द्यायचे नाहीत. त्यांच्याकडून शिकण्याजोगी ही खूप मोठी गोष्ट होती. उत्तम कलाकार आधी उत्तम माणूस असावा लागतो, असे म्हणतात. असा उत्तम माणूस त्यांच्यामध्ये नेहमीच दिसायचा. उस्ताद जाकिर हुसेन यांचे आपल्यातून जाणे ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. कलाकार म्हणून ते मोठे होतेच खेरीज माणूस म्हणूनही ते फार मोठे होते. त्यांच्याशी आलेला वैयक्तिक संपर्क आणि त्यायोगे जुळलेले स्नेहबंध ही माझ्यासाठी नेहमीच मर्मबंधातली ठेव राहील. खरे पाहता त्यांच्या कलेविषयी कितीही बोलले तरी अपुरेच पडेल. दुसरे म्हणजे त्याविषयी बोलण्याची आपली योग्यता आहे की नाही, असेही मनात येऊन जाते. जणू अशी माणसे संगीत जगताला काहीतरी देण्यासाठीच जन्म घेत असतात. शतकामध्ये अपवादानेच त्या बघायला मिळतात. जाकिरभाई अशांमधील एक होते. त्यांनी तबलावादनाला फार मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले. काही कलाकार घराण्यांमध्ये अडकतात, तर काही त्यापलीकडे जातात. जाकिरभाई अशांमधील असून ते सगळ्या घराण्यांपलीकडे गेले होते. त्यांनी तबलावादनात सगळ्या घराण्यांमधील चांगल्या-चांगल्या गोष्टी घेत आपल्या सादरीकरणाला वेगळेच परिमाण दिले. आपण गाण्याबाबत भीमसेनजींचे नाव घेतो आणि त्यांचे गाणे शास्त्र कळणाऱ्याला तसेच न कळणाऱ्यालाही तेवढेच आवडायचे असे सांगतो. अगदी त्याचप्रमाणे जाकिरभाईंची तबलावादनामधील ख्याती होती. शास्त्र समजणाऱ्यांना त्यांच्या वादनातील ज्ञानाची खोली कळायची आणि तबलावादन आवडणाऱ्यांना, शास्त्र न समजणाऱ्या सामान्य श्रोत्यांनाही त्यांचे वादन तितकेच आवडायचे. आनंद देऊन जायचे. एकाच वेळी या दोन्ही गोष्टी साध्य करणे हे अत्यंत कठीण काम आहे. शास्त्राधाराला धक्का न लावता एकच वेळी दोन्ही प्रकारच्या श्रोत्यांचे रंजक वाटण्याजोगे वादन सादर करण्यासाठी फार मोठी उंची आवश्यक असून सिद्धी प्राप्त झाल्याशिवाय ती गाठता येत नाही. माझ्या मते, जाकिरभाईंना ही सिद्धी प्राप्त झाली होती. त्यामुळेच कलाकारांमधील दैवी व्यक्तिमत्त्वांमधील ते एक होते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
माणूस म्हणूनही ते तितकेच थोर होते. त्यांनी अनेक दिग्गजांबरोबर साथसंगत केलेली असली तरी एखाद्या आपल्यापेक्षा कमी वयाच्या कलाकाराबरोबर कार्यक्रम करताना कधीही आपले मोठेपण जाणवू द्यायचे नाहीत. त्यांच्याकडून शिकण्याजोगी हीदेखील खूप मोठी गोष्ट होती. उत्तम कलाकार आधी उत्तम माणूस असावा लागतो, असे म्हणतात. असा उत्तम माणूस त्यांच्यामध्ये नेहमीच दिसायचा. स्वत: अत्युच्च पदावर विराजमान असूनही इतरांशी वागण्याच्या पद्धतीतून त्यांच्यातील या वैशिष्ट्याची ओळख पटायची. प्रत्येकाशी त्याच्या पातळीवर येत संवाद साधण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. अशा या थोर व्यक्तिमत्त्वाबरोबर काम करायला मिळाले हे मी मोठे भाग्य समजतो. लहानपणीदेखील मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि आताही तसे अनेक योग आले. लहानपणी मी बालगंधर्वांची गाणी गायचो. एकदा हिराबाई बडोदेकर यांच्या घरी जाकिरभाई आणि अल्लारखा साहेब आले होते. तेव्हा भेट घडवून आणण्यासाठी माझ्यावर अतिशय जीव असणाऱ्या हिराबाईंनी आवर्जून बोलावून घेतले होते. त्यांच्याकडे कोणीही दिग्गज कलाकार आल्यावर बोलावून त्यांच्यासमोर मला गायला सांगणे, ही त्यांची नेहमीची पद्धत होती. त्याप्रमाणे तेव्हाही मी या दोन मोठ्या कलाकारांसमोर गायल्याची आठवण ताजी आहे. गाणारा लहान मुलगा असूनही त्यांनी माझे स्मरण ठेवले हे विशेष आणि मनाचा मोठेपणा म्हणावा लागेल कारण नंतर एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भेट व्हायची तेव्हा ते आवर्जून हिराबाईंकडे ऐकलेल्या माझ्या गाण्याची आठवण करून द्यायचे. ही खचितच खूप बाब म्हणावी लागेल.
गेल्या काही वर्षांमध्ये पुन्हा एकदा त्यांच्याबरोबर दोन-तीन मैफलींमध्ये काम करण्याचा योग आला. त्यावेळीही समोरच्या माणसाला आश्वस्त करण्याच्या त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्याचा नव्याने अनुभव घेण्याची संधी मिळाली. पं. रविशंकर, पं. भीमसेन जोशी अशा सर्वच दिग्गजांना साथ केलेली असूनही माझ्या पिढीतील गायक-गायिकांबरोबर काम करताना त्यांनी कोणताही अभिनिवेश ठेवला नाही. मुख्य म्हणजे त्यांनी आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी नाट्यसंगीताला साथ केली होती. सतत नवनवीन शोधत राहण्याचा मोठ्या कलाकाराचा स्वभावगुणच यातून दिसून आला. कारण एखादा टप्पा गाठल्यानंतर थोडे थांबावेसे वाटते. मात्र इतके मोठे स्थान मिळवल्यानंतरही जाकिरभाईंमधील कलाकार कलात्मक आनंदासाठी आतुरलेला होता. नवे काही शिकण्यासाठी इच्छुक होता. आपण एवढे केले म्हणजे सगळे काही मिळवले, ही भावना त्यामध्ये नव्हती. त्यामुळेच इतक्या उच्च स्थानी असतानाही त्यांना नाट्यसंगीताला वाचवण्याची इच्छा होती, जी त्यांनी पूर्ण केली आणि त्यांच्यापेक्षा लहान असणाऱ्या आमच्यासारख्या मंडळींना साथ करण्याचा मोठेपणा दाखवला. अर्थातच ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यांची कला दैवी होतीच त्याचबरोबर त्यांच्यामध्ये एक सच्चा कलाकार आणि चांगला माणूसही होता. म्हणूनच त्यांच्या जाण्याने झालेली हानी नेमक्या कोणत्या शब्दांमध्ये व्यक्त करायची, हेच समजत नाही. खरे सांगायचे तर शब्दच सुचत नाहीत. जाकिरभाईंना विनम्र आदरांजली!
जाण्याची घाई केली…आपल्या देशात काही शब्द, काही वाद्य, काही खेळ एकेका नावाशी जोडलेले दिसतात. म्हणूनच ‘क्रिकेट खेळणार म्हणजे तू काही गावस्कर होणार का…’ यासारखी वाक्ये आपण वरचेवर ऐकतो. संतूरचे नाव घेतले की पं. शिवकुमार शर्मा डोळ्यांसमोर येतात. या अर्थाने बघता दोन-तीन पिढ्यांनी, संपूर्ण देशाने तबल्याशी जोडलेले नाव म्हणजे जाकिर हुसेन…जगाच्या नकाशावर तबला हे भारतीय वाद्य न राहता त्याला जागतिक संगीतपटालावर नेण्याचे श्रेयदेखील याच नावाला जाते. त्यांना मिळालेले दोन ग्रॅमी पुरस्कार याची साक्ष देण्यास पुरेसे आहेत. त्यामुळेच आज जगाच्या पटलावर अन्य पाश्चात्य तालवाद्यांप्रमाणेच तबलाही महत्त्वाचे स्थान राखून आहे. जाकिरभाईंच्या वादनामुळे आणि संगीत दिग्दर्शनामुळेच हे शक्य झाले आहे. माझ्या मते, त्यांनी केवळ संगीत दिले असते, चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन केले असते तरी ते तेवढेच मोठे झाले असते. कारण ते इतके चांगले संगीतकारही होते.
त्यांनी आपल्या वावरातून एखाद्या कलाकाराने कसे वावरावे हे दाखवून दिले. प्रेक्षकांशी वा अन्य संबंधित लोकांशी संवाद कसा साधावा, आपल्या वडिलांविषयी कसे बोलावे हे कोणी त्यांच्याकडून सहजी शिकू शकते. मला सवाई गंधर्व महोत्सवातील एक प्रसंग अजूनही स्पष्टपणे आठवतो. त्यावेळी निवेदकांनी उस्ताद अल्लारखा साहेब आणि उस्ताद जाकिरभाई असे सांगताच थांबवत जाकिरभाई म्हणाले, ‘ऐसा नही होता. वो उस्ताद है, आप मुझे सिर्फ जाकिर हुसेन बुलाओ…’ आपल्यावर नकळत अशा वाक्यांचे संस्कार होत असतात. ते आपल्याही जगण्याला, विचारांना, अभिव्यक्तीला वेगळी कलाटणी देतात. म्हणूनच यात जाकिरभाईंचा खूप मोठा वाटा आहे. आता जाकिरभाई आपल्यात नाहीत. त्यांच्या पश्चात देशात, जगात चांगले तबलावादक होतीलही. मात्र एखादा ब्रँड तयार करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असेलच असे सांगता येणार नाही. जाकिरभाईंनी तो सहजी तयार केला होता. ही एकरूपता इतक्या पराकोटीची होती की, एका चित्रपटातील गाण्यातही तो संदर्भ आपण ऐकलेला आहे. त्यामुळेच तबलावादक अनेक असले तरी त्यांचेच नाव समोर येते आणि यापुढेही तेच नाव समोर येत राहील. असा समानार्थी शब्द होणे, हीच बाब अत्यंत दुर्मीळ पण तितकीच अनोखी आहे. जाकिरभाईंनी ती साधली.
आता जाकिरभाई आपल्यात नसले तरी त्यांचे विचार कधीच संपू शकणार नाहीत कारण अशी मोठी माणसे विचार रूपाने नेहमीच आपल्याबरोबर राहत असतात. सुदैवाने आता आपल्याकडे त्यांच्या असंख्य क्लिप्स उपलब्ध आहेत. त्यांच्या वादनाचे अनेक नमुने आपण हवे तेव्हा बघू शकतो. त्यांच्या मुलाखती ऐकू शकतो. त्यामुळेच या माध्यमातून आपण त्यांच्या संपर्कात राहूच. पण मुळात काही लोकांनी निरोप घेणेच आपल्याला मंजूर नसते. जाकिरभाई हे असेच एक नाव आहे. त्यातूनही सध्याचा काळ बघता ७३ हे काही जाण्याचे वय राहिलेले नाही. आता लोक ८५-९० पर्यंतचे वय सहज पार करतात. तेव्हा जाकिरभाईंनी अंमळ घाईच केली असे म्हणावे लागेल. त्यांनी आणखी काही वर्षे तरी आपल्यात राहायला हवे होते. विनम्र आदरांजली. – सलील कुलकर्णी, प्रख्यात संगीतकार